Sunday, June 26, 2016

श्री अंबुराव महाराज यांच्या आठवणी
'एक आठवची पुरे'
१९३० साली श्री बाबा साताऱ्याला आले होते. त्यावेळी, सांपत्तिक स्तिथी अगदी साधारण असलेल्या एका शिष्याने त्यांना आपणाकडे भोजनास येण्याबद्दल फार आग्रह केला. परंतु " मी एकटा जेवावयास येऊ शकत नाही, व बरोबरच्या २०/२५ मंडळींना जेवावयास बोलावल्याने तुजवर खर्चाचा फार भार पडेल म्हणून तू भोजनास येण्याचा आग्रह करू नको", असे श्रीबाबांनी त्यांना समजावून सांगितले. तरीही ते गृहस्थ आपला आग्रह सोडीनात. ते म्हणाले, " मी अंत:करणपूर्वक आपणा सर्वांना निमंत्रण देत आहे. व खर्च झाला तरी मला त्याचे वाईट वाटणार नाही.." तेव्हा श्रीबाबा म्हणाले," अरे बाबा , तू हे सर्व अहंकारामुळे बोलतो आहेस, हे तुझ्या लक्षात येत नाही. प्रपंचात पैशाची अडचण मोठी कठीण असते. आपल्या मुलाला एक आण्याचा खाऊ आणून देणे अवघड पडते. मग आमच्यासाठी १५/२० रुपये खर्च करणे जड होईलच . तुझे इष्टमित्र म्हणतील की याची प्रापंचिक स्थिती माहीत असून याच्यावर इतका भार घालू नये हे न समजण्याइतका याचा गुरु अविचारी कसा? अशा रीतीने तू परमार्थासाठी जे करणार (आम्हाला भोजनास बोलविणार) त्यामुळेच परमार्थाला हानी पोहोचेल. म्हणून तू असा आग्रह करू नको. ज्याला जी सेवा सहज करता येईल ती करून त्यांनी परमार्थ करावा. मी ज्यांच्याकडे उतरलो आहे त्यांनी मला इंचगेरीहून साताऱ्यास आणण्यास पाठविण्याला कोणी चांगला मनुष्य मिळत नव्हता. त्यावेळी, मी जातो असे सांगून तू मला घेऊन आलास ही परमार्थाची सेवा काय थोडी झाली? आता तुला प्रसादाचं घ्यावयाचा असेल तर चार आण्याची साखर भजनाचे वेळी महाराजांच्या फोटो पुढे ठेव व शेवटी ती सर्वांना वाट म्हणजे प्रसाद मिळेल. परमार्थासाठी आपल्याला जड पडेल असे काहीही करण्याची आवश्यकता नसते. सहज होईल ती सेवा करावी व नामस्मरण करावे म्हणजे पुरे. जड असे काही केल्याने त्याचा परमार्थाला उपयोग न होता त्याची हानी मात्र होते."

No comments: