Saturday, July 1, 2017

*कावेरी रंगन नोडदा*
शास्त्र केवळ संस्कृत मध्येच सांगितले गेले पाहिजे, इतर भाषेत ऐकल्यावर १००वेळा आंघोळ करणारे, परब्रह्म नारायणचा पूर्ण कृपानुग्रह असलेल्या दासांची वाक्ये आम्हाला प्रमाण नाहीत असे म्हणणारे महाभाग काही कमी नाहीत. पण यासाठीच एक श्रेष्ठ यति असून संस्कृत सोडून मुद्दाम मातृभाषेमध्ये आपला अंतरंग अनुभव सांगणाऱ्या एका सत्पुरूषांबद्दल आणि त्यांच्या एका रचनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
संतांच्या व्यक्तीमत्वाबद्दल त्यांच्या चरित्रापेक्षा त्यांच्या ग्रंथ रचना, अभंग रचना याच जास्त सांगून जातात. कारण त्यांच्या रचना म्हणजे केवळ बौद्धिक कसरतीतून केलेली शब्दांची मांडणी नसते तर साक्षात अंतर्यामी भगवंताचाच तो कृपाप्रसाद असतो. आणि त्यामुळे त्यांच्या उद्धाराबरोबरच इतर अनेक जीवांचाही उद्धार त्या कृतींमधून घडत असतो. अशाच सत्पुरूषांपैकी एक श्री श्रीपादराजस्वामी यांच्या एका रचनेचे चिंतन आपण आज त्यांच्या समाधी दिनानिमित्त करणार आहोत. लक्ष्मीनारायणतीर्थ, योगी हे त्यांचे आश्रमनाम पण तत्कालीन यतिवर्गातील त्यांची श्रेष्ठता योग्यता बघून त्यांना रघुनाथतीर्थांनी "श्रीपादराज" असे नाव दिले आणि त्यानेच ते प्रख्यात झाले.
ज्यांच्यामुळे व्यासराजातीर्थ विजयनगर साम्राज्याचे गुरू झाले, ज्यांच्यामुळे हरिदास परंपरेचा पाया रचला गेला, ज्यांनी संस्कृत या पंडित विद्वानांच्या भाषेपेक्षा कानडी या मातृभाषेत भगवद्महिमा सांगण्यावर भर दिला, ज्यांच्यामुळे सेल्वा नरसिंह राजावरील ब्रह्महत्येचा दोष नाहीसा झाला, जे साक्षात ध्रुवाचे अंश होते अशी मान्यता असलेले एक तपस्वी सिद्धपुरूष म्हणजे श्रीपादराजस्वामी. त्यांचा जन्म इसवी सन १४०४ रोजी कर्नाटकात चेन्नपट्टण (सध्याचे बंगलोर) येथे झाला. "वाग्वज्र" हा त्यांचा एकमेव संस्कृत ग्रंथ आहे. बाकी सर्व रचना या कानडीमध्ये आहेत. *"रंग विठ्ठल"* ही त्यांची नाममुद्रा होती. त्यांनी कर्नाटकातील मुळबागील या गावी नृसिंह तीर्थ येथे ज्येष्ठ शु. चतुर्दशी, इसवी सन १५०२ रोजी समाधी घेतली.
आज आपण जी रचना पाहणार आहोत ती महाराष्ट्रातील बहुतांश जणांनी पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकली असेल. ती संपूर्ण रचना प्रथम पाहू. आज संपूर्ण रचनेचे विस्ताराने चिंतन शक्य नसल्याने थोडक्यात त्या रचनेचा आशय आपल्याला समजेल हा प्रयत्न आपण करूया.
*कंगळी द्यातको कावेरी रंगन नोडदा । कस्तुरी रंगन नोडदा ॥*
*जगंगळोळगे मंगळ मुरूति । रंगन श्रीपादंगळ नोडदा ॥*
स्वामी म्हणतात त्या डोळ्यांचा उपयोग काय जर ज्यांनी कावेरीच्या काठी स्थित रंगनाथाला पाहिले नसेल! कस्तुरीप्रमाणे सुगंध असणाऱ्या त्या रंगनाथाला पाहिलेच नसेल तर डोळ्यांचा उपयोग काय? अखिल विश्वाचा स्वामी असलेल्या जगातली सगळ्यात मंगल असे रूप असलेल्या रंगनाथाला पाहिले नाही तर या डोळ्यांचा उपयोग असा तो काय?
रंग म्हणजे मंच, व्यासपीठ अथवा आपला देह, इंद्रिये, यांचा जो नाथ आहे तो म्हणजे रंगनाथ, साक्षात परब्रह्म नारायण. त्यामुळेच स्वामी आपल्याला विचारत आहेत की ज्या भगवंताने आपलाल्या देह, इंद्रिये दिली जो त्याचा नाथ स्वामी आहे अशा भगवंतालाच तुम्ही पाहिलं नाहीत तर ही दृष्टी असूनही व्यर्थच आहे.तिचा काहीही उपयोग नाही!
*एंदिगादरोम्मे जनरू । भूमियल्लि निंदु ॥*
*चंद्र पुष्करणी स्नानव माडि । आनंददिंदलि रंगन नोडदा ॥१॥*
रंगनाथ हे भगवंताचे एक रूप आहे. शेषशयन या रूपासच रंगनाथ असे म्हणतात. दक्षिण भारतात तीन प्रमुख रंगनाथ मंदिरे आहेत. आदिरंगा, मध्यरंगा आणि अंत्यरंगा. आणि तीनही देवस्थाने कावेरी नदीच्या काठी आहेत. तसेच तिथे तीर्थ, पुष्करणी आहेत. त्यासगळ्याचे वर्णन स्वामी येथे करतात...
एके दिवशी सर्वजण मंदिरात येतात, इथल्या चंद्र पुष्करणीमध्ये स्नान करतात आणि आनंदाने रंगनाथाला बघतात पण ज्या डोळ्यांनी रंगनाथाला पाहिलं नाही त्या डोळ्यांचा काय उपयोग?
*हरि पादोदक सम कावेरी विरजा नदीय स्नानव माडी*
*परम वैकुंठ रंग मंदिर पर वासुदेवन नोडदा ॥२॥*
ही कावेरी नदी म्हणजे साक्षात हरि पादोदकच आहे. तिच्यात स्नान करणे म्हणजे सत्यलोकीच्या विरजा नदीत स्नान केल्यासारखेच आहे. हे रंगनाथाचे मंदीर म्हणजे साक्षात वैकुंठच आहे पण इथल्या वासुदेवाला पाहिले नाही तर या डोळ्यांचा काय उपयोग?
*हार हीर वैजयंति तोर मुत्तिन हार पदक*
*तेरनेरि बीदिलि बरूव श्री रंगविठ्ठल रायन नोडदा ॥३॥*
शेवटच्या चरणात स्वामी म्हणतात, हार, हिरे मोती, वैजयंती या सर्वांमुळे शोभून दिसणाऱ्या, रथामध्ये विराजमान असणाऱ्या रंग विठ्ठलाला म्हणजेच नारायणाला पाहिलं नाही तर या डोळ्यांचा उपयोग काय?
या अभंगातून अनेक संदर्भ स्वामींनी दिलेले आहेत जे साधनेला पूरक आहेत. श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्यः हा उपनिषदांचाच सिद्धांत स्वामींच्या सर्व रचनांमधून बघायला मिळतो. सतत भगवंत अनुसंधानात राहण्यासाठी स्वामी आपल्याला सांगत आहेत. तीर्थक्षेत्री निश्चितच जावे त्यातूनच बैठक तयार होत असते पण तिथे जाऊन नेमके कोणाला आणि कसे पाहायचे हे जाणले पाहिजे यासाठीच भगवंताबद्दल श्रवण, मनन केले पाहिजे आणि त्यामुळे काय होते हे स्वामी अजून एका अभंगात सांगतात, त्यासाठी ते "ध्यानगोचर" असा प्रयोग करतात. सतत श्रवण, मनन केल्यामुळेच तो ध्यानगोचर होतो .त्यामुळेच आधी डोळ्यांनी त्याला पहा म्हणजेच अंतःचक्षुंनी पाहता येईल!
आपलेही अनुसंधान असेच टिकावे आणि एक दिवस आपल्यालाही तो पाहता यावा हीच प्रार्थना स्वामींच्या चरणी करत भगवंत स्मरणात इथेच थांबूया.
*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥*
*लेखक - वादिराज विनायक लिमये*
*भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७*
श्रीपांडुरंगो भवतु प्रसन्नः (भाग १)
सध्या महाराष्ट्रात सर्वांनाच वेध लागले आहेत ते पंढरपुरी उभे असलेल्या गोपाल कृष्ण रूपी विठ्ठलाचे. महाराष्ट्रातील वारीची परंपरा पाहिली की मन शेकडो वर्ष मागे जातं जेव्हा कर्नाटकातून दास देखील भगवद्गुण संकीर्तन करत करत पंढरपुरी यायचे. भेदा-अभेदा पलिकडील भगवद्भक्तीचा अमृतानुभव महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संत तेव्हा मुक्तहस्ते वाटयचे. हरी ही भवसागर तरून नेणारी केवळ दोन अक्षरे सर्वांच्याच मुखी असून त्याने आसमंत दुमदुमून जायचा. आणि अखेरीस ते सावळे परब्रह्म भक्तांच्या हृदय सिंहासनावर विराजमान व्हायचे.
इसवी सन १४०० ते १८०० या जवळपास ४०० ते ५०० वर्षांच्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या भूमीने संगीत, विठ्ठल, आणि भक्ती हे बरोबरीनं अनुभवलं. महाराष्ट्रात आजही वारीची परंपरा टिकून आहे याविषयी अभिमान आणि कर्नाटकात ती परंपरा जपली गेली नाही याची थोडी खंत उराशी बाळगत लेखनमालेला सुरूवात करतो.
दासांची काही पदे आषाढी एकादशीपर्यंत यथाशक्ति जाणून घेण्याचा प्रयत्न आपण पुढील काही दिवस करणार आहोत. दास परंपरेतील बहुतांश अभंग हे पं. भीमसेन जोशींमुळे अजरामर झाले. महाराष्ट्रात ते ऐकलेही जातात पण त्याचा अर्थ मात्र समजत नाही. असेच काही ज्ञात-अज्ञात आणि अभंग चिंतनाकरता घेतले आहेत. आज "यादव नी बा" या अभंगाने आपण प्रारंभ करूया...
यादव नी बा यदुकुल नंदन माधव मधुसूदन बारो
सोदर मावन मधुरेलि मडुहिद यशोदे कंद नी बारो ||प||
कणकालंदिगे घुलू घुलूरेनुतलि झण झण वेणु नाददलि
चिणकोल चेंडु बुगुरिय नाडुत सण्ण सण्ण गोवळ रोडगूडी || १ ||
शंख चक्रवु कैयलि होळेयुत बिंकद गोवळ नि बारो
अकलंक चरितने आदिनारायण बेकेंब भक्तरिगोलिबारो || २ ||
खगवाहनने बगे बगे रूपने नगे मोगदरसने नी बारो
जगदोळु निन्नय महिमेव पोगळुवे पुरंदर विठ्ठल नी बारो || ३ ||
या रचनेत संत पुरंदरदास भगवान श्रीकृष्णांना बोलावत आहेत. यदु वंशीय कृष्णांना दास, 'हे यादवा तू ये' अशी विनवणी करत आहेत. पुढे ते भगवंताला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतात. हे माधवा, मधुसूदना तू ये. सर्व शब्द वाच्य, अनंत नामे असणाऱ्या भगवंताला बोलवण्यासाठी दासांनी ही दोनच नामे का वापरली आहेत? भगवंताची अनंत रूपे आहेत. त्यातील २४ रूपे आपल्याला ज्ञात आहेतच. त्यात माधव आणि मधुसूदन ही रूपे येतात.
मा म्हणजे ज्ञान. धव म्हणजे अधिपति ज्ञानाचा अधिपती असलेला. मधुसूदन म्हणजे मधु नामक दैत्याचा संहार करणारा. हा शब्दार्थ झाला. पण याचबरोबर २४ रूपांचा संबंध २४ तत्त्वांशी आहे. त्यांतील "अहंकार" आणि "डोळे" या तत्त्वांचं अधिपत्य माधव आणि मधुसूदन रूपांकडे आहे. म्हणजेच या वेगवेगळ्या तत्त्वांचं नियंत्रण वेगवेगळ्या भगवद् रूपांकडे असतं.
अहंकार म्हणजे ego नव्हे तर awareness of the self! स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. आधी मी देह आहे याचीच जाणीव आपल्याला असते पण मी देह नाही हे जाणले कीच स्वस्वरूपाची जाणीव होते. त्यामुळे मी खरा कोण आहे या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठीच दास माधव रूपाला आळवत आहेत. आणि त्याचबरोबर डोळे, बाह्य आणि अंतःचक्षु देखील. या आतील बाहेरील डोळ्यांनी फक्त तुलाच बघता यावे या भावातून दास मधुसूदन रूपाला बोलावत आहेत.
पुढे म्हणतात, सोदर मावन म्हणजे मामा. मथुरेत कंसाचा संहार करणाऱ्या, हे यशोदेच्या कंदा किंवा नंदना तू ये!
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
जन्मांचे ते मुळ पाहिले शोधुन ।दुःखासी कारण जन्म घ्यावा॥१॥ पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी। नरदेहा येवोनि हानी केली॥२॥ रज तम सत्व आहे ज्याचे अंगी।याच गुणे जगी वाया गेला॥३॥तम म्हणजे काय नर्कचि केवळ।रज तो सबळ मायाजाळ॥४॥तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी ॥५॥

Sunday, April 2, 2017

समर्थ रामदासांची करूणाष्टके

१] अनुदिन अनुतापे तापलो

अनुदिन अनुतापे तापलो रामराया । परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ।
अचपळ मन माझे नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धावरे धाव आता ॥१॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ।
रघुपति मति माझी आपुलीशी करावी । सकळ त्यजुनि भावे कास तूझी धरावी ॥२॥
विषयजनित सूखे सौख्य होणार नाही । तुजविण रघुनाथा वोखटे सर्व काही ।
रविकुळटिळका रे हीत माझे करावें । दुरित दुरि हरावे स्वस्वरुपी भरावे ॥३॥
तनुमनुधनु माझे राघवा रुप तुझे । तुजविण मज वाटे सर्व संसार वोझे ।
प्रचळित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचळभजनलीला लागली आस तुझी ॥४॥
चपळपण मनाचें मोडिता मोडवेना । सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना ।
घडिघडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणउनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥५॥
जळत हृदय माझे जन्म कोट्यानकोटी । मजवरी करूणेचा राघवा पूर लोटी ।
तळमळ निववी रे राम कारूण्यसिंधु । षड्‍रिपुकुळ माझे तोडि याचा विरोधु ॥६॥
तुजविण करुणा रे कोण जाणेल माझी । सिणत सिणत पोटी पाहिली वास तुझी ।
झडकरी झड घाली धांव पंचानना रे । तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥७॥
सबळ जनक माझा राम लावण्यपॆटी । म्हणउनि मज पोटी लागली आस मोठी ।
दिवस गणित बोटीं प्राण ठेऊनि कंठी । अवचट मज भेटी होत घालीन मिठी ॥८॥
जननिजनकमाया लेकरुं काय जाणे । पय न लगत मूखे हाणतां वत्स नेणे ।
जळधरकणआशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥९॥
तुजविण मज तैसे जाहले देवराया । विलग विषमकाळी तूटली सर्व माया ।
सकळजनसखा तू स्वामि आणीक नाही । वमकवमन जैसे त्यागिलें सर्व काही ॥१०॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आता चित्त कोठे न राहे ।
जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि देती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे । जिवलग मग कैचें चालते हेंचि साचे ।
विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी ॥१२॥
सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकूनी आले ।भजन सकळ गेले चित्त दुश्चित जाले ।
भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना । परम कठीण देही देहबुध्दी वळेना ॥१३॥
उपरति मज रामी जाहली पूर्णकामी । सकळभ्रमविरामी राम विश्रामधामी ।
घडिघडि मन आतां रामरुपी भरावे । रविकुळटिळका रे आपुलेसें करावे ॥१४॥
जलचर जळवासी नेणती त्या जळासी । निशिदिन तुजपासीं चूकलों गुणरासी ।
भूमिधरनिगमांसी वर्णवेना जयासी । सकळभुवनवासी भेटि हे रामदासी ॥१५॥


२]  तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो

असंख्यात रे भक्त होऊनि गेले । तिहीं साधनांचे बहू कष्ट केले ।
नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥१॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरी भेटि नाहीं जनांसी ।
स्थिती ऐकतां थोर विस्मित जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥२॥
सदा प्रेमरासी तयां भेटलासी । तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्यराशी ।
अहंतामनी शब्दज्ञाने बुडालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥३॥
तुझ्या प्रीतिचे दास जन्मास आले । असंख्यात ते कीर्ति बोलोनि गेले ।
बहू धारणा थोर चक्कीत जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥४॥
बहूसाल देवालये हाटकाची । रसाळा कळा लाघवे नाटकाची ।
पुजा देखतां जाड जीवी गळालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥५॥
कितेकी देहे त्यागिले तूजलागी । पुढे जाहले संगतीचे विभागी ।
देहे दुःख होतांचि वेगी पळालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥६॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती ।
पस्तावलो कावलो तप्त जालो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥७॥
सदासर्वदा राम सोडोनि कामीं । समर्था तुझे दास आम्ही निकामी ।
बहू स्वार्थबुद्धीन रे कष्टवीलो । तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो ॥८॥

३] रघुनायका मागणे हेंचि आता

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अति आदरे सर्व सेवा करावी ।
सदा प्रीति लागो तुझे गूण गातां । रघुनायका मागणे हेंचि आतां ॥१॥
तुझे रुपडे लोचनि म्यां पहावे । तुझे गुण गाता मनासी रहावे ।
उठो आवडी भक्तिपंथेचि जातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥२॥
मनी वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणे राघवे पुरवावी ।
वसावे मज अंतरी नाम घेतां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥३॥
सदासर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।
नुपेक्षी कदा गुणवंता अनंता । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥४॥
नको द्रव्य दारा नको येर झारा । नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ।
सगुणी मज लावी रे भक्तिपंथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥५॥
भवें व्यापलो प्रीतीछाया करावी । कृपासागरे सर्वचिंता हरावी ।
मज संकटी सोडवावे समर्था । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥६॥
मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी ।
नको संशयो तोडिं संसारव्यथा । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥७॥
समर्थापुढे काय मागो कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना ।
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता ।  रघुनायका मागणें हेंचि आतां ॥८॥
ब्रिदाकार्णे दीन हातीं धरावे । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावे ।
सुटो ब्रीद आम्हांसी सांडूनि जातां । रघुनायका मागणें हेंचि आतां ॥९॥

४] बुद्धि दे रघुनायका

युक्ति नाही बुद्धि नाही । विद्या नाही विवेकिता । नेणता भक्त मी तुझा । बुद्धि दे रघुनायका ॥१॥
मन हे आवरेना की  । वासना वावडे सदा । कल्पना धावते सैरा । बुद्धि दे रघुनायका ॥२॥
अन्न नाही वस्त्र नाही । सौख्य नाही जनांमध्ये । आश्रयो पाहतां नाही । बुद्धि दे रघुनायका ॥३॥
बोलतां चालतां येना । कार्यभाग कळेचिना । बहू मी पीडलो लोकीं । बुद्धि दे रघुनायका ॥४॥
तुझा मी टोणपा जालो । कष्टलों बहुतांपरी । सौख्य ते पाहतां नाही । बुद्धि दे रघुनायका ॥५॥
नेटकें लिहीतां येना । वाचितां चुकतो सदा । अर्थ तो सांगता येना । बुद्धि दे रघुनायका ॥६॥
प्रसंग वेळ तर्केना । सुचेना दीर्घ सूचना । मैत्रिकी राखितां येना । बुद्धि दे रघुनायका ॥७॥
कळेना स्फूर्ति होईना । आपदा लागली बहू । प्रत्यही पोट सोडीना । बुद्धि दे रघुनायका ॥८॥
संसार नेटका नाहीं । उद्वेगो वाटतो जिवीं । परमार्थू कळेना की । बुद्धि दे रघुनायका ॥९॥
देईना पुरविना कोणी । उगेचि जन हांसती । विसरु पडेना पोटी । बुद्धि दे रघुनायका ॥१०॥
पिशुने वाटती सर्वे । कोणीही मजला नसे । समर्था तू दयासिंधू । बुद्धि दे रघुनायका ॥११॥
उदास वाटते जीवी । आता जावे कुणीकडे । तू भक्तवत्सला रामा । बुद्धि दे रघुनायका ॥१२॥
काया वाचा मनोभावे । तुझा मी म्हणवीतसे । हे लाज तुजला माझी । बुद्धि दे रघुनायका ॥१३॥
सोडविल्या देव कोटी । भूभार फेडिला बळे । भक्तांसि आश्रयो मोठा । बुद्धि दे रघुनायका ॥१४॥
भक्त उदंड तुम्हाला । आम्हाला कोण पूसते । ब्रीद हे राखणे आधी । बुद्धि दे रघुनायका ॥१५॥
आशा हे लागली  मोठी । दयाळू बा दया करी । आणखी नलगे काही । बुद्धि दे रघुनायका ॥१६॥
उदंड ऐकिली कीर्ति । पतितपावना प्रभो । मी एक रंक दुर्बुद्धी । बुद्धि दे रघुनायका ॥१७॥
रामदास म्हणे माझा । संसार तुज लागला । संशयो लागतो पोटी । बुद्धि दे रघुनायका ॥१८॥

५] श्रीरामावर भार

नसे भक्ति ना ज्ञान ना ध्यान कांही । नसे प्रेम हे राम विश्राम नाही ।
असा दीन अज्ञान मी दास तूझा । समर्था जनी घेतला भार माझा ॥१॥
रघुनायका जन्मजन्मांतरीचा । अहंभाव छेदोनि टाकी दिनाचा ।
जनी बोलती दास या राघवाचा । परी अंतरी लेश नाही तयाचा ॥२॥
दिनाचे उणे दीसतां लाज कोणा । जगीं दास दीसे तुझा दैन्यवाणा ।
शिरी स्वामि तू राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाही सदा शीघ्र कोपी ॥३॥
रघूनायका दीन हाती धरावे । अहंभाव छेदोनिया उद्धरावे ।
अगूणी तयालागि गूणी करावें । समर्थे भवसागरी उतरावे ॥४॥
किती भार घालू रघुनायकाला । मजकारणे  शीण होतील त्याला ।
दिनानाथ हा संकटी धाव घाली । तयाचेनि हे सर्व काया निवाली ॥५॥
मला कोंवसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे  फीटली सर्व चिंता  ।
समर्था काय उत्तीर्ण व्हावे । सदासर्वदा नाम वाचे वदावे ॥६॥
अबीर गुलाल उधळीत रंग | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू । चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥
 आषाढी कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
http://www.youtube.com/watch?v=WMvC0fQBG-Q
अबीर गुलाल उधळीत रंग | नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥धृ.॥
उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन । रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन । पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥१॥
वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू । चंद्रभातेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ । विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी नि:संग ॥२॥
 आषाढी कार्तिकी भक्तजन येती । पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥३॥
http://www.youtube.com/watch?v=WMvC0fQBG-Q
कोण तो सोंवळा कोण तो वोवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥ 

कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥ 

पांचांचा विटाळ एकाचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥

 चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरुपें आगळा विटेवरी ॥४॥