Sunday, July 17, 2016

देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४)
या दास्ययोगातील हा शेवटचा भाग. या भागात दासश्रेष्ठ पुरंदरदासांच्या साहित्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. वेदार्थ सहज सोप्या भाषेत भक्ती मार्गाने जनमानसापर्यंत पोहोचवणे हेच या दास साहित्याचे काम. कर्नाटकातील संगीताचे पुरंदरदास पितामह आहेत असे म्हणतात. कारण भगवंतावर पदे, भजने याचे केवळ शब्द तयार होत नाहीत तर ती संगीतासकट तयार होतात. त्यामुळे ही दास मंडळी भगवंताची स्तुती, माहात्म्य हे संगीताच्या साथीने वर्णन करत फिरत असत. कर्नाटकातील हरिदास साहित्याचा पाया हा पुरंदरदासांनी रचला आहे. आणि त्या परंपरेतच पुढे कनकदास, विजयदास, जगन्नाथदास, महिपतीदास, गोपालदास अशी दासरत्ने हरिदास साहित्याला लाभली.
पुरंदरदासांची पदे ही पंचविध भावांनी युक्त आहेत. कधी ते त्या परिपूर्ण गुणांनी युक्त परब्रह्माचे दास होतात, कधी त्याचे सखा होतात. कधी यशोदा, कौसल्या होऊन भगवंताविषयीचा वात्सल्य भाव प्रगट करतात. कधी गोपींचा शुद्ध मधुर भाव सांगातात तर कधी भगवंताच्या नामाशिवाय काही नको हा खऱ्या भक्ताचा शांत भाव दाखवतात. दासांची पदे लौकिक शब्दांची जादू नव्हे. तर प्रत्यक्ष अनुभवलेली पारलौकीक किमया आहे. दासांची पदे हे केवळ शब्द नाहीत तर त्यातील एक-एक अक्षर हे परब्रह्मच आहे. पुरंदरदासांच्या रचना म्हणजे एक नदी आहे जी आपल्याला भगवंताच्या क्षीरसागरापर्यंत घेऊन जाईल.
भक्त प्रह्लादाने जे मागितले ते देहि मे तव दास्ययोगं हे पुरंदरदासांनी पहिले मागितले. ते म्हणतात, "दासन माडिको एन्ना" "भगवंता मला तुझा दास बनव." मग दास कसा असतो? त्याने राहावं कसं? हे कळण्यासाठी भगवंताची पहिली दास ती म्हणजे लक्ष्मीदेवी हिला त्यांनी बोलावलं ते असं "सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा." "आई, ये आणि सांग या भगवंताचं दास्य मी कसं करू?" दास हे त्यांचे नाव किंवा फक्त एक पदवी नाही ते दास्य ते जगले. आयुष्यभर दास्य सोडून काहीही केलं नाही.
हे वैयक्तिक पातळीवरील दास्य असले तरी हेच त्यांच्या साधनेचे सामर्थ्य समाजाच्या पाठीशीही उभे राहिले. चार वर्णांची समाज व्यवस्था पण त्याचे वर्गीकरण उभे नसून आडवे आहे म्हणजे ते एकाच पातळीवरचे आहे जेणेकरून त्यात भेद राहणार नाही हा संदेश देण्याचे श्रेष्ठ काम दासांनी केलं आहे. सर्वच दास, संत सत्पुरूषांनी केलेले हे महत्त्वाचे काम आहे. भगवंताचे नाम त्याची भक्ती करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे तेव्हा प्रत्येकाने त्या भगवंताचे नाम घ्या हा मुख्य संदेश दास अनेकवेळा त्यांच्या पदातून सांगतात.
काही पदातून हे नामाचे महत्त्व फार सुंदर रितीने ते सांगतात. आपल्या आधीच्या आयुष्याबद्दल ते एका पदात म्हणतात की, मी आधी उद्योग करायचो पण आता या भगवंताच्या नाम आणि भक्तीच्या उद्योगाशिवाय मला दुसरा कुठला उद्योग माहित नाही. भगवंताचे नाम हे खीरी सारखे आहे ती खीर खायला सगळ्यांनी या असे ते एका पदात सांगतात. ही नामाची खीर आहे तरी कशी? तेव्हा सांगतात की, "रामनाम पायसक्के, कृष्णनाम सक्करे, विठ्ठलनाम तुप्प बेरिसि, बायी चप्परिसिरो" म्हणजे ही रामनामाची खीर आहे यात कृष्णनामाची साखर आहे आणि विठ्ठलनामाचे तूप आहे अशी ही खूपच स्वादिष्ट खीर आहे.
पुरंदसदासांनी एकूण ४ लाख ७५ हजार पदे रचली. त्यात कुठल्या कुठल्या पदांचा समावेश होता हेही लिहून ठेवले आहे.
केदार ते रामेश्वरपर्यंत सर्व तीर्थक्षेत्रांचे वर्णन - १,२५,०००, श्री मध्वाचार्यांचा महिमा, गुरू व्यासतीर्थांचा महिमा, तंत्रसार देव तारतम्य - ५,०००, ब्रह्मलोक, कैलासलोक इत्यादि लोकांचे वर्णन - ९०,०००, पुराण कथांचे सार - ९०,०००, देवतांचे मूर्तिध्यान, गंडकीमाहात्म्य - ६०,०००, आन्हिक पद्धती एकादशी निर्णय - १६,०००, सुळादि (तत्त्वज्ञानाचे सार अशा पदांमध्ये आलेले असते) - ६४,०००, देवरनाम ( भजने ) - २५,०००. अशी एकूण ४,७५,००० पदे पुरंदरदासांनी रचली. पण दुर्दैवाने यातील सर्व पदे आज उपलब्ध नाहीत.
अशा दासश्रेष्ठ पुरंदरदासांची आज आराधना. पंपाक्षेत्री हंपीला पौष मासात कृष्ण पक्षात अमावस्येच्या दिवशी १५६४ साली वयाच्या ८४व्या वर्षी दासांनी देह ठेवला.
मन्मनोऽ भीष्ट्वरदं सर्वाभीष्टफलप्रदं । पुरंदरगुरूं वंदे दासश्रेष्ठं दयानिधिम् ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३)
आता आपण पुरंदरदासांच्या जीवन चरित्रातील काही निवडक कथा बघणार आहोत. पुरंदरदासांचे वैराग्य या पुढील कथेतून कळते. नवकोट नारायण असा सावकार, पैशासाठी हपापलेले मन असलेला मनुष्य भगवंताची कृपा झाल्यावर तोच पैसा आडका त्याच्यासाठी मातीमोल होऊन जातो. हाच भगवद्कृपेचा महिमा आहे.
विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हा पुरंदरदासांना भेटायला उत्सुक होता. नवकोट नारायण सावकार सर्वस्व त्याग करून हरिदास बनतो ही गोष्ट राजाला खूपच आश्चर्यकारक वाटत होती. अखेर एक दिवस ही भेट झाली. राजाने त्यांचा अन्न वस्त्र आभरणांनी सन्मान केला. पण दासांनी हे सर्व गावातील गोर-गरीबांना वाटून टाकले. राजाने त्यांचा सन्मान केला होता खरा, पण तो शिष्टाचाराचा भाग म्हणूनच. त्याला दासांचे श्रेष्ठत्त्व अजिबात कळले नव्हते.
पुरंदरदास रोज भिक्षा मागत तेव्हा ते राजवाड्यासमोरही भिक्षेसाठी उभे राहत. तेव्हा राजवाड्यातून त्यांना रत्नमोतींनी भरलेल्या सुपाने भिक्षा दिली जात असे. दोन तीन दिवस सतत हे पाहून राजाला संशय आला. राजा व्यासतीर्थांकडे आला आणि म्हणाला, " स्वामी तुम्ही तर पुरंदरदासांना वैराग्यमूर्ति म्हणाता, त्यांच्यावरती गौरव करणारी पदे रचता पण ते तुमचे दास किती लोभी आहेत पहा. तीन दिवस रत्न, मोती देऊनही अजून त्यांची तृप्ति झालेली नाही. नित्य भिक्षेला येतात." हे ऐकून व्यासतीर्थ म्हणाले, "असे होय. चल आपण जाऊन बघुया कसे आहेत दास."
पुरंदरदास गावाबाहेरील मारूतीच्या मंदीरात राहायचे. तिथे राजा आणि स्वामी दोघेही आले. आणि देवळाबाहेर कोपऱ्यात मोती रत्नांचा ढीग पाहिला. दासांची पत्नी भिक्षेच्या झोळीतून खडे कचरा म्हणून जे काही टाकत होती ते दास बाजूला कचऱ्यात जमा करत होते त्याचाच हा ढीग जमा झाला होता. अलिकडे दोन तीन दिवस भिक्षेत खूपच कचरा येतोय नाही? दासांचे आणि त्यांच्या पत्नीचे हे उद्गार ऐकून राजा लज्जित झाला. त्याने व्यासतीर्थ आणि पुरंदरदासांची क्षमा मागितली. आणि दास खरोखरच वैराग्यमूर्ति आहेत असे गौरवोद्गार काढले.
पुरंदरदासांच्या पदांचे महत्त्व - एकदा पाठ चालू असताना व्यासतीर्थांनी पुरंदरदासांची पदे म्हणजे "पुरंदरोपनिषद" असा सन्मान करून ती मध्वाचार्यांच्या सर्वमूल ग्रंथाबरोबर व्यासपीठावर ठेवून त्यांची आरती केली. हे तथाकथित पंडितवर्गाला अजिबात सहन झाले नाही. ह्या सराफाने केलेली पदे भजने ही कितीही सुंदर असली तरी ती आचार्यांच्या सर्वमूलग्रंथांबरोबर ठेवणे म्हणजे खूपच झाले. स्वामी ती तुम्ही आचार्यांच्या ग्रंथांबरोबर ठेवू नका असा आग्रह त्या मंडळींनी धरला. व्यासतीर्थ स्वामी हसले आणि म्हणाले, "मी ती तिथे ठेवलेलीच नाही आहेत. ती आपोआपच मूलग्रंथांकडे खेचली जात आहेत. खोटे वाटत असेल तर तुम्हीच बघा." पंडितवर्गाने एक-एक करून पुरंदरदासांची पदे व्यासपीठावरून भिरकावून द्यायला सुरूवात केली पण काय आश्चर्य ती परत जशीच्या तशी व्यासपीठावर स्थापित होत होती. असा दासांच्या पदांचा महिमा आहे. अर्थात त्यावेळच्या पंडितवर्गाला तो कळलाच नाही. हा दासांच्या इंद्रजाल विद्येचा प्रकार असावा असे म्हणून ते विरोध करतच राहिले.
पांडुरंगाची लीला - पुरंदरदांसांचे दैवत म्हणजे विठ्ठल, पांडुरंग. तीर्थयात्रा संपवून दास पंढरपूर क्षेत्री आले. अनिरूद्ध, प्रद्युम्न, संकर्षण, वासुदेव आणि नारायण या पंचरूपी परमात्म्यावर पदे, भजने रचण्याचा दासांचा मानस होता आणि तो भगवंताने येथेच पंढरपूर क्षेत्री पूर्ण करून घेतला.
एका रात्री मृत्तिका शौचास जाताना शिष्य अप्पण्णा भागवतास पाणी बाहेर आणून देण्यास सांगितले अप्पण्णा झोपेतच "हो" म्हणाला आणि झोपी गेला. इकडे दास शिष्याची वाट पाहून कंटाळले. आणि अश्याच अवस्थेत घरी येणेही त्यांना योग्य वाटेना. त्याचवेळी पांडुरंगच अप्पण्णा भागवताचे रूप घेऊन आला आणि त्याने पाण्याचा तांब्या दासांसमोर ठेवला. अंधारात दासांना नीट दिसले नाही पण अंधुकसे दिसले की हा अप्पण्णा भागवतच आहे. दासांनी शुद्धी कार्य आटोपून, "काय रे अप्पण्णा, इतका का वेळ लावलास?" म्हणून तांब्या त्याच्या दिशेने भिरकावला तो त्याच्या डोक्याला लागला. अप्पण्णा, "चूक झाली, गुरूजी" म्हणत निघून गेला.
दास घरी आले. अप्पण्णालाही जाग आली. "झोप आली गुरूजी, विसरलो! हे पहा आत्ता पाणी आणतो." असे म्हणत अप्पण्णा अंगणात आला.
"अप्पण्णा कुठे चाललास अरे शुद्धीत आहेस ना? माझा तांब्या कुठे ठेवलास?" दास म्हणाले.
"कसला तांब्या गुरूजी?" अप्पण्णा.
"अरे आत्ता मगाशी नाही का मी तुला दिला." दास.
"नाही गुरूजी मी तर इथेच झोपलो होतो." अप्पण्णा म्हणाला.
"अरे मूर्खा शेतात तू पाणी आणून दिलेस. आणि उशीर झाला म्हणून रागाने मी तो तुझ्याकडे भिरकावला नाही का?" दास म्हणाले.
"गुरूजी अहो खरोखर मी आलो नव्हतो." अप्पण्णा.
"अस्स! मग शेतात कोण आले होते?" दास विचारत पडले. आणि दासांना कळले. पांडुरंगा! काय रे हे देवा माझ्या हातून नीच कर्म करून घेतलेस? असे म्हणत नामस्मरण करत बसले.
काकड आरतीची वेळ आली होती. नित्याप्रमाणे काकड आरती झाली. नंतर भगवंतास अभिषेक सुरू करण्याच्या वेळी पुजाऱ्यांनी मुकुट काढला तेव्हा पाहिले तर डोक्याला टेंगूळ आले आहे असे दिसले आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत आहे. पुजाऱ्यांना हे काहीच कळेना. पुरंदरदास देवळात भजन करत बसले होते. सर्वांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. पुरंदरदासांनी तंबोरा खाली ठेवला. गाभाऱ्यात गेले. भगवंताच्या मूर्तीवरून हात फिरवला. आणि म्हणाले,
"देवा कसले रे हे तुझे विडंबन? महाभारत युद्धात भीष्म-द्रोणांच्या बाणापेक्षा माझा तांब्याने केलेला प्रहार इतका तीक्ष्ण झाला का? पाणी घेऊन तूच आलास ना? अप्पण्णा भागवतास झोप तूच आणलीस ना? मग चूक तुझी का माझी? पुरे झाले रे हे विडंबन आता." हात फिरवत असताना हळू हळू टेंगूळ नाहीसे झाले आणि अश्रूही थांबले. दास आनंदपूर्ण साश्रुनयनांनी पुजाऱ्यांना म्हणाले, "काही काळजी करू नका अभिषेक चालू करा. भगवंताला त्याच्या भक्ताबरोबर खेळताना लागले होते."
असे हे दासश्रेष्ठ पुरंदरदास ज्ञान, भक्ती, वैराग्याने परिपूर्ण होते. पुढील भागात त्यांच्या निवडक पदांविषयी, अभंगांविषयी आपण जाणून घेणार आहोत.
क्रमशः
देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २)
श्रीनिवास नायकाच्या मागे त्यांची बायका मुलेही आली. घरातील ऐश्वर्यावर पतीप्रमाणे त्या पत्नीनेही सहजपणे तुळशीपत्र ठेवले होते आणि पतीबरोबर हरि कीर्तनाला लागली होती. त्यांचा तेव्हाचा दिनक्रम असा होता की, गावाबाहेरील देवळात राहणे. हरि भजन करत करत भिक्षा मागणे आणि त्या भिक्षेचा सरस्वतीबाईंनी देवळात स्वयंपाक करणे आणि मुलांसहित नारायणाचे स्मरण करून तो स्वीकारणे. असेच चालू असताना एका रात्री नायकाला पांडुरंगाचे दर्शन झाले. "पंपा क्षेत्री चक्रतीर्थाजवळ निवास करत असलेल्या व्यासतीर्थांकडे जा. त्यांच्याकडून उपदेश घे आणि हरिदास हो." अशी आज्ञा केली. दुसऱ्या दिवशी नायक बायका मुलांसह पंपा क्षेत्री चक्रतीर्थाकडे म्हणजे हंपीकडे निघाले.
कंजूष क्रूर पैशासाठी वाट्टेल करणारा नायक कसा बदलला होता याची आणखी एक गोष्ट ऐकण्यासारखी आहे.
हंपीला व्यासतीर्थ गुरूंकडे जात असताना वाटेत अरण्यात सरस्वतीबाईंना भिती वाटू लागली आणि त्यांनी तसे नायकांना सांगितले. "सर्वस्व त्याग करून निघालो असताना भिती कशाची?" असे नायक म्हणाले. नायकांनी बरोबरचे गाठोडे पाहू म्हणून सरस्वतीबाईंना ते सोडायला लावले. "त्यात काही नाही. पाणी पिण्याकरीता फक्त एक सोन्याचे फुलपात्र आहे." असे सरस्वतीबाई म्हणाल्या. "हे पहा, या सोन्याच्या पात्रामुळेच तुला भय वाटत आहे." असे म्हणून नायकांनी ते पात्र अरण्यात भिरकावून दिले. आणि भ्यायचे कारण नाही. भगवंत आपल्याबरोबर आहे. आपण गुरूंकडे जात आहोत. काळजी नसावी असा धीर दिला आणि पुढची वाट चालू लागले.
चक्रतीर्थ हंपी येथे येताच तेथील सर्व परिसराचे दर्शन घेत घेत व्यासतीर्थांपर्यंत येऊन नायक थांबले. व्यासतीर्थ तेव्हा शिष्यांना पाठ सांगत बसले होते. नायकाने त्यांना नमस्कार केला.
पुरंदरदासांच्या गुरूंचे माहात्म्य जाणणे येथे आवश्यक आहे. ते थोडक्यात बघुया.
श्री रामाचार्य असे व्यासतीर्थांच्या पूर्वाश्रमच्या वडीलांचे नाव होते. श्री ब्रह्मण्यतीर्थांनी त्यांना जीवदान दिले होते. श्री रामाचार्य मृत झाले असता आक्रोश करीत असलेल्या पत्नीला स्वामींनी "दीर्घ सुमंगली भव" असा आशिर्वाद दिला. आणि नंतर खरोखरच तीर्थाने मृत रामाचार्यांना जिवंत केले. तुम्हाला लवकरच पुत्र होईल पण तो तुम्ही मठास द्यावा असे सांगितले आणि व्यासतीर्थ त्यांच्या घरी जन्मले आणि जन्म झाल्या झाल्या त्यांना मठात पाठवले. व्यासतीर्थ मठातच वाढले. उपनयन झाल्यानंतर वयाच्या ८व्या वर्षी श्री ब्रह्मण्यतीर्थांकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आणि विद्याभ्यासाकरीता श्री श्रीपादराज स्वामींच्याकडे पाठवले. तेथे १२ वर्षे शास्त्राभ्यास करून अतुलनीय असे पांडित्य त्यांनी प्राप्त केले. श्री व्यासतीर्थ हे प्रह्लादाचे अवतार होते आणि त्यांचाच पुढील अवतार म्हणजे श्री राघवेंद्रस्वामी.
श्री व्यासतीर्थांनी ‘चंद्रिका’ नावाचा प्रबळ वादग्रंथ लिहीला म्हणून त्यांना ‘चंद्रिकाचार्य’ असे नाव पडले. तसेच विजयनगरचा सम्राट श्रीकृष्णदेवराय याचा कुहयोग परतवण्यासाठी सिंहासनावर बसून राज्य सांभाळले म्हणून त्यांना ‘व्यासराय’ असेही नाव पडले. श्री वादिराजस्वामी, पुरंदरदास, कनकदास या सर्वांचे ते गुरू होते. न्यायामृत, तर्कतांडव, चंद्रिका असे अपूर्व ग्रंथ त्यांनी रचले. तसेच ७३२ मारूतींची अनेक गावी प्रतिष्ठापना केली. कृष्णदेवराय याला राज्य चालवण्याकरीता त्यांनी राजकारणातील धडे देखील दिले. "मध्व वल्लभ श्रीकृष्ण" या नाममुद्रेने त्यांनी पदे रचली. अशा महातपस्वी व्यासतीर्थांकडे नायक निघाले.
हात जोडून गुरूंसमोर नायक उभे राहिले. त्यांना बघताच स्वामी म्हणाले, "यावे नायक. चालत आलात का? काही अडचण तर आली नाही ना? तुम्ही केलेला त्याग अत्यंत मोठा आहे. श्री नारायणानेच तुमची परीक्षा घेतलेली आहे. मी तुमचीच वाट पाहात होतो. पाठ संपतच आहे. एवढ्यात पुजा नैवेद्य होईल. तीर्थ प्रसादानंतर आपण बोलूया." नायकांनी स्वामींचे हे सर्व बोलणे ऐकून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तीर्थ प्रसादानंतर स्वामींनी नायकाला गुरूपदेश केला. मंत्रोपदेश दिला. भागवत धर्माची दीक्षा दिली. त्या दिवसापासून नायक हरिदास झाले. "पुरंदर विठ्ठल" या नाममुद्रेने भगवंताची पदे रचून सेवा करावी आणि भगवंताचे माहात्म्य जनास सांगावे अशी आज्ञा व्यासतीर्थांनी केली. गुरूंच्या पूर्णकृपेनंतर पहिलेच पद त्यांनी रचले ते म्हणजे "कृष्णमूर्ती कण्ण मुंदे निंतिद्दतिदे." म्हणजे श्रीकृष्णच माझ्या डोळ्यांपुढे उभा आहे.
असे हे पुरंदरदास रोज स्नान आन्हिक आटोपून, तंबोरा वाजवत भगवंताचे भजन करीत करीत ग्रामप्रदक्षिणा करत. त्यांची चारही मुले त्यांच्या समवेत मृदुंग टाळ वाजवीत असत. त्यांनी पदे गायला सुरूवात केली प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्यापुढे नाचत असे. नगरातील लोकाच्या घरी जे काही झोळीत मिळेल त्यावरच संतुष्ट होऊन आपली दिनचर्या ते चालवत असत. उद्याकरीता म्हणून काही संग्रह करायची त्यांची वृत्ती राहिली नव्हती. आपल्याला अन्न मिळाले तर त्यातील राहिलेले अन्न भुकेलेल्यांना, जनावरांना देणे किंवा चक्रतीर्थातील जलचरांना ते देत पण संग्रह काहीच करून ठेवत नसत. या त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागणाऱ्या घरांना कर्नाटकात "अरे, याच्याकडे नसेल काही संग्रही, हे तर पुरंदरदासाचे घर" अशी म्हण आहे.
क्रमशः
देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १)
श्रीमद्भागवतामध्ये भक्तश्रेष्ठ प्रह्लादाने भगवंताजवळ एक गोष्ट मागितली ती म्हणजे देहि मे तव दास्ययोगं ॥ भक्तीचे प्रकार आहेत पण भक्त म्हटले की, दास्य हे स्वाभाविकपणेच त्याबरोर येते. आपण अनेक संत सत्पुरूषांबद्दल ऐकले आहे, त्यांचे जीवन चरित्र वाचले आहे त्यात इतर बाबतीत भेद, फरक असला तरी भगवंत माझा स्वामी आणि मी त्याचा दास हा भाव सर्वच संतांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. भक्तीबद्दल नारद भक्तीसूत्रे आणि श्रीमद्भागवत यात विस्तृतपणे सांगण्यात आलेले आहे. नवविधा भक्ती तर सर्वांना परीचित आहेच. पण त्याप्रमाणेच पंचविध भाव आहेत. दास्य भाव, सख्य भाव, मधुर भाव, वात्सल्य भाव, शांत भाव. आपण नीट पाहिले तर या पंचविध भावांवरच संत साहित्य हे आधारलेले आहे. महाराष्ट्रात जसे संत साहित्य आहे, संत परंपरा आहे तशी कर्नाटकात हरिदास परंपरा आहे, हरिदास साहित्य आहे आणि तेही याच पंचविध भावांवर उभे आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेबद्दल किंवा साहित्याबद्दल असे म्हटले जाते की त्याचा पाया हा ज्ञानेश्वर माऊलींनी रचला तसा कर्नाटकातील हरिदास साहित्याचा पाया हा दासश्रेष्ठ श्री पुरंदरदासांनी रचला. संस्कृतमधून वेदार्थ सांगणाऱ्यांना व्यासकूट असे म्हणतात तर कन्नड भाषेत कुठल्याही माणसाला तोच वेदार्थ सहजरित्या कळेल या पद्धतीने सांगून भक्तीमार्गाचा प्रसार करणाऱ्या दासांना दासकूट असे म्हणतात. कूट म्हणजे संघ. असे या दासकूटातील प्रत्येक दास हे ज्ञान भक्ती वैराग्याचे मूर्तीमंत उदाहरण असते. हे हरिदास साहित्य मध्व तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे. हे तत्त्वज्ञान कानडी भाषेमध्ये सहज सोप्या भाषेत जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि मुख्यतः भगवंताच्या नामाचा महिमा सांगत राहणे हे हरिदासांचे मुख्य काम. असे २५० पेक्षा अधिक हरिदास होऊन गेले. सगळेच श्रेष्ठ आणि उच्च योग्यतेचे होते पण त्यात अग्रगण्य असे कुणी असतील तर ते दासश्रेष्ठ असे पुरंदरदासच! त्यांचे चरित्र तर अद्भुत आहेच पण साहित्यही विशाल असे आहे जे थोडक्यात जाणून घेणे शक्य नाही पण घागर मे सागर भर दे ना या न्यायाने आपण त्यांचे जीवन चरित्र आणि साहित्य आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
श्रीनिवास नायकाचे पुरंदरदास झाले - काही सतं सत्पुरूष हे जन्मतः वैराग्यसंपन्न, जन्म कशासाठी आहे हे कळलेले, कार्य काय आहे हे माहित असून वाटचाल करणारे असतात. पण काही अगदी याच्या विरूद्ध. त्यांच्या आधीच्या आयुष्याकडे पाहून, हेच पुढे इतके मोठे सत्पुरूष झाले? असे कुणाला वाटले तर त्यात काही गैर नाही. त्यांच्या कार्याची जाणीव ही त्यांना नसली तरी त्यांना ज्याने पाठवले आहे त्या भगवंताला ती असतेच असते. आणि मग तो असा काही दणका देतो की त्या एका दणक्यातच भगवंताशिवाय मला कुणी नाही असे केवळ बोलण्याकरते राहत नाही तर तेच त्यांचे आयुष्य होऊन जाते. असाच प्रसंग पुरंदरदासांच्या बाबतील घडला. पुरंदरदासांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर गडावर १४८० साली झाला. त्यानंतर हंपि येथे स्थायिक झाले. नवकोट नारायण होते ते. त्यांचे आधीचे नाव श्रीनिवास नायक होते. सावकारी होती. कशालाही कमी नव्हती. पैसा म्हणजेच सर्वकाही आणि त्यासाठीच जगायचे एवढा एकच विचार श्रीनिवास नायक करायचे. त्यामुळे सहाजिकच वृत्ती कंजूष आणि क्रूर अशी होती. त्यांची पत्नी सरस्वतीबाई या मात्र अतिशयस शांत आणि प्रेमळ स्वाभावाच्या होत्या. यात त्यांच्या दास होण्यास कारणीभूत ठरल्या आणि त्याबद्दल नंतर त्यांनी एका पदात तिचे आभार मानले.
आता या श्रीनिवास नायकाला दणका देण्यासाठी आणि त्याचे जीवनातील खरे कार्य त्याला समजण्यासाठी भगवंताने एके दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि श्रीनिवास नायकाकडे आला. मला माझ्या मुलाचे उपनयन करायचे आहे तेव्हा आपण मला थोड्या पैशाची मदत करा असे त्याने नायकाला सांगितले. नायक म्हणाला तारण आणले आहे का तरच पैसे मिळतील. त्या ब्राह्मणाची दया येऊन पैसे देण्याची वृत्ती श्रीनिवास नायकाची नव्हती. पण तीच वृत्ती पालटवण्यासाठी या विश्वाचा नायक साक्षात श्रीनिवास त्याच्यापुढे आला होता. त्या ब्राह्मणाने रोज येऊन पैसे मागावेत आणि श्रीनिवास नायकाने त्यास नकार द्यावा असे सहा महिने चालले. शेवटी त्या ब्राह्मणापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीनिवास नायकाने त्याला एक फुटका रूपया दिला ज्याला काहीही किंमत नव्हती. तो ब्राह्मण निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने श्रीनिवास नायकाची पत्नी सरस्वतीबाई हिला गाठले. त्या अतिशय दयाळू होत्या. त्याने त्या बाईंना आपल्याला मदत करायला सांगितली. पण त्यांना आपल्या पतीचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला कुठलीच वस्तू देऊ शकत नाही. पण ही माझ्या आईवडीलांनी दिलेली नथ आहे ती घ्या. असे म्हणून सरस्वतीबाईंनी त्या ब्राह्मणाला नथ दिली.
तो ब्राह्मण लगेचच श्रीनिवास नायकांकडे आला. त्याला पाहूनच नायक खवळले. पण तो ब्राह्मण म्हणाला मी इथे भीक मागायला आलेलो नाही तारण ठेवायला आणले आहे मला पैसे द्या. नायक शांत झाला म्हणाला दाखवा काय आणले आहे तारण म्हणून? त्याने ती नथ काढून नायकाला दाखवली. ती पाहिल्या बरोबरच नायकाने ती ही आपल्या बायकोची आहे हे ओळखले आणि त्या ब्राह्मणाला ही तुला कुठे मिळाली असे विचारले. त्यावर त्याने मला ही बक्षीस म्हणून मिळाली आहे असे सांगितले. श्रीनिवास नायकाने त्याला उद्या येण्यास सांगितले. ब्राह्मण गेल्यावर ती नथ त्याने एका पेटीत कड्या कुलपांनी बंद करून ठेवली आणि घरी गेला.
घरी आल्यावर आपल्या पत्नीच्या नाकात नथ न पाहिल्याने नायकाने विचारले की नथ कुठे आहे? त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली पण नायक आपल्या पत्नीच्या उत्तराने समाधानी नव्हता आणि तो चिडला होता. त्याने नथ आणून दे असे सांगितले आणि निघून गेला. सरस्वतीबाईंना खूप अपराधी वाटू लागले. आपला पती आता आपल्याला शिक्षा करणार या भितीने त्यांनी आता विष घेऊन मरावे हा पर्याय निवडला. सरस्वतीबाईंनी एका भाड्यांत विष घेतले आणि भगवंताचे नामस्मरण केले आणि ते पीणार इतक्यात त्या भांड्यात नथ येऊन पडली. सरस्वतीबाईंनी मनोमन भगवंताचे आभार मानले आणि ती नथ धुवून नायकाला आणून दिली. ती नथ पाहून नायक चक्रावला आणि लागलीच सावकारीच्या दफ्तरावर आला. त्याने ती कड्या कुलपांमध्ये बंद केलेली पेटी उघडली आणि बघतो तर त्यातील नथ गायब! हा एक दणका नायकासाठी पुरेसा होता. तो घरी आला त्याने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. नथ नाही हे कळल्यावर मला तो ब्राह्मण पुन्हा दिसला आणि क्षणार्धात अंतर्धान पावला. तो ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात श्रीहरीच होता असे सांगितले. घरावर, सावकरीवर तुळशीपत्र ठेवले आणि चार मुले, पत्नी यांच्यासह हरिकिर्तन करत करत चालू लागला. त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यांची जागा आता तुळशीच्या माळेने घेतली होती. सोन्या, हिऱ्यांमध्ये असणाऱ्या हातात तंबोरा आणि चिपळ्या आल्या होत्या असा श्रीनिवास नायकाचा हरिदास झाला होता.
क्रमशः
श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग ५
जीवगणः हरेः अनुचराः - मध्वाचार्यांनी सांगितलेल्या पंचभेदामुळे म्हणजे ईश्वर,जीव,जड हे एकमेकांपासून भिन्न आहेत या सिद्धांतामुळे त्यांच्या मतास भेदवाद असेही म्हणतात. तत्त्वतः भेद या प्रमेयानंतर पुढचे प्रमेय जीवगणः हरेः अनुचराः असे सांगितले.
भगवंताने सृष्ट केलेली ही सृष्टी, हे विश्व आणि या विश्वातील जीव, त्यांचे आयुष्य, त्यांची सुखं-दुःखं हे सगळे आपण बघत असतो. आणि मग त्या सगळ्याकडे बघून त्यात भिन्नता आणि भिन्नताच आढळते. विविधतेमध्ये एकता हे वाक्य म्हणून छान आहेच. पण वास्तव हे निराळेच असते. मग साधक म्हणून प्रत्येकाच्या हातात काय आहे? जर भिन्नता दिसत आहे आणि ती प्रत्येकाच्या साधनेच्या अनुषंगाने केलेली आहे तर त्याचा स्वीकार करावा. म्हणजे असं की सगळेच काही भक्तीमार्गाने जात नाहीत किंवा सगळेच काही योग किंवा ज्ञान मार्गाने जात नाहीत. त्यामुळे यात भेद असला तरी एका मार्गाला धरावे आणि आपला उद्धार साधावा. मध्वाचार्यांचा शुद्धभक्ती मार्ग आहे त्यामुळे तो भगवंत हा माझा स्वामी आहे आणि मी त्याचा दास आहे हाच भाव आपल्याला ठेवायचा आहे. कारण आत्ता प्रत्येकजण ते अनुभवत आहे. तत्त्वज्ञानाकडे अति लक्ष दिले की, नेमकं काय करायचं हे बाजूला राहतं. तत्त्वज्ञान माहित असो किंवा नसो साधन तर करावच लागतं. तत्त्वज्ञानाचे चिंतन करताना तत्त्वज्ञानाविषयी असे प्रतिपादन करणे चूकीचे वाटू शकेल. पण मध्वाचार्य हे, नेमकं काय करायला पाहिजे ते सांगतात. आणि त्यात भक्तीला महत्त्व आहे. मग आता आपल्याला दोन प्रश्न पडतील? मग जीवांमध्ये ही भिन्नता का? आणि आपण नेमके काय करायचे?
मध्वाचार्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे ईश्वराप्रमाणे जीव हा देखील अनादि आहे. मग आपल्याला प्रश्न पडेल की मग मोक्षाची व्याख्या कशी असेल इथे? आणि सृष्टीचा संहार होतो मग तिचा पुन्हा उदय होतो मग भगवंताला असे वाटते की हा सृष्टीचा खेळ मांडावा वगैरे वगैरे याचे काय?
सृष्टी निर्माण करणे म्हणजे असलेलीच गोष्ट सृष्ट करणे. त्यात वेगळे असे काही निर्माण करण्यासारखे नसते. विनाशाच्या वेळी भगवंताने जी सृष्टी आपल्यात सामावून घेतली ती तो फक्त सृष्ट करतो बाहेर काढून, दाखवतो. कुठून बाहेर काढतो? पंचमहाभौतिक देह नाही परमात्म्याला, तो निकारार आहे ना? सत्त्व, रज, तम यापलिकडे जे आहे ते निर्गुण आणि निराकार एवढंच आपल्याला माहित आहे. पण सहस्त्रशीर्षा पुरूषः । सहस्त्रसाक्षः सहस्त्रपात् । पंचमहाभौतिक देहाच्या पलिकडे असणारा असा देह भगवंताचा आहे म्हणजे एका अर्थाने तो साकार आहे. आपण ज्या इयत्तेत असतो त्या इयत्तेच्या अभ्यासापलिकडे आपल्याला माहित नसतं. हे सत्पुरूष याचसाठी असतात. आपल्याला वाटत त्यापलिकडे काय आहे हे ते सांगत असतात. त्यामुळे भक्ती करून आपण त्या योग्यतेचे झालो की, भगवंत दाखवेल पंचमहाभौतिकाच्या पलिकडचा देह कसा आहे ते. त्याचे अधिक वर्णन आचार्यांनी केलेले आहे पण तो प्रतिपाद्य मुद्दा नाही.
तर अशी भगवंतामधून सृष्टी सृष्ट होते. मग विनाशाच्या वेळेला जे जीव ज्या ज्या स्थितीला असतात तसे तसे ते सृष्टीत येतात. मोक्षाला गेलेल्या जीवांना पुन्हा यावं लागत नाही. परीक्षेमध्ये सगळे विषय सुटलेल्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागते का? पण जे नापास झालेत, ज्यांचे विषय राहिलेत त्यात पास होण्यासाठी पुन्हा परीक्षा द्यावी लागते. तसेच आहे इथे. आणि म्हणूनच मग भक्ती, कर्म या सगळ्याला महत्त्व येते.
सुख हे जीवाचे स्वरूपभूत आहे. या जीवस्वरूपावर प्रकृति नावाचे आवरण आहे. यामुळे त्यांना या सुखाचा अनुभव येत नाही. त्यामुळे हे जीव कर्मे करतात. आणि तीच कर्मे अनेक जन्मांना कारणीभूत ठरतात. आणि यामुळे जीवांमध्ये भिन्नता आढळून येते. मग यापुढे मध्वाचार्य सांगत आहेत की, या जीवांमध्ये तीन भाग आहेत. एक आहेत ते मुक्तीयोग्य जीव. दुसरे नित्य संसारी आणि तिसरे तमोयोग्य. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की, फक्त मुक्तीयोग्य जीवांनाच मुक्ती का? नित्य संसारी म्हणजे आपल्यासारख्या माणसांनी काय तेच करत बसायचे का? एक गोष्ट आपण लक्षात घेऊ हे वर्गीकरण जन्माने नाही तर कर्माने ठरते. चांगलं का वागा, साधन का करा हे सांगितलंच नाही तर कुणी का करेल? दहावीचा अभ्यास केला तर पुन्हा दहावीत यायला लागत नाही. हा विचार सातवी आठवीत करायला सुरूवात केली म्हणजे आपण दहावीला बसायला लायक होतो आणि दहावी पास होतो. तसेच आत्ता आपण नित्यसंसारी असू पण साधन करून भगवंताला शरणागत भावाने कर उद्धार माझा, असं तळमळीने सांगू म्हणजे आपण असू त्या इयत्तेतून पुढे जाऊन मुक्तीयोग्य जीव होऊ. जे आहे ते भौतिक सुख चांगलं आहे देव आहे पण मला त्याच्याशी तितके देणे घेणे नाही. भौतिक सुख घेण्यासाठी तो माझ्याकरता आहे असा विचार करणारे नित्य संसारी. या उलट जे वागतात, याहूनही वाईट कर्मे करणारे, दुसऱ्याबद्दल असूया, द्वेष आणि असं सगळं वाटून कर्मे करणारे जीव म्हणजे तमोयोग्य. आणि अशी ही सृष्टी चालते. अशी ही भिन्नता येते.
तेव्हा आपल्या हातात एवढेच राहते की, चांगली कर्मे करावीत. पण कर्मे करत असताना काय करावे? आचार्य यासाठी फार सुरेख सांगतात ते म्हणतात की,
कुरू भुंक्ष्व च कर्म निजं नियतं । हरिपाद विनम्रधियासततं ॥
जी काही आपली विहित कर्मे आहेत ती करा पण ती करताना भगवतार्पण बुद्धीने करा, त्या श्रीहरीचे स्मरण ठेवून करा, त्याच्या चरणाशी विनम्र होऊन करा. असे आपण सगळे जीवगण हे हरिचे दास आहोत हे सांगणारे हे प्रमेय.
क्रमशः
"उडुपी क्षेत्र"
श्री अनंतेश्वराचे मंदिर हे उडुपीतील प्राचीन असे मंदिर आहे. या देवालयामुळे या गावाला शिवळ्ळी असे नाव पडले. याचेच नाव नंतर रौप्य पीठ किंवा रजतपीठ असे झाले. त्यामुळे उडुपीला रजतपीठपुर असेही म्हणतात. ही भगवान परशुरामांची भूमी आहे. स्वतः भगवान परशुराम म्हणजे श्रीमन् नारायणच शंकर, हर रूपाने येथे आहेत. त्यामुळे येथे शंकर आणि नारायण असे दोन्हीही पूजले जातात. गाभाऱ्यात शिवलिंग आहे आणि उत्सवमूर्ति ही अनंतपद्मनाभाची आहे. त्यामुळे हरि-हर असे हे स्थान आहे. श्री मध्वाचार्यांचे वडील मध्यगेहभट्ट हे याच मंदिरात पुजारी होते. या अनंतेश्वराची उपासना केल्यानंतरच श्री मध्वाचार्यांचा जन्म झाला. श्री मध्वाचार्य याच मंदिरात आपल्या शिष्यांसमवेत पाठ-प्रवचनाला बसत असत. ती जागा आजही या मंदिरात आहे व त्याची नित्य पूजा होते.
श्री अनंतेश्वरानंतर येथे श्री चंद्रमौळीश्वराचेही मंदिर आहे. या ठिकाणी चंद्राने तपश्चर्या केली. त्यावर शंकर भगवान प्रसन्न झाले. या मंदिराबद्दल अजून काही माहिती उपलब्ध नाही. पण अनंतेश्वराच्या मंदिराइतकेच ते प्राचीन असावे असे असे संशोधकांच्या अभ्यासातून कळते. उडुपीतील अष्ट मठाचे स्वामी अनंतेश्वरा इतकेच चंद्रमौळीश्वरालाही आपली सेवा अर्पण करत असतात.
"उडुपी पर्याय"
पर्याय म्हणजे नेमके काय?
द्वापार युगात रूक्मिणीने ज्या मूर्तीची पूजा केली, ती मूर्ती म्हणजेच आज उडुपी येथे असणारी श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती. मध्वाचार्यांना ती द्वारकेहून आलेल्या चंदनाच्या खडकात सापडली. तशी पूर्वसूचना त्यांना होतीच. पण उडुपी जवळील समुद्रात दिशाहीन नौका आली आणि मध्वाचार्यांनी तिला सुखरूप किनाऱ्याला आणले. आणि त्याचे निमित्त होऊन त्या नौकेच्या व्यापाऱ्याने, "तुम्ही आमचे प्राण वाचवलेत, तेव्हा काहीतरी भेटवस्तू आमच्या कडून घ्या" अशी विनंती केली. त्यावर मध्वाचार्य म्हणाले की, "अरे मी संन्यासी माणूस या भौतिक वस्तूंचे मी काय करणार. तेव्हा असं कर तुझ्या नौकेतील एक चंदनाचा खडक मला दे! त्याने तो खडक दिला. आचार्यांना त्या चंदनाच्या खडकाशी देणे घेणे नव्हते. पण त्याच्या आत परब्रह्म परमात्मा आहे हे माहित होते. त्यांनी तो खडक आपल्या डोक्यावर घेतला आणि भगवंताची स्तवनं गात गात उडुपीला आले. तो खडक तेथील पुष्करणीत टाकला आणि काही क्षणातच रवी धारण केलेली बाल रूपातील श्री कृष्ण परमात्म्याची मूर्ती बाहेर आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मध्वाचार्यांनी केली. पण त्याच्या नित्य पूजेसाठी आठ मठ स्थापन केले जे अष्ट मठ म्हणून ओळखले जातात. उडुपी जवळील, उडुपीच्या भोवतालच्या गावांची नावे या मठांना देण्यात आली. आणि या मठांवर आठ ब्रह्मचाऱ्यांना संन्यास देऊन त्यांची नेमणूक करण्यात आली. ते खालीलप्रमाणे :
१. श्री हृषीकेशतीर्थ - पलिमार मठ
२. श्री नरसिंहतीर्थ - अदमार मठ
३. श्री जनार्नदनतीर्थ - कृष्णापूर मठ
४. उपेंद्रतीर्थ - पुत्तिगे मठ
५. वामनतीर्थ - शिरूर मठ
६. विष्णुतीर्थ - सोदे मठ
७. रामतीर्थ - काणियूर मठ
८. अधोक्षजतीर्थ - पेजावर मठ.
हे मठ जेव्हा आपला श्रीकृष्ण मंदिरातील कार्यकाळ संपवतात आणि दुसऱ्या मठाला ती जबाबदारी सोपवतात त्यास "पर्याय" असे म्हणतात. पलिमार मठापासून हे चक्र चालू होते ते पेजावर मठापर्यंत संपते मग पुन्हा पलिमार पासून चालू होते. प्रत्येक मठाचा कार्य काळ हा दोन महिने होता. पण मग दोन महिने लवकर संपायचे आणि कुठल्या स्वामींना संचारालाही जाता येत नसे, त्यामुळे श्री वादिराज स्वामींनी दोन महिन्याच्या ऐवजी दोन वर्ष असा कार्यकाळ ठेवला. उत्तम व्यवस्थापन काय असते हे इथे पाहायला मिळते. या दोन वर्षात विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.
या दोन वर्षाच्या कार्य काळात मंदिराचे पूर्ण व्यवस्थापन ज्या मठाचा पर्याय असतो तो मठ बघतो. प्रत्येक मठाच्या स्वामींमध्ये पर्यायाची दोन वर्षे मध्वाचार्यांचे विशेष सन्निधान असते. पर्याय स्वामींशिवाय काही पूजा, सेवा इतर स्वामी करू शकत नाहीत. त्यापैकी काही म्हणजे, गो पूजा, अक्षयपात्र पूजा, अवसर सनकादि पूजा, (सनक,सनंदन,सनातन आणि सनत्कुमार हे येऊन पूजा करतात त्यानंतर पर्याय स्वामी आपली पूजा करतात), महा पूजा, चामर सेवा.
व्यवस्थापन इथे कसे शिकता येते तर प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करून कामकाज ठरवले जाते. एखादे संस्थान कसे चालवायचे हे व्यवस्थापनाचा कुठला वेगळा अभ्यासक्रम न शिकता येथील लोकांना माहिती आहे. आणि त्यासाठी पुढील व्यवस्थाही केलेली आहे. जर पर्याय स्वामींना कारभार पाहणे किंवा वरील सेवा, पूजा करणे शक्य नसले तर, दोन मठांच्या जोड्या केल्या आहेत. त्या जोड्यांमधील दुसरा मठ ती जबाबदारी स्वीकारतो या जोड्यांना द्वंद्व मठ असे म्हणतात.
मंदिराच्या बाहेरच्या प्रकारात आठ मठांची गोलाकार रचना आहे त्यास रथ-बीदि असे म्हणतात. पर्यायाची सुरूवात एक वर्ष आधीच होते. त्या एका वर्षाच्या काळात ठराविक कालांतराने ठराविक मुहूर्त केले जातात. यात पुढील दोन वर्षे लागणाऱ्या गोष्टींची तरतूद केली जाते. यात तुळशींची लागवड केली जाते. तसेच नैवेद्यासाठी अन्न-धान्य, लाकूड फाटा याची सोय केली जाते. पर्याय स्वामींनी पर्यायाच्या आधी काही महिने महत्वाच्या स्थान देवतांचे अशिर्वाद घ्यावेत. ही यात्रा शक्यतो बद्री ते कन्याकुमारी मधील महत्त्वाच्या स्थान देवतांची असावी. या यात्रेनंतर दहा ते पंधरा दिवस आधी पर्याय स्वामींनी उडुपीत प्रवेश करावा.
"पर्यायोत्सव"
जे स्वामी मध्वमूल पीठावर बसणार आहेत असे पर्याय स्वामी पर्यायाच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीपासून पाचव्या दिवशी सकाळी ३ वाजता दंड तीर्थ येथे स्नानासाठी जातात जे उडुपी जवळ आहे. तिथून परत उडुपीत येतात. पुढील दोन वर्ष नीट पार पडण्यासाठी उडुपीतील सर्व देवांचे आणि मध्वाचार्यांचे आशिर्वाद घेतात. कृष्णाचे दर्शन घेतात आणि पूजेचे सर्व अधिकार हस्तांतरीत केले जातात. यानंतर आधीचे स्वामी पर्याय स्वामींना मूल पीठावर बसण्याची विनंती करतात. यानंतर आठही मठांचा दरबार भरवला जातो यास पर्याय दरबार असे म्हणतात. यावेळी शास्त्र जाणणारे, ज्ञानी, पंडित अश्या विविध क्षेत्रातील विद्वानांचा सत्कार करण्यात येतो. तसेच इतर कारभार बघण्यासाठी मठातील लोकांची नेमणूक केली जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. जिथे अक्षय पात्र आहे तिथे कसली कमी असणार आहे? यामुळेच उडुपीस अन्नब्रह्म असेही म्हणतात. असा हा, दोन वर्षे पर्याय केल्यापासूनचा सोहळा, गेली ४८४ वर्षे अखंडितपणे चालू आहे. ही सगळी व्यवस्था प्रत्येक जिवाकरीता केलेली आहे. या क्षेत्री जावं आणि आपल्याला शक्य असेल तशी सेवा करावी आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याला विनवणी करावी की, त्याच्या चरणी कायम शरणागतीचा भाव राहावा आणि मध्वाचार्यांना अपेक्षित शुद्ध भक्ती आपल्या प्रत्येकाकडून घडावी एवढीच प्रार्थना करावी म्हणजे तो रवीधारी कृष्ण आपल्या संसारात अडकलेल्या मनाचं मंथन करून त्यातून भक्तीरूपी लोणी वर काढून आपला उद्धार करतो.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग ४
हे जग नाशिवंत आहे पण त्याचबरोबर ती साधनभूमी असल्यामुळे ते सत्य आहे असे सांगून पुढचे प्रमेय तत्त्वतः भेद: असे सांगितले.
३. तत्त्वतः भेद: - प्रत्येक आचार्यांनी जसे अनुभवले आणि प्रत्येकाच्या अवतार कार्याप्रमाणे त्यांनी त्यांचे-त्यांचे सिद्धांत मांडले. त्यांचे सिद्धांत ही आपल्यासाठी व्यवस्था आहे. त्याची कास धरून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा या सिद्धांतांचा उपयोग वाद घालून, कुणाचे मत कसे श्रेष्ठ आहे, यासाठीच केला जातो. कुठलेही आचार्य आपणहून जाऊन वाद घाला असे सांगत नाहीत. जर आपल्याला कुणी विचारले तर सांगावे. पण आपला वेळ हा मुखत्वेकरून साधनालाच दिला पाहिजे. ज्याला जो सिद्धांत पटेल, त्याने तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. वेदांत म्हटला की अद्वैत तत्त्वज्ञान असे समीकरण आहे. आणि त्यामुळे ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या, आत्मा हा एकच आहे, जीव आणि ब्रह्म वेगळे नाहीत, हे अद्वैत तत्त्वज्ञानाचे सिद्धांतही सहाजिक आपण ऐकत आलेलो असतो. आणि त्यामुळेच यापुढील तत्त्ववादाचे सिद्धांत आपल्याला नवीन वाटू शकतात. यापुढील प्रमेय ही आपल्या प्रत्येकाच्या डोक्यातील असलेल्या संकल्पनांपेक्षा वेगळी वाटू शकतात. तेव्हा या तत्त्वावादाच्या सिद्धांतांविषयी मनात कुठलेही पूर्वग्रह दूषित न ठेवता, हे सिद्धांत प्रत्येकाला प्रत्येकाच्या साधनात उपयोगीच पडतील यासाठी श्रोता व्हावे सावधान । एकाग्र करूनिया मन या भावनेने आपण ते ग्रहण करावेत याकरीता ही प्रस्तावना.
मध्वाचार्य हे प्रत्येकाला विचार करायला सांगतात. ब्रह्मतत्त्व हे तर्क,बुद्धीने जाणता येत नाही हे खरे असले तरी त्या दिशेने वाटचाल करताना प्रथम बुद्धी एका कश्यावर तरी स्थिर करावी लागते. जसे बालवाडी (नर्सरी) हा प्रकार असतो, त्यात शिकवल्या जाणाऱ्या ज्ञानावर काही आपण लगेच दहावीत जाऊ शकत नाही. पण दहावीपर्यंत जाण्यासाठीचा तो पाया असतो, त्याप्रमाणे बुद्धी हा पाया आहे. आणि म्हणून मध्वाचार्य आपल्याला ती बुद्धी वापारायला सांगत आहेत. विचार करा, बुद्धी वापरा, आपल्या बुद्धीला पटतंय का ते बघा आणि मगच इथला प्रवास सुरू करा. अर्थात भगवंताच्या, सद्गुरूच्या कृपेशिवाय या वाटेवर येता येत नाही आणि आलो तरी त्यावर टिकणे हेही त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही. पण आपण आपला हात द्यावा मग तो त्याचा हात देईल. यासाठी आपल्या बाजूने हा प्रयत्नांचा भाग.
साधन करण्यासाठी, या शुद्ध भक्ती मार्गासाठी सत्यं जगत् सांगितले. आणि त्यानंतर, जीव हा एकच नसून बरेच आहेत आणि ते एकमेकांपासून भिन्नं आहेत. तसेच परमात्माही जीवापासून वेगळा आहे. जीव, जड आणि परमात्मा हे एकमेकांपासून भिन्नं आहेत अशी परमोपनिषद श्रुती आहे.
जीवेऽश्वर भिदा चैव जडेऽश्वर भिदा तथा ।
जीवभेदो मिथश्चैव जडजीव भिदा तथा ।
मिथश्च जडभेदोऽयं प्रपञ्चो भेद पंचकः ॥ - परमोपनिषद
जीव, जड, परमात्मा हे कुठल्या ना कुठल्यातरी गुणांनी युक्त आहेत. यातील परमात्मा हा तर अनंत परिपूर्ण गुणांनी युक्त आहे. ज्यात कुठलेही दोष नाहीत. पण जीव आणि जडांच्या बाबतीत हे लागू होत नाही. त्यातील गुणांसमवेत दोषही त्यात आहेतच. दोष नसले, तरी अनंत गुण आणि गुण परिपूर्णत्त्व त्यात नसते. आत्मा आणि परमात्मा हा फरक याकरीताच आहे. समस्त जीवांमध्ये जो श्रेष्ठं आहे, सर्वोच्च आहे, परम आहे असा तो परमात्मा. याचा अर्थ जीवही बरेच आहेत आणि त्यांच्यापेक्षा सर्वोच्च असा कुणीतरी आत्मा आहे. आणि यामुळेच परस्परातील भिन्नत्त्वं सिद्धं होते. प्रत्येकाचे ‘स्व’रूप देखील वेगळे आहे. आचार्यांच्या मते नेति नेति सारख्या श्रुती सुद्धा तेच सांगतात की, परमात्मा म्हणजेच आत्मा असे आपण म्हणत असलो तरीही तसे नाही तो परमात्मा आपल्याहून वेगळा असा आहे.
शुद्ध भक्तीच्या या मार्गात हा महत्त्वाचा असा सिद्धांत आचार्यांनी मांडला आहे. या सिद्धांतामुळे आचार्यांच्या तत्त्वज्ञानाला "भेदवाद" असेही नाव पडले. या सिद्धांतामुळे भगवंत आणि मी त्याचा दास, हा भाव निर्माण होण्यास मदत होते व त्याच्या कृपेने कालांतराने तो भाव अधिक दृढ होतो. तेव्हा हा सिद्धांत त्या गुणपरिपूर्ण अशा भगवंताचे दास्य करण्यासाठी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करू.
क्रमशः
श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग ३
तत्त्ववादाचे पहिले प्रमेय आपण पाहिले. हरिः परतरः असे ते आहे. आता दुसरे प्रमेय बघुया.
२. सत्यं जगत् - जगन् मिथ्या आहे हे आपण सर्वच ऐकत आलेलो आहोत. मिथ्या म्हणजे खोटे असा सामान्यतः अर्थ होतो. पण क्षणिकत्त्वासाठी मिथ्या हा शब्द वापरला आहे असे अद्वैतमतवादी म्हणतात. आज आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी जश्या आहेत, तश्या त्या उद्या नसतील. त्यात काहीतरी बदल होणार आहे, यासाठी त्यास "मिथ्या" असे संबोधले जाते. मग काहीजण म्हणतात खरे आणि काहीजण म्हणतात खोटे या तर विरूद्ध गोष्टी आहेत. आणि विरुद्ध गोष्टी वादाला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे मिथ्याचा आणि सत्याचा वाद चालू राहिलेलाच आहे. पण यात वाद घालण्यासारखे खरंच काही आहे का ते आपण पाहू.
मध्वाचार्य हे काही नुसते विचारवंत नव्हते. विचारवंतांच्या सिद्धांतांमध्ये दोष असतात. पण सत्पुरूषांच्या सिद्धांतांमध्ये दोष नसतात. कारण ‘आधी केले, मग सांगितले’ हा भाव त्यात असतो. तत्त्वावादाविषयीच्या पहिल्या भागात जसे आपण बघितले की, मध्वाचार्य झटले ते खरा वेदार्थ प्रत्येकाला आपल्या जीवनात आचरता यावा यासाठी. कुठलाही सिद्धांत हा जर आपल्याला आपल्या आचरणात आणताच आला नाही तर त्याचा उपयोग काय? हेच मध्वाचार्यांचे कार्य आहे. केवळ विरोधाला विरोध आणि वाद निर्माण करण्यासाठी मध्वाचार्यांनी सत्यं जगत् सांगितलेले नाही.
द्वैत म्हटले की, दृश्य आले, दृश्य आले की त्यात अडकणे आले वगैरे आपण द्वैताबद्दल केली जाणारी शेरेबाजी ऐकतो. हा अर्थ खूपच प्राथमिक अर्थ आहे आणि तो खरा देखील आहे. पण मध्वाचार्यांनी या पलिकडे सांगितलेले आहे. जो सत्पुरूष वयाच्या १६व्या वर्षी आपणहून संन्यासाश्रम स्वीकारण्यासाठी गुरूंकडे जातो, जो जनमानसला शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवतो, ज्या सत्पुरूषास भगवान वेदव्यास ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिण्यास सांगतात, तो सत्पुरूष या जगातील दृश्य वस्तूंमध्ये अडकेल का? किंवा त्या दृश्यात अडकण्यास सांगेल का? याचा प्रत्येकानेच विचार करावा. आज जगात जे जे दृश्य दिसत आहे ते तसे राहणार नाही हे मध्वाचार्य स्वतः सांगतच आहेत. फक्तं मध्वाचार्य एक महत्त्वाची गोष्टं सांगतात ती अशी की, जगातील दृश्य वस्तू आज आहेत, तश्या राहणार नसल्या तरी त्याचे अस्तित्त्व आपल्याला नाकारता येणार नाही. भगवंतापर्यंत जायचे असल्यास आपण जे साधन करू ते या जगात राहूनच, या जागतील दृश्य वस्तूंच्या साहाय्यनेच करणार आहोत आणि म्हणून त्याचे अस्तित्तवंही तितकेच महत्त्वाचे आहे. वेद-ग्रंथ, पुराणे यातून आपल्याला भगवंताचा बोध होतो, आणि त्यातील ज्ञान आचरता येते या जगात राहूनच, त्यामुळे ते मिथ्या नाही. भगवंतापर्यंत जायचे, ते या जगात राहूनच म्हणून हे जग सत्य आहे. या जगाला, मध्वाचार्य सुरेख शब्द वापरतात, जो प्रत्येक साधाकाने लक्षात ठेवावा. जगातील वस्तू नाशिवंत आहेत हे विचारात घेऊन जगाकडे साधनभूमी म्हणून बघावे.
जग मिथ्या आहे आणि जग सत्य आहे यावरून विद्वानांनी वाद का घातले असतील? यात कुठे काही वाद घालण्यासारखे आहे? प्रत्येकानेच ठरवा. पण हे जग साधनभूमी आहे असे म्हणून साधन करीत राहा. ते मात्र कुणीच विसरता कामा नये.
क्रमशः
श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग २
श्री व्यासतीर्थांनी लिहिलेला तत्त्वावादाचा श्लोक आपण विस्तृतपणे बघणार अहोत.
श्रीमन्मध्वमते हरिः परतरः सत्यं जगत तत्त्वतो ।
भेदो जीवगणाः हरेरनुचराः नीचोच्चभावङ्गताः ॥
मुक्तीर्नैजसुखानुभूतिरमलाभक्तीश्च तत्साधनं ।
ह्यक्षादित्रितयं प्रमाणमखिलाम्नायैकवेद्यो हरिः ॥

श्री व्यासतीर्थांनी अतिशय उत्तमरीत्या पूर्ण तत्त्ववाद या एका श्लोकात बसविला आहे. या श्लोकातून तत्त्ववादाची ९ प्रमेय आपल्या पुढे येतात. ती आपण एक-एक करून पाहू.
१. हरिः परतरः - हरि म्हणजे भगवान विष्णु, श्रीमन्नारायण हेच सर्वोच्च आहेत. तेच सर्वश्रेष्ठ आहेत. परब्रह्म तत्त्व म्हणजेच नारायण आहेत. नारायण सूक्तामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहेच. नारायण परब्रह्म तत्त्वं नारायण परः । स्वतः नारायणांनीच हंसरूपाने येऊन चतुर्मुख ब्रह्मदेवांना उपदेश केला. चतुर्मुख ब्रह्मदेवांचे गुरू म्हणजेच नारायण आहेत.
नारायण असे उच्चरले की, शंख, चक्र, गदा,पद्म धारण केलेले, शेषशयनी असलेले असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण मध्वाचार्यांनी नारायणाला या पलिकडे जाणले आहे. तैत्तिर्य उपनिषदामधील परब्रह्माची व्याख्या सत्य, ज्ञान, अनंत यांनी युक्त असलेले तत्त्व अशी आहे. आणि हेच खऱ्या नारायणाचे स्वरूप आहे. ते निराकार आहे. अनंत आणि परिपूर्ण अश्या गुणांचे ते तत्त्व आहे. बृह् धातूपासून ब्रह्म शब्द तयार होतो. बृह् म्हणजे वाढणे किंवा वृद्धि पावणे. जे अतिशय मोठे आहे ते म्हणजे ब्रह्म. याचाच अर्थ त्याच्यापासून दुसरे कुणी मोठे नाही. त्यामुळे असे परब्रह्म तत्त्व नारायण सर्वोच्च आहेत. परिपूर्ण गुणांनी युक्तं असलेल्या, सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि विनाश इत्यादी कार्ये करणाऱ्या परब्रह्म नारायाणाचे वर्णन मध्वाचार्य पुढील प्रमाणे करतात,
नारायणाय परिपूर्ण गुणार्णवाय ।
विश्वोदयस्थितिलयोन्नियति प्रदाय ॥
ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्य दुःख ।
सत्कारणाय वितताय नमो नमस्ते ॥
आणि म्हणूनच मध्वाचार्य स्पष्टपणे सांगतात की परब्रह्म तत्त्व हे "सगुण" आहे. सामान्यतः सगुणाची व्याख्या सत्व,रज,तम गुण असलेले सगुण अशी आहे. ही सगुणाची व्याख्या मध्वाचार्यांना येथे अपेक्षित नाही. परब्रह्म तत्त्व अनंत आणि परिपूर्ण गुणांनी युक्त असल्यामुळे त्याला सगुण असे म्हटले आहे. पण ते जाणण्यासाठी, त्याच्या अनुभूतीसाठी सत्व,रज,तम या गुणांनी युक्तं असलेल्या तत्त्वाची गरज आहे. या त्रिगुणातूनच सगुणाकडे प्रवास करायचा आहे. खऱ्या परब्रह्म तत्त्वाची अनुभूती ही साक्षात्कारी पुरूषांनी घेतलेली असते. आपल्यासाठी ते शक्य तितके त्याचे रूप, वर्णन करत असतात पण ते वर्णना पलिकडचे तत्त्व असल्यामुळे त्यात त्यानांही मर्यादा येतात. मध्वाचार्य सांगतात की, देहबुद्धीने जाणण्याचा हा विषय नाही. त्यामुळे देहबुद्धीने याचा अनुभव घेता येत नाही. हे तत्त्व केवळ आणि केवळ ‘साक्षी’ ही आत्म्याची शक्ती जाणू शकते.
असे परब्रह्म तत्त्व गुणांनी युक्त आहे. तेथे कुठलाच दोष नाही. दोषविरहित असे ते आहे. नारायण या शब्दाचा अर्थही तोच आहे. अर म्हणजे दोष. न हा विरूद्धार्थी अर्थ दर्शवतो. त्यामुळे त्याचे नार असे होते. जो दोष विरहित आहे आणि गुणांनी युक्त आहे असा नारायण. असा हा नारायण सर्व जीवांमध्ये प्रतिबिंब रूपाने निवास करत आहे. त्याचे स्मरण, त्याची अनन्य भक्ती हीच त्या बिंबरूपी सगुणब्रह्मापर्यंत आपल्याला नेईल असे मध्वाचार्य सर्वांना सांगत आहेत.
क्रमश:
श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग १
१६व्या वर्षी वासुदेवाने अच्युतप्रेक्षतीर्थांकडून संन्यास दीक्षा घेतली. आणि त्याचे पूर्णप्रज्ञ असे नाव ठेवण्यात आले. त्यांनी ज्या रचना केल्या त्या आनंदतीर्थ किंवा सुखतीर्थ या नाममुद्रेने. पण ते प्रसिद्धं झाले ते मध्वाचार्य नावाने. वेगवेगळ्या मतांच्या आचार्यांनी जे अनुभवले ते सांगितले. ते अनुभवले या जगात राहून. त्याचे मिथ्यत्त्व मान्य केले आणि मायेचे वर्चस्व मान्य केले तर आलेला चूक किंवा बरोबर अनुभवही मिथ्या म्हणावा लागेल. इथूनच तत्त्ववाद सुरू होतो.
तत्त्ववादी आणि अद्वैतवादी किंवा अन्यही एकमेकांशी वाद घालत असले तरी येथील वादाचा तो अर्थ नाही. परब्रह्म तत्त्वाविषयी, ते जाणून घेण्याविषयी जे सांगितले त्यास "तत्त्ववाद" म्हणतात. मध्वाचार्य म्हटले की "द्वैतमत" एवढेच आपल्या मनात येते. पण थोडा त्यापलिकडचा विचार आपण येथे करणार आहोत. मध्वाचार्यांनी स्वतः किंवा त्यांच्यावर लिहिणाऱ्या कुणीही त्यांच्या मतास द्वैतमत म्हटलेले नाही. त्यांच्या विषयीच्या एका श्लोकात आपल्याला याचा उल्लेख सापडतो.
योविप्रलम्ब विपरीत मतिप्रभूतान वादान निरस्य कृतीवान‍ भुवि"तत्त्ववादम‍" ।
तत्त्ववाद आधी येतो मग द्वैतमत येते. आचार्यांनी सांगितलेल्या पंचभेदांमुळे ते द्वैतमत आहे. पण तत्त्ववाद हा मुख्य आहे. तो जाणून घेतला तर मग द्वैता-अद्वैता पलिकडे पाहता येईल.
द्वैत म्हटले, की फक्त द्वैत एवढेच गृहीत धरून आपण ते मत जाणून घेत नाही. वेद, उपनिषदे तर अद्वैत तत्त्वज्ञान सांगतात आणि इथे फक्त द्वैत देहात असताना ठिक आहे पण देह सोडल्यानंतरही इतकेच नव्हे तर मुक्तीतही? मग चार मुक्तींपैकी सायुज्य आणि सारूप्य तर इथे होणारच नाही कारण भगवंत हा आपल्यापेक्षा वेगळा आहे आणि तो तसाच कायम वेगळाच राहतो. हे आणि असे असंख्य प्रश्नं आपल्या मनात सहाजिकच येतात. या आणि अश्याच अजून प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि तत्त्ववाद थोडक्यात जाणून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
खरा वेदांचा अर्थ प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात आचरता येईल, आणि भगवंताविषयी भक्ती वाढून या जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होता येईल यासाठी मध्वाचार्य झटले. सगळ्याच आचार्यांनी मानवाच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले आहे. आपल्या बुद्धीला पटेल आणि तत्त्वज्ञान आपण आपल्या जीवनात उतरवू शकू यासाठी मध्वाचार्यांनी विशेष कार्य केले आहे. आणि यासाठीच त्यांचा तत्त्ववाद महत्त्वाचा आहे. मध्वाचार्य म्हणजे द्वैत या समीकरणा पलिकडे जाऊन आपण तत्त्ववाद समजून घेतला पाहिजे.
जीवांमधील उच्च, उत्तम असा जीव म्हणजे वायू आहे. वायू प्रत्येक जीवात निवास करून आहे. आपला श्वासोच्छ्वास ही त्याचीच खूण आहे. असा उत्तमातला उत्तम, श्रेष्ठ वायू ज्याची भगवंतावर विशेष प्रिती आहे. भगवंतांशी अधिक निकटचा संबंध वायूचा आहे. आणि अश्या वायूचे अवतार म्हणजे मध्वाचार्य मग ते भगवंताविषयी जे काही सांगतील त्यातील काना, मात्रा, ऊकार, वेलांटी सर्व काही सगळे सत्य आहे. भगवंताने त्या कार्यासाठीच त्यांना पृथ्वीवर पाठवले. परशुराम माहात्म्यात याचा उल्लेख आढळतो -
ब्राह्मणा तो रक्षिल । विष्णुभक्ती तो वाढवील । पाषंडियासी जिंकील । ईश्वराज्ञेनी ॥
(अध्याय ३२वा ओवी ३५वी)
मध्वाचार्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाने सर्व ग्रंथ अभ्यासले. पण जो अनुभव आला, तो अद्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे नव्हता. आणि त्यानंतर बद्री येथे स्वतः वेदव्यासांनी दर्शन दिले. आणि त्यांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने ब्रह्मसूत्र भाष्य लिहिले. आणि हेच तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्ववाद! हे मत म्हणजे वेदग्रंथामधील व्याकरणाप्रमाणे घेतलेला अर्थ, आपल्या सोयीने लावलेला अर्थ, किंवा काही श्रुतींचा अर्थ द्वैत तत्त्वज्ञानाप्रमाणे आहे मग फक्तं त्याचाच आधार घेऊन मध्वाचार्यांनी मत स्थापले असे वाटत असल्यास त्यात तथ्य नाही. मध्वाचार्यांचा आत्मानुभव तर येथे आहेच पण इतिहासात अश्या नोंदी आहेत की मध्वाचार्यांनी जे भारत भ्रमण केले तेव्हा ते अनेक पंडितांना भेटले. त्यांच्याकडून किंवा इतर ठिकाणहून मिळतील तसे वेदांवरील, पुराणांवरील अनेक दुर्मिळ ग्रंथ मिळवले. उडुपी येथे ते जिथे राहत असत तिथे त्यांचे एक प्रचंड मोठे असे ग्रंथालय होते. याचा अर्थ असा की, वेद-पुराणांमधला नेमका अर्थ जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, जे प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात आचरता येईल असा सिद्धांत प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा आणि भगवंतावर अनन्य भक्ती हा मुख्य मार्ग हा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मध्वाचार्यांनी आपले आयुष्य वेचले. असा हा तत्त्ववाद आपण जाणून घेऊ. विस्तृतपणे आपण नंतरच्या काळात तत्त्ववाद जाणून घेणारच आहोत पण थोडक्यात जाणून घेण्यासाठी श्री व्यासतीर्थांच्या तत्त्ववादाविषयीच्या एका श्लोकाचा आपण अभ्यास करू.
क्रमश:
मध्वाचार्यांचे पहिले शिष्य श्री श्री पद्मनाभतीर्थ
॥ श्रीराम ॥
श्री श्री पद्मनाभतीर्थ (१३१७-१३२४)
गुरू : श्री मध्वाचार्य
शिष्य : नरहरी तीर्थ
आराधना तिथी : कार्तिक कृ. चतुर्दशी
वृंदावन स्थळ : नव-वृंदावन.
द्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य म्हणजेच आनंदतीर्थ यांचे हे शिष्य. साक्षात मध्वाचार्यांचे शिष्यं होण्याचे भाग्य पद्मनाभ तीर्थांना लाभले. पूर्वाश्रमात पद्मनाभ तीर्थांचे नाव "शोभन भट्ट" होते. ते अद्वैत मताचे त्याकाळचे मोठे विद्वान होते. अद्वैत तत्त्वज्ञानात ते निष्णात होते. तर्कशास्त्रात ते पारंगत होते. वेद, पुराणांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. ते गोदावरी नदी जवळच्या भागातून उदयास आले. त्यांनी मोठ्या मोठ्या विद्वानांचा वादात पराभव केला होता. त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरली होती. यानंतर त्यांचा साक्षात मध्वाचार्यांशी वाद झाला. आणि त्याचे रूपांतर शोभन भट्टांचे द्वैतमत स्वीकारून मध्वाचार्यांकडून संन्यास घेण्यात झाले. द्वैतमत तर्कावर आधारलेले आहे, परत वेद उपनिषदांचा अर्थ ते व्याकरणाप्रमाणे घेतात त्यामुळे ते वाद जिंकतात असे सर्वांचे म्हणणे असते. पण पद्मनाभतीर्थांकडे पाहिले तर हे आपल्याला लक्षात येते की, ते आधीचे शोभन भट्ट तर्कशास्त्रात पारंगत परत अद्वैती, वेद-उपनिषदांचा अभ्यास मग तसे पाहायला गेले तर मध्वाचार्य त्यांना कसे हरवू शकले? याचं उत्तर म्हणजे, मध्वाचार्यांकडे आत्मानुभव होता जो शोभन भट्टांकडे नव्हता. त्यामुळे तर्क, व्याकरण या गोष्टी असल्या तरी जेथे अनुभव नाही तेथे याचा उपयोग नाही. ब्रह्मानंद महाराज आणि गोंदवलेकर महाराज यांचा प्रसंगही असाच आहे. ब्रह्मानंद प्रचंड विद्वान होते. महाराजांकडे आल्यावर ते एकच म्हणाले माझी विद्वत्ता घेतली म्हणा. महाराज म्हणाले अरे मी गावातलं काही शिकलो नाही तू एवढं शिकलेला आहेस मी कोण तुझी विद्या घेणारा पण तेव्हा ब्रह्मानंद म्हणाले पण जे तुमच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे ते या विद्येने मला दिलं नाही. आणि तो म्हणजे आत्मानुभव!
१२६३ मध्ये मध्वाचार्यांचे शिष्यत्त्व स्वीकारल्यावर आता गुरूंशिवाय आपल्याला काही नाही. त्यांनी आपल्याला दिलेल्या मताचा आणि त्यांच्या सर्व वाङ्मयाचा प्रसार हेच कार्य करायचे हे पद्मनाभतीर्थांनी जाणले. मध्वाचार्यांच्या ग्रंथांचा अर्थ अधिक सुलभ रितीने समजता यावा यासाठी त्यांनी त्यांच्या ग्रंथांवर टीका केली. सतर्क रत्नावली आणि सन्याय रत्नावली ही त्यांची ब्रह्मसूत्रभाष्य आणि अणुव्याख्यानावरची टीका पद्मनाभतीर्थांनी लिहिली. याशिवाय आनंदमाला, वायुलीलाविस्तारणा, मायावादखंडन, उपाधीखंडन असे ग्रंथ रचले. १३१७ मध्ये मध्वाचार्य बद्री येथे अंतर्धान पावले आणि तेव्हापासून पद्मनाभतीर्थांनी माध्वं सांप्रदायाची धुरा सांभाळली. सात वर्ष श्री रामचंद्रांची पूजा करून समाधी घेण्याच्या अगोदर त्यांनी नरहरी तीर्थांना शिष्य केले आणि सर्व कारभार दिला. तसेच मध्वाचार्यांनी पूजा केलेली गोपीनाथ देवाची मूर्ति लक्ष्मीधरतीर्थ यांना दिली. ध्रुवाचे अंश असलेल्या श्रीपादराज स्वामींनंतर तोच मठ पुढे श्रीपादराज मठ म्हणून नावारूपास आला. १३२४ साली श्री पद्मनाभतीर्थांनी नव-वृंदावन "अनेगोंदी" तुंगभद्रेच्या काठी समाधी घेतली.
पूर्णप्रज्ञकृतं भाष्यमादौ तद्‍भावपूर्वकम ।
योव्याकरोन्नमस्तस्मै पद्मनाभाख्ययोगिने ॥
श्री मध्वसंसेवन लब्ध गोपाकृतीर्भक्ति निषेवणेन ।
लोकेषु विख्यात सुकीर्तिमंतम् श्रीपद्मनाभार्य मुनिं प्रनौमि ।।
पद्मनाभतीर्थांनी रचलेले ग्रंथ :
मायावाद खंडन टीका
उपाधी खंडन टीका
प्रपंचमिथ्यत्त्वनुमान खंडन टीका
कथा लक्षण टीका
गीता भाष्य टीका
गीता तात्पर्यनिर्णय टीका
सत्तर्क दीपावली (ब्रह्मसूत्रभाष्य टीका)
सन्न्याय टीका
तत्त्वोद्योत टीका
प्रमाणलक्षण टीका
विष्णुतत्त्वनिर्णय टीका
वायुलीला विस्तारण
तत्त्वविवेक टीका
कर्मनिर्णय टीका
तत्त्वसंख्यान टीका
श्री श्री सुज्ञानेन्द्रतीर्थ स्वामींनी रचलेले रामायणावरील प्रभात पंचक.
१८३६ ते १८६१ हा त्यांचा कालखंड होता. ते राघवेंद्र स्वामी मठाच्या पीठावरील होते. ते खूप ज्ञानी होते. त्यांनी संपूर्ण रामायण कथा पाच श्लोकांमध्ये बांधली. श्री राघवेंद्र स्वामींनी "श्री राम चरित्र मंजिरी" मध्ये संपूर्ण रामायण कथा ११ श्लोकांमध्ये बसविली होती. सुज्ञानेन्द्रतीर्थांनी थोडे पुढे जाऊन रामायण कथा ५ श्लोकांमध्ये बसविली. त्यामुळे रोज पूर्ण रामायण म्हणता येते.
प्रात: स्मरामि रघुराममनेकरक्षो भीतस्वभक्तजनता परिपालनाय ।
जातं स्वतो दशरथादिति कैतवेन नीति प्रकाशित महामुनि शिष्याभावं ॥१॥
अर्थ : राक्षसांपासून भयभित झालेल्या भक्ताना तारण्यासाठी श्री रामाने स्वत: या जगात राजा दशरथाचा मुलगा म्हणून अवतार घेतला. विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्याबरोबर यज्ञ रक्षणासाठी घेतेले. श्री रामांनी विश्वामित्रांचे शिष्यत्त्व स्वीकारले आणि त्यांच्याकडून पवित्र वेद ऋचा शिकून घेतल्या. अश्या श्री रामाचे सकाळी स्मरण करूया.
प्रातर्भजामि गुरुसत्रविरोधीरक्षो जातं निहत्य कलयन विमालामहल्यां ।
यातां सतीसारणिमीशधनुश्च भंक्त्वा सीतामवाप्य पथि दर्शित भार्गवैक्यं ॥२॥
अर्थ : ऋषींच्या यज्ञामध्ये व्यत्यय आणणार्या राक्षसांचा श्री रामाने संहार केला. त्यानंतर श्री रामांनी रामांची वाट बघत असलेल्या शापित अहिल्येचा उद्धार केला. अर्थ : ऋषींच्या यज्ञामध्ये व्यत्यय आणणार्या राक्षसांचा श्री रामाने संहार केला. त्यानंतर श्री रामांनी रामांची वाट बघत असलेल्या शापित अहिल्येचा उद्धार केला. यानंतर प्रभू रामांनी राजा जनकाच्या महालात शिवधनुष्य उचलून ते तोडून सीतेचे स्वयंवर जिंकले. मग श्रीराम अयोध्येस परत जात असताना भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेले परशुराम रामांमध्ये विलीन झाले.
प्रातर्नमामि पुरमाप्य पितुर्निदेशात भ्रातु:प्रदाय निजराज्यमरण्यमेत्य ।
सीतां स्थितामपह्नतेति चरन तदाप्तै वातात्मजोक्तिसचिवीकृतसुर्यसूनुं ॥ ३ ॥
अर्थ : अयोध्येस परत आल्यावर आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार रामांनी आपल्या धाकट्या भावाला भरताला राज्य दिले आणि वनवासात निघून गेले. (सीता व लक्ष्मणा सहित). सीतेचे अपहरण झाल्यावर तिच्या शोधार्थ श्री राम जात असताना त्यांची वायुपुत्र हनुमंतांशी भेट होते, जे सूर्यपुत्र सुग्रीवाकडे मंत्री होते. हनुमंतांच्या सांगण्यावरून श्री राम सुग्रीवाचा भाऊ वाली याकडील राज्य सुग्रीवाला परत मिळवून देतात. अश्या रामचंद्रांना मी प्रातःकाळी नमस्कार करतो.
टीप : श्री राघवेंद्र स्वामींच्या "राम चरित्र मंजिरी" मधल्या सहाव्या श्लोकामध्ये देखील सुग्रीवाचा सुर्यपुत्र असा उल्लेख आपल्याला आढळून येतो.
प्रातर्निरंतरमहं मनसार्चयामि सीतास्थितिम दशमुखस्य वने विदित्वा ।
ज्ञात्वा च लौकिकवदाप्तमरुत्सुतेन सेतुं निबध्य जलधौ हतरावणादिम ॥ ४ ॥
अर्थ : हनुमंतांना सीतेच्या शोधात यश येते आणि ते श्री रामांचे क्षेमकुशल सीता माईना सांगतात. आणि रामचंद्रांकडे परत आल्यावर सीता माईबद्दल सांगतात. लंकेस जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्यास तसेच रावणाविरुद्ध युद्ध करून त्यात विजय मिळवण्यात हनुमंत श्री रामांची मदत करतात. प्रातः काळी श्री रामांची मी नित्य आराधना करतो.
प्रातः स्तवीमि दशकंधरराज्यमस्य भ्रातुः प्रदाय दहने विनिपात्य यातां ।
सीतां प्रग्रह्य भरतार्पितसर्वराज्य पातारमात्म शरणामरधेनु रत्नम ॥ ५ ॥
अर्थ : श्री रामांनी रावणाविरुद्धचे युद्ध जिंकून लंकेचे राज्य विभिषणाला दिले. विभिषणाने आपल्या भावाचे रावणाचे अग्निसंस्कार केले. सीतामाई बरोबर राम अयोध्येस परत आले आणि भरताकडून राज्यपद स्वीकारतात. पवित्र गाई (अमर धेनु) प्रमाणे असलेल्या भगवंताला मी शरण जातो. आणि अश्या प्रभू रामचंद्रांची मी प्रातः काळी प्रार्थना करतो.
टीप : रावणाला दशानन वगैरेनेच संबोधले जाते. पण इथे त्याचा उल्लेख दशकंधर असा केला आहे. म्हणजे दहा माना असलेला. तसेच रामांना अमर धेनु हे विशेषण वापरले आहे. याचे कारण असे की हनुमंतांनी रामायणाच्या शेवटी रामचंद्रांच्या ज्या स्वरूपाचे ध्यान केले ते हे अमर धेनु स्वरूप होते.
फल:स्तुति
श्री मध्वसुजनेन्द्रै तन्मध्यस्थगुरुह्र्द्गतः रामः प्रीतोस्तु वाग्रत्नैः कर्मन्दिविभवोचितैः ।
सुजनेन्द्रकराब्जोत सुज्ञानेन्द्रयतीरितं प्रभातपंचकं नित्यं पठन रामप्रियो भवेत ॥ ६ ॥
अर्थ : या प्रार्थनेमुळे श्री मध्वाचार्यांच्या तसेच श्री सुजनेन्द्रतीर्थांच्या हृदयी निवास करणारे श्री रामचंद्र कृपा करोत. श्री सुजनेन्द्रतीर्थांचे शिष्य श्री सुज्ञानेन्द्रतीर्थांनी केलेल्या या प्रभात पंचकाचे जो नित्य पठण करेल त्याच्यावर रामचंद्रांची पूर्ण कृपा राहील.
द्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हे चरित्र थोडक्यात देत आहे. नंतर आपण पुढील दिवसात ते सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
मध्वाचार्य (१२३८-१३१७)
मध्वाचार्य आनंदतीर्थ आणि पूर्णप्रज्ञ या नावांनीही ओळखले जातात. ते वायु देवाचे अवतार आणि द्वैत मताचे स्थापक आहेत. वायुचा पहिला अवतार हनुमान, दुसरा भीम आणि तिसरे मध्वाचार्य अशी धारणा किंवा एक अख्यायिका नसून पवमान सूक्तं, बळित्था सूक्तं, वायु पुराण, स्कंद पुराण, परशुराम महात्म्य यात वायु आणि त्याच्या पुढील अवतारांचा उल्लेख आहे त्यानुसार मध्वाचार्य हे वायु देवाचा तिसरा अवतार आहेत. त्यांनी जे तत्त्वज्ञान मांडले त्यास "तत्त्ववाद" असे म्हणतात. त्यांचे तत्त्वज्ञान भक्तीमार्गाला अनुसरून आहे.
जन्म : एक अपंग व्यक्ती एका देवळाच्या ध्वज स्तंभावर उभी राहून आज वायु देव वैदिक धर्म बळकट करण्यासाठी, सुधारण्यासाठी जन्मं घेणार आहेत असे सांगत होता. त्याप्रमाणे १२३८ साली विजयादशमीच्या दिवशी उडुपी जवळील "पाजकक्षेत्र" येथे मध्वाचार्यांचा जन्मं झाला. त्यांचे वासुदेव असे नाव ठेवण्यात आले. मध्यगेह भट्ट हे त्यांच्या वडिलांचे आणि वेदवती त्यांच्या आईचे नाव होते. लहानपणापासूनच त्यांना भगवान नारायणावर विशेष प्रेम होते. बुद्धी तल्लख होती त्यामुळे वडिलांकडून सुरूवातीचा विद्याभ्यास खूप लवकर आत्मसात केला. त्यानंतर सातव्या वर्षी त्यांचे उपनयन करण्यात आले आणि पुढील अध्ययन सुरू झाले. याचबरोबर ते बलशाली होते. पोहण्यात तरबेज होते. शरीराची ताकद, धष्टपुष्ट असे शरीर आणि भारत भ्रमण या दोन्ही गोष्टी आपल्याला दोन सत्पुरूषांच्या बाबतीत बघायला मिळतात. एक म्हणजे मध्वाचार्य आणि दुसरे महाराष्ट्रातील १६व्या शतकातील एक थोर सत्पुरूष समर्थ रामदास स्वामी.
कार्य : वयाच्या सोळाव्या वर्षी वासुदेवाने एकदंडी एकांती वैष्णव परंपरेतील अच्युतप्रेक्षतीर्थ यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. आणि त्यांचे पूर्णप्रज्ञ असे नाव ठेवण्यात आले. मध्वाचार्यांनी गुरूंकडून अद्वैतानुसार सगळे अध्ययन पूर्ण केले. पण त्यांचे समाधान होत नव्हते. म्हणून त्यांनी स्वतः पुन्हा उपनिषदे, गीता,इतिहास, पुराणे आणि ब्रह्मसूत्रांचा अभ्यास केला. आणि त्यानंतर ज्यासाठी अवतार झाला होता ते द्वैतमत स्थापन केले. विशेष म्हणजे त्यांचे गुरू अच्युतप्रेक्षतीर्थ यांनीही ते द्वैतमत मान्य केले आणि असा शिष्यं मिळणे हे आपले भाग्यच समजले.
यानंतर त्यांनी गुरू आज्ञेनुसार मत प्रचार करण्यास सुरूवात केली. अनंतशयन, कन्याकुमारी,श्रीरंगपट्टण,रामेश्ववरम या ठिकाणांचे संचार करत असताना त्यांनी दर्शन घेतले. हा संचार करत असताना त्यांनी त्यांचा तत्त्ववाद हा लोकांना समजावून सांगितला. त्यांची प्रवचने त्याविषयीच चालत. त्यावेळचे विद्वान कर्मठ लोकांचा त्यांच्या सांगण्याला विरोध होता. पण आचार्यांचे कार्य ठरलेले होते. त्यांनी कर्मठ विद्वानांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपल्या मताचा प्रचार केला. आपण अनुभवलेले सत्य ब्रह्मसूत्र, गीता या सगळ्यात आहे म्हणूनच त्यांनी उडुपी येथे श्रीमद्‍भगवत गीतेवर भाष्य लिहिले.
भगवान नारायण रामचंद्र असताना हनुमानांनी त्यांची सेवा केली. कृष्ण असताना भीमाने त्यांची सेवा केली आणि वेदव्यास असताना मध्वाचार्यांनी त्यांची सेवा केली. मध्वाचार्यांनी बद्रीसाठी प्रयाण केले. तिथे वेदव्यासांच्या प्रेरणेनुसार त्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले. आता त्यांचे नाव पंचक्रोशित पसरले होते. सर्व विद्वान मंडळी त्यांच्या मताचा स्वीकार करत होती. उत्तर भारतातून परत येत असताना गोदावरी नदीच्या जवळील भागातील अद्वैतावादी, तर्कशास्त्रात निष्णात, व्याकरणात पक्के अश्या एका शोभन भट्टं नावाच्या विद्वानाशी मध्वाचार्यांची गाठ पडली. त्यांच्यात द्वैत अद्वैताचा वाद झाला त्याची परिणीती शोभन भट्टं हे मध्वाचार्यांचे शिष्यं झाले आणि त्यांच्याकडून पहिल्यांदा संन्यास दीक्षा घेण्याचे भाग्य त्यांना लाभले.
कृष्णमूर्ती स्थापना : उडुपीच्या समुद्र किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे ध्यानासाठी गेलेले असताना वादळात अडकेलेली दिशाहीन नौका आचार्यांना दिसली. त्यांनी आपली छाटी दाखवून त्यांना किनाऱ्याकडे सुखरूप आणले. ती व्यापारी नौका होती. त्यात द्वारकेतील चंदनाचे खडे होते. त्याचा मालक मध्वाचार्यांना म्हणाला तुमच्यामुळे आम्ही सुखरूप आहोत ही आमच्याकडून तुम्हाला भेट. आम्ही संन्यासी आहोत आम्ही काय करणार या भेटवस्तूंचे? तुम्हाला काहीतरी घ्यावेच लागेल असे म्हटल्यावर आचार्यांनी ठीक आहे द्यायचेच असेल तर भगवंताला प्रिय असणारा चंदनाचा एक खडक द्या. त्याने तो आणून दिला. आणि आशिर्वाद घेऊन निघून गेले. मध्वाचार्य तो खडक उचलून भगवंताची स्तुती गात गात येत होते. यालाच द्वादश स्तोत्रं असे म्हणतात. या बारा अध्यायात भगवंताच्या गुणांविषयी, अवतारांविषयी सांगितलेले आहे. त्यांनी तो खडक सरोवरात टाकला टाकल्यानंतर त्यातून एक रवीधर कृष्णाची मूर्ती बाहेर आली. मुरलीधर,चक्रधर,राधाधर कृष्ण आपण बघतो पण रवीधर कृष्ण हा फक्तं उडुपी येथेच आहे. नंतर आचार्यांनी कृष्णाची स्थापना केली. तो रवीधर कृष्ण आजही आपल्यातल्या दोषांचं मंथन करून आपल्यातील भक्ती वाढवण्यासाठी उडुपी येथे आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन : काही यज्ञांसाठी प्राण्यांचा बळी द्यावा लागत असे हे आचार्यांना सहन झाले नाही. वैदिक कर्म महत्त्वाचे आहे पण त्यासाठी आपण एका निष्पाप जीवाचा बळी देणे हे आचार्यांना सहन झाले नाही. यासाठी त्यांनी एक उपाय सांगितला आहे, पीठापासून प्राण्यांची प्रतिकृती तयार केली जाऊ शकते आणि त्यावर आपण आपले वैदिक कर्म करू शकतो. सुरूवातीला हे श्रुतींना धरून नाही म्हणून त्यावेळच्या ब्राह्मणांनी विरोध केला पण आचार्य म्हणाले आपण त्यातील योग्य अर्थ घेणे अपेक्षित असते, ज्या श्रुती आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतात, तो भगवंत, जो हे जीव निर्माण करतो, मग त्यांना मारणे हे खरे म्हणजे श्रुतींना अनुसरून नसले पाहिजे. नंतर सर्व ब्राह्मणांना हे पटले आणि त्यांना या उपायाचा स्वीकार केला. निर्मूलन बंडखोरीने नाही तर सामंज्यसाने अभ्यासाने सुवर्णमध्य काढून करता येते हेही आपले आचार्य आणि सगळेच पूर्वज आपल्याला शिकवून गेले आहेत!
यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बद्रीसाठी प्रयाण केले. तेथे वेदव्यासांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाभारत तात्पर्य निर्णय हा ग्रंथ लिहिला. परत येताना त्यांनी काशी आणि नंतर गोवा येथे भेटी दिल्या. तेथे त्यांनी भगवंतावरची सुरेख पदे गायली जी तिथल्या लोकांना विशेष आवडली. सामर्थ्यावार,बलशाली शरीर, तल्लख बुद्धी याच बरोबर आचार्य फार सुरेख गात.
त्यांच्या दुसऱ्या यात्रेनंतर ते उडुपी येथे आले. आणि त्यांनी कृष्णाच्या नित्यपूजेसाठी आठ मठांची स्थापन केली. तेच अष्ट-मठ म्हणून आजही उडुपी येथे आहेत. यानंतर १३१७ साली वयाच्या ७९व्या वर्षी अवतार कार्य संपवून आपल्या तत्त्ववादाची धुरा आपल्या शिष्यांकडे सोपवून अंतर्धान पावले.
करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥1॥
लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥2॥
तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥3
चालता चालता पंढरी वाट | पुण्य जोडली अनंत कोट ||धृ||
मग पावलीया पंढरीशी | अनंत कोटी पुण्य राशी ||१||
देता हरिनामाची हाक | महा पातकं घेती धाक ||२||
हाती वाजलिया टाळी | रंगी नाचतो तो वनमाळी ||३||
बोधला म्हणे आनंद झाला | विठोबा आपोआप आला ||४||