Saturday, July 6, 2024
श्री गुरुदेवांचे अनमोल शब्द🪻
🌺 जगातील सर्व संत एका प्रकारचेच परमार्थिक जीवन जगत असतात. तसेच कन्नड संतांच्या परमार्थिक जीवनात नामाचे महत्त्व किती आहे हे निरनिराळ्या कन्नड संतांनी त्यांच्या पदातून सांगितले आहे. ते आपण श्री गुरुदेवांच्या अनमोल शब्दात कन्नड संतांचे विचार पाहूया.
🌺 हर एक श्वासोच्छवासाबरोबर देवाचे नामस्मरण सदैव व मनातल्या मनात केल्याने सहज देवदर्शन घडते.
🌺 अत्यंत दुःखाच्या व त्याचप्रमाणे अत्यंत आनंदाच्या वेळी सारखेच नाम स्मरण करावे.
🌺 मनाची समता ईश्वर दर्शनास अत्यंत आवश्यक आहे. सतत प्रयत्न,अखंड प्रयत्न साक्षात्कारास जरुरी आहे.
🌺 देवाची स्तुती गाणे काही कठीण नाही. परंतु कुत्रा नैसर्गिक प्रवृत्तीने भूंकतो तसे त्याचे (देवाचे) नाव भुंकणे फार अवघड आहे.
🌺 देवाच्या केवळ नामस्मरणाने देव व मानव प्राचीन काळापासून मुक्त होऊन गेले व जात आहेत. जपमाळेने जप करण्याची किंवा शीर्षासन घालून किंवा एका पायावर उभे राहून कडक तपश्चर्या किंवा व्रत वैकल्ये करण्याची जरुरी नाही.
🌺 देवाच्या नामाचे ध्यान करावे. गुप्तपणे, भक्ती भावाने व शांतपणे, आपल्या अंतःकरणाच्या गाभाऱ्यात, भान न ठेवता व दिवस-रात्र न म्हणता देवाचे स्मरण करावे.
🌺 परमेश्वर प्राप्तीसाठी नामाशिवाय आणखी दुस-या कोणत्याच साधनाची मुळीच जरुरी नाही.
🌺 मन एखाद्या गोष्टीवर किंवा विचारावर यशस्वीपणे केंद्रित करायचे झाले तर आपल्याला महत्त्वाची वाटणारी व आवडणारी वस्तूच निवडावी म्हणजे मन आपोआप इतर फालतू गोष्टींकडे धावणार नाही.
🌺 परमार्थात संत संगतीचे महत्त्व फार मोठे आहे.
🌺 या संसारातील दुःखाचा निरास करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देवाच्या नामाचे ध्यान किंवा स्मरण करणे हे होय. संसारात आनंद किंवा दुःख भोगीत असता कोणत्याही परिस्थितीत देवाचे ध्यान करण्यास स्वतःस सर्वस्वी वाहून घ्यावे.
🌺 देवाच्या नामाने त्रिविधतापांची होळी होते. अग्नीने कापूर नि:शेष जळावा त्याप्रमाणे पापे जळून जातात. खाता, पिता, झोपी जाता व जागे असता नामस्मरण करावे. वस्तुतः सर्वकाळी आम्ही आपले चित्त अखंडपणे देवाच्या नामावर एकाग्र करावे. एक क्षण देखील देवाच्या नामाशिवाय घालवू नये.
🌺 ईश्वराची कृपा संपादून त्याच्याशी एकरूप होऊन जावे. संसारातून मुक्त होण्याचा हाच एक मार्ग आहे.
🍁 जगातले सर्व संत एकच नामाचा महिमा सांगतात. मनुष्य अत्यंत संकटात सापडतो तेव्हा त्याला देवाच्या नामाशिवाय दुसरा कशाचाही आधार राहत नाही. डोंगर चढत असताना एकदम पाय घसरून धाड्कन पडण्याची भीती असते तेव्हा तुम्ही देवाची आठवण करा. मेघांच्या गडगडाटात किंवा विजांचा चमचमाट होत असताना किंवा प्रत्यक्ष वीज अंगावर पडते तेव्हा देखील हे मना! तू देवाचे नामस्मरण कर. भयंकर आजाराने अंथरणावर पडून राहिला किंवा दरोडेखोरांनी तुम्हाला चहू बाजूने घेरले किंवा वाघाने जरी तुमच्या हल्ला केला किंवा कल्पनातीत अशी आपत्ती आली तरी तुम्हास एकच मार्ग आहे व तो म्हणजे हे दयाघना! हे सद्गुरू! तू कल्पतरू आहेस. तू सर्व संकटात माझे रक्षण करणार आहेस अशी आर्तस्वराने प्रार्थना करणे हाच एक मार्ग होय.
🌺 कन्नड संतांची भाषा जरी वेगळे असली तरी त्यांचे विचार व आपल्या संतांचे विचार एकच असतात यात शंका नाही. आपण ते ऐकून तसेच वागले पाहिजे. तरच आपले आयुष्य सत्कारणी लागेल.
🍀 राजाधिराज सद्गुरु नाथ महाराज की जय🍀
(संदर्भ:--कन्नड संतवाङ्मयातील परमार्थ मार्ग)
जगातील सर्व पंथातील, जातीतील, धर्मातील संतांचे विचार व परमार्थिक अनुभव एकच असतात त्यामुळे गुरुदेवांना सर्व जगातील संतांच्मा अनुभवावर एक पुस्तक लिहायचे होते. पण ते वाचायचे आपल्या नशिबात नव्हते. परंतु "वाचलेच वाचावे" या समर्थांच्या न्यायाप्रमाणे मी परत तेच तेच वाटले तरी तेच तेच लिहीत आहे. आणि एखादा विचार शंभर लोकांनी शंभर वेळा वाचला म्हणजे तो त्यांच्या मनावर चांगला कोंरला जातो. या न्यायाने कदाचित श्री गुरुदेव माझ्याकडून हे लिहून घेत असतील. ते मी माझे भाग्य समजते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment