Sunday, November 14, 2021
संत श्रीविजयदास
भगवंताच्या उत्कट प्रेमासाठी सर्वप्रथम त्याचे ज्ञान आवश्यक आहे. विवेकातून ज्ञान आणि ज्ञानातून प्रेम आणि प्रेमातून पुन्हा ज्ञान ही निरंतर चालणारी व मुख्यतः अनुभवण्याची प्रक्रिया आहे. त्याचा अनुभव ज्यांनी घेतला व तो आपल्या उद्धारासाठी उघड केला असे अनेक दासवरेण्य दासपरंपरेत होऊन गेले. ज्ञानोत्तर भक्तीची मूर्तीमंत उदाहरणे जशी वारकरी संप्रदायात सापडतात तशीच ती हरिदास संप्रदायतही सापडतात.
भगवंताच्या प्रेमासाठी आवश्यक काय आहे तर, भगवंताच्या महात्म्याचे ज्ञान. आपल्यापेक्षा अगणित सद्गुणांनी युक्त अशा भगवंताचे ज्ञान झाले की त्याच्याशी स्नेहाचा सहज बंध तयार होतो. त्या महात्म्य ज्ञानाच्या निरंतर श्रवण मननाने तो बंध दृढ होतो व त्यातूनच भक्ती फुलत जाते. आचार्यांची ही भक्तीची सुलभ व्याख्या सर्वार्थाने जगून दाखवली ती हरिदासांनी. भगवंताच्या महात्म्याचे गुणगान आपल्या रचनांमधून करत त्यांनी आपल्याही उद्धाराची व्यवस्था केली.
स्वतःचा उद्धार साधलेला असतानाही दुसऱ्याच्या उद्धाराची व्यवस्था करणे हेच व्यक्तीचे सत्पुरूषत्व, संतपद सिद्ध करणारे आहे. बाह्यांगानेच नव्हे तर अंतरंगातून संतपदाला पोहोचलेल्या अनेक हरिदासांपैकी एक म्हणजे संत श्रीविजयदास!
विजयदासांचा जन्म इसवी सन १६८२ रोजी रायचूर जिल्ह्यातल्या मान्वी तालुक्यातील चिकलपरवी येथे झाला. त्यांचे नाव दासप्पा असे ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास तर आईचे नाव कूसम्मा होते. त्यांनी लहानपणीच घर सोडले व काशीस जाऊन वेदाध्ययन केले. केवळ चारच वर्षात त्यांनी संपूर्ण वेदाध्ययन पूर्ण केले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा अरळम्मा नावाच्या स्त्रीशी विवाह झाला.
लहानपणापासूनच गरीबी ही त्यांच्या पाचवीस पुजली होती. विद्वान असूनही त्यांना अनेकवेळा अपमान सहन करावे लागले पण त्यांनी त्यांची चित्तवृत्ती बिघडवू दिली नाही.
एक दिवस संत श्री पुरंदरदासांनी त्यांना स्वप्न दृष्टांत दिला व त्यातच “विजयविठ्ठल” हे अंकित दिले आणि भगवंतावर रचना करण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवसापासून दासप्पा हरिदास झाले आणि भगवंतावर रचना करत आपले जीवन भगवंताच्या चरणी अर्पण केले.
vijayadasaru
विजयदासांनी एकूण २५,००० अभंग रचले अशी नोंद आहे. यात दास साहित्यातल्या उगाभोग सुळादि या विशिष्ट काव्य प्रकारांची संख्या जास्त आहे. लयबद्ध अशा “सुळादि” रचना करण्याचे श्रेय हे श्रीविजयदासांनाच जाते. त्यांचे कानडी तसेच संस्कृत भाषेवरील प्रभुत्व हे त्यांच्या रचनांमधून लगेच लक्षात येते.
भगवंताच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणाऱ्या अनेक चमत्कृतीही त्यांच्याकडून घडल्या. एका स्त्रीला आत्महत्येच्या पातकापासून वाचविले तसेच तिच्या मुलासही वाचवून त्यांचा सांभाळ केला. तो मुलगा अनेक आजारांनी ग्रस्त होता. त्यावर इलाज करण्याची परिस्थिती नसल्याने ती स्त्री, मुलासकट देहत्याग करणार होती. पण दासांनी मनुष्य जन्माची थोरवी सांगत तो साधनेसाठी कसा उपयुक्त आहे असे सांगून तसे करण्यापासून तिला रोखले. भगवद् नामस्मरणाच्या जोरावर त्याला सर्व आजारातून बाहेर काढले. पुढे तो मुलगा विजयदासांचा शिष्य बनला व ते मोहनदास म्हणून उदयास आले.
एकदा तिरूपतीस दर्शनाला गेलेले असताना त्यांना दर्शन मिळालेच नाही व उलट धक्कबुक्की करत त्यांना बाहेर काढण्यात आले. तेव्हा दासांच्या मुखातून एक पद बाहेर पडले, “देवा तुझ्या दर्शनासाठी आलो आहे रे.” तिथेच ते पद उत्स्फूर्तपणे म्हणत असताना सात कडवी पूर्ण झाली आणि देवळातील एक सेवक बाहेर आला व त्याने विजयदासांना दर्शनासाठी बोलावले असल्याचे सांगितले. देवाचे ते चिन्मय रूप पाहून दासांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले व तिथेच अजून एक पद रचले गेले, “तुझ्या दर्शनाने हा दास नित्य तृप्त झाला आहे. दर्शन न झाल्याने तुझ्या या दासाचे समाधान भंगले म्हणून तू रागावला तर नाहीस ना रे?” हेही पद सात कडव्यांचेच रचले गेले.
एकदा मन्नारगुडी येथे श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी ते गेले असताना त्यांनी नदीवर स्नान केले. स्नान करून परत येत असताना एका गुराख्याच्या मुलाने त्यांच्या अंगावर पाणी उडवले. विजयदास त्या मुलाकडे पाहून हसले व पुनः स्नानास गेले. स्नान करून पुन्हा बाहेर आल्यावर पुन्हा त्या मुलाने पाणी उडविले. असे सात-आठ वेळा झाले. अखेरीस विजयदास म्हणाले, “अरे मुला तुला दिसत नाही का मी स्नान करून दर्शनासाठी चाललो आहे,” असे म्हणताच मुलाने पाण्याची चूळ भरून ती दासांच्या अंगावर थुंकली. त्याचा स्पर्श होताच दासांसमोर उभा असलेला तो गुराख्याचा मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्मा आहे असे दासांना दिसले व तिथेच त्यांनी त्याची स्तुति गाण्यास प्रारंभ करत त्यांच्या पायावर डोके ठेवले.
दासांनी तीन-चार वेळा काशी यात्रा केली. सगळ्यात लहान असताना घरातून बाहेर पडून त्यांनी काशी गाठली तेव्हा बैरागी साधूंमध्ये ते राहिले. दुसऱ्यांदा काशीस गेले तेव्हा मणिकर्णिका घाटावरच त्यांना पुरंदरदासांचा स्वप्न दृष्टांत झाला. कर्नाटकातील लोकांना गंगा दर्शन-स्नानाचे दर्शन व्हावे म्हणून तुंगभद्रेच्या प्रवाहातच गंगेला बोलावले. एकदा दास चिकलपरवी आणि पंढरपूर येथे एकाचवेळी उपस्थित होते असे लोकांनी सांगितले.
भगवंताचे महात्म्य सांगण्यासाठी अनेकप्रकारच्या लीला तो घडवून घेत असतो. यात न अडकता प्रत्येकाने एकच करायला हवे ते म्हणजे श्रीहरिचे भक्तीपूर्वक स्मरण! सज्जनांचे समाधान व दीनांचे तापहरण हे त्याच्या स्मरणानेच घडते. जो असे स्मरण करतो त्याची अनेक प्रकारच्या दुःखातून मुक्तता होते! हेच सगळ्याचे सार आहे अशी दासांची शिकवण होती.
आपल्या आयुष्याची ७३ वर्षे भगवंताचे गुणगान करत त्यांनी इसवी सन १७५५ रोजी कार्तिक शु. दशमीस चिप्पगिरी येथे देह ठेवला.
अज्ञानतिमिरच्छेदं बुद्धिसंपत्प्रदायकं । विज्ञानविमलं शांतं विजयाख्य गुरुं भजे ॥
लेखक – वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी – ९७६२७४४४०७
Subscribe to:
Posts (Atom)