Sunday, July 17, 2016

देहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २)
श्रीनिवास नायकाच्या मागे त्यांची बायका मुलेही आली. घरातील ऐश्वर्यावर पतीप्रमाणे त्या पत्नीनेही सहजपणे तुळशीपत्र ठेवले होते आणि पतीबरोबर हरि कीर्तनाला लागली होती. त्यांचा तेव्हाचा दिनक्रम असा होता की, गावाबाहेरील देवळात राहणे. हरि भजन करत करत भिक्षा मागणे आणि त्या भिक्षेचा सरस्वतीबाईंनी देवळात स्वयंपाक करणे आणि मुलांसहित नारायणाचे स्मरण करून तो स्वीकारणे. असेच चालू असताना एका रात्री नायकाला पांडुरंगाचे दर्शन झाले. "पंपा क्षेत्री चक्रतीर्थाजवळ निवास करत असलेल्या व्यासतीर्थांकडे जा. त्यांच्याकडून उपदेश घे आणि हरिदास हो." अशी आज्ञा केली. दुसऱ्या दिवशी नायक बायका मुलांसह पंपा क्षेत्री चक्रतीर्थाकडे म्हणजे हंपीकडे निघाले.
कंजूष क्रूर पैशासाठी वाट्टेल करणारा नायक कसा बदलला होता याची आणखी एक गोष्ट ऐकण्यासारखी आहे.
हंपीला व्यासतीर्थ गुरूंकडे जात असताना वाटेत अरण्यात सरस्वतीबाईंना भिती वाटू लागली आणि त्यांनी तसे नायकांना सांगितले. "सर्वस्व त्याग करून निघालो असताना भिती कशाची?" असे नायक म्हणाले. नायकांनी बरोबरचे गाठोडे पाहू म्हणून सरस्वतीबाईंना ते सोडायला लावले. "त्यात काही नाही. पाणी पिण्याकरीता फक्त एक सोन्याचे फुलपात्र आहे." असे सरस्वतीबाई म्हणाल्या. "हे पहा, या सोन्याच्या पात्रामुळेच तुला भय वाटत आहे." असे म्हणून नायकांनी ते पात्र अरण्यात भिरकावून दिले. आणि भ्यायचे कारण नाही. भगवंत आपल्याबरोबर आहे. आपण गुरूंकडे जात आहोत. काळजी नसावी असा धीर दिला आणि पुढची वाट चालू लागले.
चक्रतीर्थ हंपी येथे येताच तेथील सर्व परिसराचे दर्शन घेत घेत व्यासतीर्थांपर्यंत येऊन नायक थांबले. व्यासतीर्थ तेव्हा शिष्यांना पाठ सांगत बसले होते. नायकाने त्यांना नमस्कार केला.
पुरंदरदासांच्या गुरूंचे माहात्म्य जाणणे येथे आवश्यक आहे. ते थोडक्यात बघुया.
श्री रामाचार्य असे व्यासतीर्थांच्या पूर्वाश्रमच्या वडीलांचे नाव होते. श्री ब्रह्मण्यतीर्थांनी त्यांना जीवदान दिले होते. श्री रामाचार्य मृत झाले असता आक्रोश करीत असलेल्या पत्नीला स्वामींनी "दीर्घ सुमंगली भव" असा आशिर्वाद दिला. आणि नंतर खरोखरच तीर्थाने मृत रामाचार्यांना जिवंत केले. तुम्हाला लवकरच पुत्र होईल पण तो तुम्ही मठास द्यावा असे सांगितले आणि व्यासतीर्थ त्यांच्या घरी जन्मले आणि जन्म झाल्या झाल्या त्यांना मठात पाठवले. व्यासतीर्थ मठातच वाढले. उपनयन झाल्यानंतर वयाच्या ८व्या वर्षी श्री ब्रह्मण्यतीर्थांकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली. आणि विद्याभ्यासाकरीता श्री श्रीपादराज स्वामींच्याकडे पाठवले. तेथे १२ वर्षे शास्त्राभ्यास करून अतुलनीय असे पांडित्य त्यांनी प्राप्त केले. श्री व्यासतीर्थ हे प्रह्लादाचे अवतार होते आणि त्यांचाच पुढील अवतार म्हणजे श्री राघवेंद्रस्वामी.
श्री व्यासतीर्थांनी ‘चंद्रिका’ नावाचा प्रबळ वादग्रंथ लिहीला म्हणून त्यांना ‘चंद्रिकाचार्य’ असे नाव पडले. तसेच विजयनगरचा सम्राट श्रीकृष्णदेवराय याचा कुहयोग परतवण्यासाठी सिंहासनावर बसून राज्य सांभाळले म्हणून त्यांना ‘व्यासराय’ असेही नाव पडले. श्री वादिराजस्वामी, पुरंदरदास, कनकदास या सर्वांचे ते गुरू होते. न्यायामृत, तर्कतांडव, चंद्रिका असे अपूर्व ग्रंथ त्यांनी रचले. तसेच ७३२ मारूतींची अनेक गावी प्रतिष्ठापना केली. कृष्णदेवराय याला राज्य चालवण्याकरीता त्यांनी राजकारणातील धडे देखील दिले. "मध्व वल्लभ श्रीकृष्ण" या नाममुद्रेने त्यांनी पदे रचली. अशा महातपस्वी व्यासतीर्थांकडे नायक निघाले.
हात जोडून गुरूंसमोर नायक उभे राहिले. त्यांना बघताच स्वामी म्हणाले, "यावे नायक. चालत आलात का? काही अडचण तर आली नाही ना? तुम्ही केलेला त्याग अत्यंत मोठा आहे. श्री नारायणानेच तुमची परीक्षा घेतलेली आहे. मी तुमचीच वाट पाहात होतो. पाठ संपतच आहे. एवढ्यात पुजा नैवेद्य होईल. तीर्थ प्रसादानंतर आपण बोलूया." नायकांनी स्वामींचे हे सर्व बोलणे ऐकून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तीर्थ प्रसादानंतर स्वामींनी नायकाला गुरूपदेश केला. मंत्रोपदेश दिला. भागवत धर्माची दीक्षा दिली. त्या दिवसापासून नायक हरिदास झाले. "पुरंदर विठ्ठल" या नाममुद्रेने भगवंताची पदे रचून सेवा करावी आणि भगवंताचे माहात्म्य जनास सांगावे अशी आज्ञा व्यासतीर्थांनी केली. गुरूंच्या पूर्णकृपेनंतर पहिलेच पद त्यांनी रचले ते म्हणजे "कृष्णमूर्ती कण्ण मुंदे निंतिद्दतिदे." म्हणजे श्रीकृष्णच माझ्या डोळ्यांपुढे उभा आहे.
असे हे पुरंदरदास रोज स्नान आन्हिक आटोपून, तंबोरा वाजवत भगवंताचे भजन करीत करीत ग्रामप्रदक्षिणा करत. त्यांची चारही मुले त्यांच्या समवेत मृदुंग टाळ वाजवीत असत. त्यांनी पदे गायला सुरूवात केली प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्यापुढे नाचत असे. नगरातील लोकाच्या घरी जे काही झोळीत मिळेल त्यावरच संतुष्ट होऊन आपली दिनचर्या ते चालवत असत. उद्याकरीता म्हणून काही संग्रह करायची त्यांची वृत्ती राहिली नव्हती. आपल्याला अन्न मिळाले तर त्यातील राहिलेले अन्न भुकेलेल्यांना, जनावरांना देणे किंवा चक्रतीर्थातील जलचरांना ते देत पण संग्रह काहीच करून ठेवत नसत. या त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागणाऱ्या घरांना कर्नाटकात "अरे, याच्याकडे नसेल काही संग्रही, हे तर पुरंदरदासाचे घर" अशी म्हण आहे.
क्रमशः

No comments: