Thursday, September 15, 2016

"जय मंगलम नित्य शुभ मंगलम" (भाग १)
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. तसे व्रत एकाच दिवसाचे पण उत्सव हा प्रत्येकजण आपापल्या सोयीने साजरा करत असतो. काळ बदलला आणि त्याबरोबर उत्सवाचे रूप बदलले इतकच नाही तर त्या गणपती देवतेचे मूर्तरूपसुद्धा बदलले. सैराट,बाजीराव मस्तानी, आणि अगदी संघवेशातील गणपतीही यावर्षी पाहायला मिळाला चूक का बरोबर या वादात जाणे उचित नाही. ते प्रत्येकानेच ठरवावे. शेवटी ते तत्त्व आणि आपली त्याप्रती असलेली भक्ती महत्त्वाची.
तर अशाच गणेशोत्सवात गणपती, मोदक याबरोबर येणारी तिसरी सर्वांना प्रिय अशी असणारी म्हणजे आरती. आर्त या धातूतून हा शब्द तयार होतो. त्यातच त्याचा अर्थ आहे. आर्ततेने म्हटले जाणारे देवाविषयीचे, गुरूंविषयीचे स्तवन. साधारणतः ते म्हणत असताना आपले त्यानंतर मिळणाऱ्या प्रसादाकडे लक्ष असते पण मुख्यतः आरती म्हणताना आर्तता, भगवंताशी सद्गुरूंशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न त्यात असावा हा त्यामागील हेतू आहे.
महाराष्ट्रात संतांनी आपल्याला आरत्यांचं एकप्रकारे दालनंच खुलं करून दिलं. त्या आपण लहानपणापासून म्हणत असतो, ऐकत आलेलो असतो. महाराष्ट्र सोडून दक्षिणेतसुद्धा आरत्यांची परंपरा आहे त्यावर प्रकाश टाकून श्रीमन्मध्वाचार्यांवरील एका आरतीचा अर्थ समजून घेण्यासाठी हा लेखन प्रपंच.
जसं आपण "जयदेव जयदेव" म्हणतो, ते पद जसे ध्रुवपदात असते तसे दक्षिणेत "मंगलम" हे पद वापरले जाते. शब्द वेगवेगळे वापरले तरी देवाचा जय असो, त्याची किर्ती, ख्याती सांगण्यासाठी आरती रचलेली असते.
याचे अजून थोडे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, कर्नटक संगीतात गायनाच्या किंवा नृत्याच्या मैफिलीच्या शेवटी मंगलम सादर करण्याची प्रथा आहे. पूर्वी दिवासाच्या कुठल्या प्रहरात कुठले राग गावेत, कोणते स्वर आळवावेत, हे ठरलेले असायचे. त्याशिवाय इतर स्वर गायले गेले तर क्षमा किंवा माफी मागण्यासाठी विशिष्ट रागात जे भगवंताचे स्तवन गायले जायचे त्यास मंगलम म्हणतात. अशी ही प्रथा रूढ झाली. आता तसे प्रहराप्रमाणे स्वरांचे बंधन पाळले जात नसल्यामुळे संपूर्ण सादरीकराणाच्या अंती सादरीकरणात काही चूक झाली असेल तर क्षमा याचना करण्याच्या हेतूने मंगलम सादर केले जाते. तेही भगवंताचे एकप्रकारे स्तवनच असते. आरतीसुद्धा तशी प्रमुख उपचारांच्या अंतीच केली जाते. त्यानंतर क्षमा प्रार्थनेचा उपचार पूजेत येतो पण तसाच काहीसा भाव मंगलम मध्ये असतो. त्यामुळे असा हा आरती आणि मंगलम यांचा संबंध आपणास आढळून येतो.
कर्नाटक संगीताचा पाय हा श्रीमन्मध्वाचार्यांनी रचला. काव्य,नाटक,संगीत,नृत्य या सगळ्याचे सात्विक रसांनी युक्त असे मिश्रण मध्व सांप्रदायात विशेष करून पहायाला मिळते. त्यामुळे संगीताला विशेष महत्त्व इथे आहे. भगवंताच्या शयन सेवेला गायला जाणारा पाळणा खूप संतांनी रचलेला आहे. जो गात असतान अक्षरशः भगवंताला आपण निजवत आहोत हाच भाव मनात दाटून येतो. ज्याची सुरूवात लाली किंवा जो जो याने होतो. अशा रचनांची संख्या खूप आढळते पण मंगलम म्हणजे आरत्या त्या तुलनेत कमी आहेत. पण उपलब्ध असलेल्या मंगलमपैकी श्रीमन्मध्वाचार्यांचे मंगलम आपण पुढील तीन दिवसात जाणून घेणार आहोत. मुख्यप्राण, वायुदेवाचे तीन अवातार म्हणजे हनुमान, भीमसेन आणि श्रीमन्मध्वाचार्य या अवतारत्रयीचे वर्णन श्रीव्यासराज स्वामींनी या मंगलममधून केले आहे.
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये 

No comments: