Sunday, July 26, 2015


The Vitthal from Karnataka is difficult to understand, but he has indeed taken hold of my mind....कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । तेणें मज लावियला वेधु ।
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, ज्ञानेश्वरांच्या ज्या ९९६ स्फुट रचना आहेत, त्यातले हे सर्वोत्कृष्ट गीत असण्याची शक्यता आहे. रचनेच्या दृष्टीने तर हे गीत चांगलं आहेच पण आशयाच्या दृष्टीने सुद्धा बहुअर्थसुचक अस सामर्थ्य या गीतामध्ये दडलेलं आहे. या गीतामध्ये काय नाही? या गीतामध्ये पांडुरंग या देवतेची महाराष्ट्रातली उत्पत्ती, तिचा मागोवा आहे. या गीतामध्ये शब्दांच्या पलीकडे असणारी जी अनुभूती आहे. ती अनुभूती आकलनाच्या आवाक्यात आणून देण्याचा प्रयत्न आहे. या गीतामध्ये मुर्ताच्या पलीकडे त्याची भेट त्याचे आलिंगन घडवून देण्याचा प्रयत्न आहे.
तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन ।
अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥
हि जी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरीच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी केलेली होती. ती प्रतिज्ञा साकार झाल्याची प्रचीती जणू या गीतामध्ये ज्ञानेश्वरांनी आपल्याला आणून दिलेली आहे.
"कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू"
कानडा आणि कर्नाटक हे जे या ओविमधले दोन शब्द आहेत.या शब्दांनी अर्थाची अनेक वलय या गीतामध्ये उत्पन्न करून देलेली आहेत. कानडा म्हणजे काय? कर्नाटकू म्हणजे काय?
विठ्ठल हा कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये आला. विजय नगरच्या सम्राटाने या विठ्ठलाची मोहिनी पाडून, याच हरण केल आणि कर्नाटकामध्ये याची स्थापना केली. एकनाथांचे आजोबा भानुदास यांच्या तपश्चर्येने तो विठ्ठल पुन्हा कर्नाटकातून महाराष्ट्रात आला आणि पंढरपूरला स्थानापन्न झाला. या इतिहासाचा सूचक हा कानडा शब्द आहे का? “कर्नाटकू” हे जे विशेषण आहे ते या इतिहासाची खुण दाखविणारे आहे का? कि कानडा या शब्दाचा दुसरा अर्थ अनाकलनीय, दुर्बोध, कळायला कठीण, कर्नाटकू या शब्दचा अर्थ नाटक करणारा. तऱ्हे तऱ्हे ची नाटकं दाखवणारा, असे दोन अर्थ या दोन्ही शब्दांचे सांगितले जातात. कानडा हा शब्द विठ्ठलाला लागू पडेल काय? याचं कारण विठ्ठल हा सर्व सामान्य माणसांचा देव आहे. हा भाजी-भाकरीवर राजी असणारा देव आहे. नुसती काळी लंगोटी आणि हाती काठी घेणारयावर लुब्ध होणारा हा देव आहे. फार चांगल वर्णन केलेलं आहे नामदेवांनी कि " काळी लंगोटी हाती काठी, बोले महाराचे थेट मऱ्हाटी" तेव्हा हा देव अनाकलनीय असून कसा चालेल. आणि नाटकं करण्याचा ह्याचा जो धर्म आहे तो धर्म आटोपल्यानंतर तो इथे कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला आहे. तेव्हा कर्नाटकातून तो आला या अर्थाने कानडा या शब्दाचा उल्लेख ज्ञानेश्वरांकडून झाला असण्याची शक्यता आहे.
" शब्देविण संवादू, दुजेवीण अनुवादू, हे तव कैसे निगमे."
संवाद करायचा झाला तर तो दोघांमध्ये असतो. अनुवाद करायचा झाला तर तो दोघामध्ये असतो. या ठिकाणी दोखांची हि संख्या हि गृहीत धरावी लागते. इथे हा संवाद जो आहे तो शब्दांशिवाय चाललेला आहे. हा जो अनुवाद आहे तो दुसरा कुणी नसताना चाललेला आहे. परमेश्वर आणि भक्त यांची अद्वैत अवस्था या ठिकाणी आहे. कोण, कोणाला समजावणार, कोण कोणाला पाहणार, कोण कोणाशी बोलणार. जो बोलतो तोच एक, ऐकणारा आणि बोलणारा एकच असल्यानंतर हि शक्यता कशी उरणार.
"शब्देविण संवादू" हा शब्दांशिवाय चालणारा संवाद आहे. भक्त आणि परमात्मा यांच्या मध्ये शब्दांशिवाय संवाद चालतो. अत्यंत गूढ अत्यंत रहस्यमय अत्यंत सूक्ष्म असे जे अनुभव असतात ते अनुभव इतरांकडे संक्रमित करण्यासाठी शब्द हे आवश्यक नसतात. उलट ते अतिशय आगंतुक ठरतात.
लहान मुलाला काय हवं असतं अर्भाकावस्थेमध्ये हे शब्दांची सिद्धी प्राप्त होण्या अगोदर त्याच्या आईला कसं कळतं? "दुजेवीण अनुवादू" पतीच्या डोळ्यामधली जी छटा आहे ती छटा पत्नीला शब्दांच्या वापराशिवाय कळतं असते. "शब्देविण संवादू, दुजेवीण अनुवादू" याच कारण त्या ठिकाणी अंतःकर्णाचे अद्वैत स्थापन झालेलं असतं आणि त्यामुळे एकाच्या अंत करणातला निनाद दुसऱ्याच्या अंत:करणामध्ये प्रतिध्वनित होत असतो. ते शब्दाच्या द्वारे सांगण्याची आवश्यकता नसते. उलट शब्द त्याठिकाणी अडसर बनून राहतात.
"हे तव कैसे निगमे"
त्याचा उलगडा केला आहे. परे हि परते बोलणे खुंटले, वाणीच्या या चार अवस्था /जाती सांगितल्या आहेत. परा, पश्चत्ती, मध्यमा, वैखरी, हे टप्पे हि मानता येतील वाणीचे, परा हि सगळ्यात पहिली अवस्था, ज्यावेळेला एखाद्या विचाराचे किंवा कल्पनेचे पाहिले अस्तुस्फुरण मनामध्ये होते ती अवस्था परा, आपले आपल्याला कळत नसते, आपले आपल्याला जाणवलेलं नसतं आपण काय बोलणार आहोत आणि आपल्याला काय बोलायचे आहे ती अवस्था म्हणजे परा, आता हे जे बोलणे आहे किंवा हा जो संवाद आहे तो परेच्याही अगोदरच आहे, ज्यावेळेला बोलणाऱ्यालाच कळलेलं नसतं आपण काय बोलणार त्याच्याही अगोदरचा हा आशय.
"परे हि परते बोलणे खुंटले, ' वैखरी कैसे नि सांगे"
परेच्याही अगोदरचा, वाणीच्या वाच्चतेच्या उष:काला अगोदरचा हा आशय वैखारीच्या म्हणजे वाणीच्या द्वारे कसा प्रगट होतो, अद्वैताच्या अनुभूती शिवाय हे शक्य होत नाही, किती अद्वैत उत्पन्न झालं, एका गीतामध्ये ज्ञानेश्वरांनी त्या विरहिणीची दैन्य आणि केविलवाणी अवस्था वर्णन केली आहे, कि ती आरशामध्ये पाहायला जाते आपलं प्रतिबिंब ,
"दर्पणी पाहता मुख नदिसे ओ आपुले", बापरखुमादेविवरे मज ऐसे केले,"
ती स्वतःच रूप पाहायला जाते, तिला दिसत नाही, त्याही ठिकाणी तिला बापरखुमादेवीवराच, कान्होवनमाळीच मुख दिसत, इतकी ती त्याच्या ध्यासामुळे एकरूप झालेली आहे, याठिकाणी तर त्याच्याही पुढचा अनुभव आहे, ती म्हणते
"पाया पडू गेले, तव पाउलची न दिसे "
या विठ्ठलाच्या मी पाया पडू गेले, त्याच्या पायावर मस्तक ठेऊ गेले, माझ्या असं लक्षात आलं पाउलच नाही आहेत, पाउलच दिसत नाहीत "उभाची स्वयंभू असे"
असं कसं पाउल दिसण शक्य आहे. हा परमात्मा अनादी आहे, याचा अंत म्हणजे शेवट दिसत नाही., ज्या पावलांवर उभा आहे हा आरंभ दिसणार कसा?, तिला लक्षात आलं कि तो सगळा स्वयंभू उभाच आहे, सगळीकडे त्याची सुरुवातही नाही, त्याचा शेवटही नाही,.
"समोर कि पाठीमोरा नकळे, ठकचे पडिले कैसे,"
बिचारीला त्याची समोरची बाजू कोणती त्याची पाठीमागची बाजू कोणती हे हि कळत नाही , याचं कारण जो सगळीकडे भरलेला आहे, त्याची समोरची बाजू कोणती म्हणावी? त्याची मागची बाजू कोणती म्हणावी? सगळीच समोरची , सगळीच मागची , सगळीच आजूची, सगळीच बाजूची कारण सगळीकडे तोच एकटा भरलेला आहे, या सगळ्या बाजू दर्शवण्याकर्ता कुठे न कुठे तरी मर्यादा लागते, हा तर अमर्याद आहे . या मार्यादात सापडल्या नंतर आपल्याला त्याच्या बाजू निर्णित करता येतील, हा अमर्याद आहे, त्याच्या मूळे सगळ्या संज्ञा ज्या आहेत, या सगळ्या संज्ञा याच्या वर्णनाच्या बाबतीत अर्थशून्य बनून जातात . समोर नाही पाठीमागे नाही , आजूचा नाही बाजूचा नाही, खालचा नाही , वरचा नाही , पाय नाही , मस्तक नाही , या सगळ्या संज्ञा संपूर्ण विश्वामध्ये भरून राहिलेल्या या एकाच परमात्म्याच्या रूपाच्या बाबतीत अर्थशून्य बनून जातात, तिची केविलवाणी अवस्था याच्यापुढे अशी होते,
"क्षेमल्यागी जीव उतावीळ माझा, म्हणोनी स्फुरता ती बाहो,"
त्याला तर तिला आलिंगन देण्याची उस्तुकता लागलेली आहे, ओढ लागलेली आहे, करकचून त्याला मिठी मारावी, असं तिला वाटतंय , परंतु तिचा अनुभव असा आहे,
"क्षेम देऊ गेले, तव मिची मी एकली"
ती जेव्हा आलिंगन द्यायला गेली, तेव्हा तिला जी प्रतीती आली, ती प्रतीती, आपल्या अन्तःकरणाचा थरकाप उडविणारी आहे, तिच्या असं लक्षात आलं कि आलिंगन द्यायला गेलो खरे आपण, पण आलिंगन कोणाला द्यायचं आलिंगन ज्याला द्यायचं तो इथे नाहीच, आपण एकटेच आहोत, याचं अर्थ तो आणि आपण याच्या मध्ये भेद नाहीच, एक तर तो तरी आहे, किंवा आपण तरी आहोत, ज्यार्थी तिला स्वतःची प्रतीती येतेय , त्या अर्थी ती परमेश्वराच्या रुपामध्ये पूर्णपणे भिनून गेल्याचा तो अनुभव ती या गीतामध्ये व्यक्त करते.
"पांडुरंग कांती। दिव्य तेज झळकती। रत्नकीळ फांकती प्रभा ॥"
पंढरपूरला पंढरीच्या देवळात जी पंढरीची जी मूर्ती आहे, ती काळ्या पाषाणाची आहे, त्याचं नाव पांडुरंग आहे, हि भक्ताची प्रतीती आहे, त्या ओबड धोबड मूर्तीमध्ये सुद्धा लावण्याची प्रभा हाकल्याची प्रतीती येणं हे सामर्थ्य हे आत्मनिष्ठ अशा रीतीच भक्तीचं सामर्थ्य आहे.
~~ प्रो. राम शेवाळकर
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरू हृदयीचा जाणुनी |
अनुभव सौरसु केला |
दृष्टीचा डोळा पाहो गेलिये |
तव भीतरी पालटू झाला ||६||
Like   Comment  

No comments: