Sunday, July 17, 2016

देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १)
श्रीमद्भागवतामध्ये भक्तश्रेष्ठ प्रह्लादाने भगवंताजवळ एक गोष्ट मागितली ती म्हणजे देहि मे तव दास्ययोगं ॥ भक्तीचे प्रकार आहेत पण भक्त म्हटले की, दास्य हे स्वाभाविकपणेच त्याबरोर येते. आपण अनेक संत सत्पुरूषांबद्दल ऐकले आहे, त्यांचे जीवन चरित्र वाचले आहे त्यात इतर बाबतीत भेद, फरक असला तरी भगवंत माझा स्वामी आणि मी त्याचा दास हा भाव सर्वच संतांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. भक्तीबद्दल नारद भक्तीसूत्रे आणि श्रीमद्भागवत यात विस्तृतपणे सांगण्यात आलेले आहे. नवविधा भक्ती तर सर्वांना परीचित आहेच. पण त्याप्रमाणेच पंचविध भाव आहेत. दास्य भाव, सख्य भाव, मधुर भाव, वात्सल्य भाव, शांत भाव. आपण नीट पाहिले तर या पंचविध भावांवरच संत साहित्य हे आधारलेले आहे. महाराष्ट्रात जसे संत साहित्य आहे, संत परंपरा आहे तशी कर्नाटकात हरिदास परंपरा आहे, हरिदास साहित्य आहे आणि तेही याच पंचविध भावांवर उभे आहे. महाराष्ट्रातील संत परंपरेबद्दल किंवा साहित्याबद्दल असे म्हटले जाते की त्याचा पाया हा ज्ञानेश्वर माऊलींनी रचला तसा कर्नाटकातील हरिदास साहित्याचा पाया हा दासश्रेष्ठ श्री पुरंदरदासांनी रचला. संस्कृतमधून वेदार्थ सांगणाऱ्यांना व्यासकूट असे म्हणतात तर कन्नड भाषेत कुठल्याही माणसाला तोच वेदार्थ सहजरित्या कळेल या पद्धतीने सांगून भक्तीमार्गाचा प्रसार करणाऱ्या दासांना दासकूट असे म्हणतात. कूट म्हणजे संघ. असे या दासकूटातील प्रत्येक दास हे ज्ञान भक्ती वैराग्याचे मूर्तीमंत उदाहरण असते. हे हरिदास साहित्य मध्व तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे. हे तत्त्वज्ञान कानडी भाषेमध्ये सहज सोप्या भाषेत जनमानसापर्यंत पोहोचवणे आणि मुख्यतः भगवंताच्या नामाचा महिमा सांगत राहणे हे हरिदासांचे मुख्य काम. असे २५० पेक्षा अधिक हरिदास होऊन गेले. सगळेच श्रेष्ठ आणि उच्च योग्यतेचे होते पण त्यात अग्रगण्य असे कुणी असतील तर ते दासश्रेष्ठ असे पुरंदरदासच! त्यांचे चरित्र तर अद्भुत आहेच पण साहित्यही विशाल असे आहे जे थोडक्यात जाणून घेणे शक्य नाही पण घागर मे सागर भर दे ना या न्यायाने आपण त्यांचे जीवन चरित्र आणि साहित्य आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
श्रीनिवास नायकाचे पुरंदरदास झाले - काही सतं सत्पुरूष हे जन्मतः वैराग्यसंपन्न, जन्म कशासाठी आहे हे कळलेले, कार्य काय आहे हे माहित असून वाटचाल करणारे असतात. पण काही अगदी याच्या विरूद्ध. त्यांच्या आधीच्या आयुष्याकडे पाहून, हेच पुढे इतके मोठे सत्पुरूष झाले? असे कुणाला वाटले तर त्यात काही गैर नाही. त्यांच्या कार्याची जाणीव ही त्यांना नसली तरी त्यांना ज्याने पाठवले आहे त्या भगवंताला ती असतेच असते. आणि मग तो असा काही दणका देतो की त्या एका दणक्यातच भगवंताशिवाय मला कुणी नाही असे केवळ बोलण्याकरते राहत नाही तर तेच त्यांचे आयुष्य होऊन जाते. असाच प्रसंग पुरंदरदासांच्या बाबतील घडला. पुरंदरदासांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर गडावर १४८० साली झाला. त्यानंतर हंपि येथे स्थायिक झाले. नवकोट नारायण होते ते. त्यांचे आधीचे नाव श्रीनिवास नायक होते. सावकारी होती. कशालाही कमी नव्हती. पैसा म्हणजेच सर्वकाही आणि त्यासाठीच जगायचे एवढा एकच विचार श्रीनिवास नायक करायचे. त्यामुळे सहाजिकच वृत्ती कंजूष आणि क्रूर अशी होती. त्यांची पत्नी सरस्वतीबाई या मात्र अतिशयस शांत आणि प्रेमळ स्वाभावाच्या होत्या. यात त्यांच्या दास होण्यास कारणीभूत ठरल्या आणि त्याबद्दल नंतर त्यांनी एका पदात तिचे आभार मानले.
आता या श्रीनिवास नायकाला दणका देण्यासाठी आणि त्याचे जीवनातील खरे कार्य त्याला समजण्यासाठी भगवंताने एके दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि श्रीनिवास नायकाकडे आला. मला माझ्या मुलाचे उपनयन करायचे आहे तेव्हा आपण मला थोड्या पैशाची मदत करा असे त्याने नायकाला सांगितले. नायक म्हणाला तारण आणले आहे का तरच पैसे मिळतील. त्या ब्राह्मणाची दया येऊन पैसे देण्याची वृत्ती श्रीनिवास नायकाची नव्हती. पण तीच वृत्ती पालटवण्यासाठी या विश्वाचा नायक साक्षात श्रीनिवास त्याच्यापुढे आला होता. त्या ब्राह्मणाने रोज येऊन पैसे मागावेत आणि श्रीनिवास नायकाने त्यास नकार द्यावा असे सहा महिने चालले. शेवटी त्या ब्राह्मणापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीनिवास नायकाने त्याला एक फुटका रूपया दिला ज्याला काहीही किंमत नव्हती. तो ब्राह्मण निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने श्रीनिवास नायकाची पत्नी सरस्वतीबाई हिला गाठले. त्या अतिशय दयाळू होत्या. त्याने त्या बाईंना आपल्याला मदत करायला सांगितली. पण त्यांना आपल्या पतीचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला कुठलीच वस्तू देऊ शकत नाही. पण ही माझ्या आईवडीलांनी दिलेली नथ आहे ती घ्या. असे म्हणून सरस्वतीबाईंनी त्या ब्राह्मणाला नथ दिली.
तो ब्राह्मण लगेचच श्रीनिवास नायकांकडे आला. त्याला पाहूनच नायक खवळले. पण तो ब्राह्मण म्हणाला मी इथे भीक मागायला आलेलो नाही तारण ठेवायला आणले आहे मला पैसे द्या. नायक शांत झाला म्हणाला दाखवा काय आणले आहे तारण म्हणून? त्याने ती नथ काढून नायकाला दाखवली. ती पाहिल्या बरोबरच नायकाने ती ही आपल्या बायकोची आहे हे ओळखले आणि त्या ब्राह्मणाला ही तुला कुठे मिळाली असे विचारले. त्यावर त्याने मला ही बक्षीस म्हणून मिळाली आहे असे सांगितले. श्रीनिवास नायकाने त्याला उद्या येण्यास सांगितले. ब्राह्मण गेल्यावर ती नथ त्याने एका पेटीत कड्या कुलपांनी बंद करून ठेवली आणि घरी गेला.
घरी आल्यावर आपल्या पत्नीच्या नाकात नथ न पाहिल्याने नायकाने विचारले की नथ कुठे आहे? त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली पण नायक आपल्या पत्नीच्या उत्तराने समाधानी नव्हता आणि तो चिडला होता. त्याने नथ आणून दे असे सांगितले आणि निघून गेला. सरस्वतीबाईंना खूप अपराधी वाटू लागले. आपला पती आता आपल्याला शिक्षा करणार या भितीने त्यांनी आता विष घेऊन मरावे हा पर्याय निवडला. सरस्वतीबाईंनी एका भाड्यांत विष घेतले आणि भगवंताचे नामस्मरण केले आणि ते पीणार इतक्यात त्या भांड्यात नथ येऊन पडली. सरस्वतीबाईंनी मनोमन भगवंताचे आभार मानले आणि ती नथ धुवून नायकाला आणून दिली. ती नथ पाहून नायक चक्रावला आणि लागलीच सावकारीच्या दफ्तरावर आला. त्याने ती कड्या कुलपांमध्ये बंद केलेली पेटी उघडली आणि बघतो तर त्यातील नथ गायब! हा एक दणका नायकासाठी पुरेसा होता. तो घरी आला त्याने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. नथ नाही हे कळल्यावर मला तो ब्राह्मण पुन्हा दिसला आणि क्षणार्धात अंतर्धान पावला. तो ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात श्रीहरीच होता असे सांगितले. घरावर, सावकरीवर तुळशीपत्र ठेवले आणि चार मुले, पत्नी यांच्यासह हरिकिर्तन करत करत चालू लागला. त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यांची जागा आता तुळशीच्या माळेने घेतली होती. सोन्या, हिऱ्यांमध्ये असणाऱ्या हातात तंबोरा आणि चिपळ्या आल्या होत्या असा श्रीनिवास नायकाचा हरिदास झाला होता.
क्रमशः

No comments: