Thursday, September 15, 2016

"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग २)
श्री व्यासराज स्वामींनी श्रीमन्मध्वाचार्यांवरील रचलेले मंगलम आपण आज पाहणार आहोत. मागील भागात सांगितल्याप्रमाणे वायुदेवाच्या अवतारत्रयीचे वर्णन यातून श्रीव्यासराज स्वामींनी केले आहे.
मंगल भारती ध्वरीगे 
मंगल राघव प्रियगे
मंगल श्री कृष्णन भकुतगे
मंगल गुरूवरीगे || ध्रु .||
जयदेव जयदेव या पदाप्रमाणेच येथे "मंगल" किंवा "मंगलम" असे पद वापरले आहे. त्याचा अर्थही तसाच घेणे अपेक्षित आहे. "भारती ध्वरीगे" म्हणजे भारती देवीचा पती. म्हणजेच वायुदेव किंवा मुख्यप्राण. सांप्रदायात भारतीरमण मुख्यप्राण असे म्हटले जाते. मुख्यप्राणाला अनन्य महत्त्व आहे. संर्व जीवांच्या अंतार्यामी जी प्राणशक्ती आहे त्या शक्तीचा जो मूळ स्रोत आहे ते तत्त्व म्हणजे मुख्यप्राण. भारती देवीविषयी विस्तृतपणे आपण भीमसेन अवताराच्या कडव्यात जाणून घेणार आहोत.
तर अशा भारतीच्या पतीचा रमणाचा जय असो. "राघव प्रियगे" म्हणजे प्रभु रामचंद्रांना प्रिय असणारे असे हनुमान त्यांचा जय असो.
पुढे म्हणतात "श्रीकृष्णन भकुतगे" भकुत म्हणजे भक्त. श्रीकृष्णप्रभूंचा भक्त असणाऱ्या भीमसेनांना मंगल. आणि शेवटी तिसरा अवतार श्री मध्वराज, आनंदतीर्थ, पूर्णप्रज्ञ अशी नावे असणाऱ्या श्री आचार्यांचा जय असो "मंगल गुरूवरीगे."
मागील भागात मंगल हे विशेषकरून क्षमेसाठी म्हणतात त्यामुळे कुठल्याही मंगलममधून आम्हाला ती इष्टदेवता गुरू आम्हाला मंगल ठरोत आमचे मंगल होवो अमंगल असे काहीही घडू नये असाही भाव मंगलम म्हणण्यामागे असतो.
शरधीयोळ लंघीसि
दुरूळ रावण न्यदीगे
बरदिंद गुद्दिद वानर नायक
अंजनी बालकगे ||१||
प्रत्येक शब्दाचे विस्तृत विवेचन न देता संपूर्ण कडव्याचे सार देत आहे. येथे शरधी किंवा जलधी असा पाठभेद आहे पण दोन्हींचा अर्थ एकच आहे. शरधी किंवा जलधि म्हणजे समुद्र. लंघीसि म्हणजे जो सागर ओलांडून गेला, जो रावणाच्या दरबारात गेला आणि त्याने तिथे असीम असा पराक्रम केला अशा वानर नायकाला, अंजनीच्या बालकाला, पुत्राला मंगल. त्यांचा जय असो.
लेखक : वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी : ९७६२७४४४०७

No comments: