Sunday, July 17, 2016

"उडुपी क्षेत्र"
श्री अनंतेश्वराचे मंदिर हे उडुपीतील प्राचीन असे मंदिर आहे. या देवालयामुळे या गावाला शिवळ्ळी असे नाव पडले. याचेच नाव नंतर रौप्य पीठ किंवा रजतपीठ असे झाले. त्यामुळे उडुपीला रजतपीठपुर असेही म्हणतात. ही भगवान परशुरामांची भूमी आहे. स्वतः भगवान परशुराम म्हणजे श्रीमन् नारायणच शंकर, हर रूपाने येथे आहेत. त्यामुळे येथे शंकर आणि नारायण असे दोन्हीही पूजले जातात. गाभाऱ्यात शिवलिंग आहे आणि उत्सवमूर्ति ही अनंतपद्मनाभाची आहे. त्यामुळे हरि-हर असे हे स्थान आहे. श्री मध्वाचार्यांचे वडील मध्यगेहभट्ट हे याच मंदिरात पुजारी होते. या अनंतेश्वराची उपासना केल्यानंतरच श्री मध्वाचार्यांचा जन्म झाला. श्री मध्वाचार्य याच मंदिरात आपल्या शिष्यांसमवेत पाठ-प्रवचनाला बसत असत. ती जागा आजही या मंदिरात आहे व त्याची नित्य पूजा होते.
श्री अनंतेश्वरानंतर येथे श्री चंद्रमौळीश्वराचेही मंदिर आहे. या ठिकाणी चंद्राने तपश्चर्या केली. त्यावर शंकर भगवान प्रसन्न झाले. या मंदिराबद्दल अजून काही माहिती उपलब्ध नाही. पण अनंतेश्वराच्या मंदिराइतकेच ते प्राचीन असावे असे असे संशोधकांच्या अभ्यासातून कळते. उडुपीतील अष्ट मठाचे स्वामी अनंतेश्वरा इतकेच चंद्रमौळीश्वरालाही आपली सेवा अर्पण करत असतात.
"उडुपी पर्याय"
पर्याय म्हणजे नेमके काय?
द्वापार युगात रूक्मिणीने ज्या मूर्तीची पूजा केली, ती मूर्ती म्हणजेच आज उडुपी येथे असणारी श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती. मध्वाचार्यांना ती द्वारकेहून आलेल्या चंदनाच्या खडकात सापडली. तशी पूर्वसूचना त्यांना होतीच. पण उडुपी जवळील समुद्रात दिशाहीन नौका आली आणि मध्वाचार्यांनी तिला सुखरूप किनाऱ्याला आणले. आणि त्याचे निमित्त होऊन त्या नौकेच्या व्यापाऱ्याने, "तुम्ही आमचे प्राण वाचवलेत, तेव्हा काहीतरी भेटवस्तू आमच्या कडून घ्या" अशी विनंती केली. त्यावर मध्वाचार्य म्हणाले की, "अरे मी संन्यासी माणूस या भौतिक वस्तूंचे मी काय करणार. तेव्हा असं कर तुझ्या नौकेतील एक चंदनाचा खडक मला दे! त्याने तो खडक दिला. आचार्यांना त्या चंदनाच्या खडकाशी देणे घेणे नव्हते. पण त्याच्या आत परब्रह्म परमात्मा आहे हे माहित होते. त्यांनी तो खडक आपल्या डोक्यावर घेतला आणि भगवंताची स्तवनं गात गात उडुपीला आले. तो खडक तेथील पुष्करणीत टाकला आणि काही क्षणातच रवी धारण केलेली बाल रूपातील श्री कृष्ण परमात्म्याची मूर्ती बाहेर आली. त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मध्वाचार्यांनी केली. पण त्याच्या नित्य पूजेसाठी आठ मठ स्थापन केले जे अष्ट मठ म्हणून ओळखले जातात. उडुपी जवळील, उडुपीच्या भोवतालच्या गावांची नावे या मठांना देण्यात आली. आणि या मठांवर आठ ब्रह्मचाऱ्यांना संन्यास देऊन त्यांची नेमणूक करण्यात आली. ते खालीलप्रमाणे :
१. श्री हृषीकेशतीर्थ - पलिमार मठ
२. श्री नरसिंहतीर्थ - अदमार मठ
३. श्री जनार्नदनतीर्थ - कृष्णापूर मठ
४. उपेंद्रतीर्थ - पुत्तिगे मठ
५. वामनतीर्थ - शिरूर मठ
६. विष्णुतीर्थ - सोदे मठ
७. रामतीर्थ - काणियूर मठ
८. अधोक्षजतीर्थ - पेजावर मठ.
हे मठ जेव्हा आपला श्रीकृष्ण मंदिरातील कार्यकाळ संपवतात आणि दुसऱ्या मठाला ती जबाबदारी सोपवतात त्यास "पर्याय" असे म्हणतात. पलिमार मठापासून हे चक्र चालू होते ते पेजावर मठापर्यंत संपते मग पुन्हा पलिमार पासून चालू होते. प्रत्येक मठाचा कार्य काळ हा दोन महिने होता. पण मग दोन महिने लवकर संपायचे आणि कुठल्या स्वामींना संचारालाही जाता येत नसे, त्यामुळे श्री वादिराज स्वामींनी दोन महिन्याच्या ऐवजी दोन वर्ष असा कार्यकाळ ठेवला. उत्तम व्यवस्थापन काय असते हे इथे पाहायला मिळते. या दोन वर्षात विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबविले जातात.
या दोन वर्षाच्या कार्य काळात मंदिराचे पूर्ण व्यवस्थापन ज्या मठाचा पर्याय असतो तो मठ बघतो. प्रत्येक मठाच्या स्वामींमध्ये पर्यायाची दोन वर्षे मध्वाचार्यांचे विशेष सन्निधान असते. पर्याय स्वामींशिवाय काही पूजा, सेवा इतर स्वामी करू शकत नाहीत. त्यापैकी काही म्हणजे, गो पूजा, अक्षयपात्र पूजा, अवसर सनकादि पूजा, (सनक,सनंदन,सनातन आणि सनत्कुमार हे येऊन पूजा करतात त्यानंतर पर्याय स्वामी आपली पूजा करतात), महा पूजा, चामर सेवा.
व्यवस्थापन इथे कसे शिकता येते तर प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करून कामकाज ठरवले जाते. एखादे संस्थान कसे चालवायचे हे व्यवस्थापनाचा कुठला वेगळा अभ्यासक्रम न शिकता येथील लोकांना माहिती आहे. आणि त्यासाठी पुढील व्यवस्थाही केलेली आहे. जर पर्याय स्वामींना कारभार पाहणे किंवा वरील सेवा, पूजा करणे शक्य नसले तर, दोन मठांच्या जोड्या केल्या आहेत. त्या जोड्यांमधील दुसरा मठ ती जबाबदारी स्वीकारतो या जोड्यांना द्वंद्व मठ असे म्हणतात.
मंदिराच्या बाहेरच्या प्रकारात आठ मठांची गोलाकार रचना आहे त्यास रथ-बीदि असे म्हणतात. पर्यायाची सुरूवात एक वर्ष आधीच होते. त्या एका वर्षाच्या काळात ठराविक कालांतराने ठराविक मुहूर्त केले जातात. यात पुढील दोन वर्षे लागणाऱ्या गोष्टींची तरतूद केली जाते. यात तुळशींची लागवड केली जाते. तसेच नैवेद्यासाठी अन्न-धान्य, लाकूड फाटा याची सोय केली जाते. पर्याय स्वामींनी पर्यायाच्या आधी काही महिने महत्वाच्या स्थान देवतांचे अशिर्वाद घ्यावेत. ही यात्रा शक्यतो बद्री ते कन्याकुमारी मधील महत्त्वाच्या स्थान देवतांची असावी. या यात्रेनंतर दहा ते पंधरा दिवस आधी पर्याय स्वामींनी उडुपीत प्रवेश करावा.
"पर्यायोत्सव"
जे स्वामी मध्वमूल पीठावर बसणार आहेत असे पर्याय स्वामी पर्यायाच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीपासून पाचव्या दिवशी सकाळी ३ वाजता दंड तीर्थ येथे स्नानासाठी जातात जे उडुपी जवळ आहे. तिथून परत उडुपीत येतात. पुढील दोन वर्ष नीट पार पडण्यासाठी उडुपीतील सर्व देवांचे आणि मध्वाचार्यांचे आशिर्वाद घेतात. कृष्णाचे दर्शन घेतात आणि पूजेचे सर्व अधिकार हस्तांतरीत केले जातात. यानंतर आधीचे स्वामी पर्याय स्वामींना मूल पीठावर बसण्याची विनंती करतात. यानंतर आठही मठांचा दरबार भरवला जातो यास पर्याय दरबार असे म्हणतात. यावेळी शास्त्र जाणणारे, ज्ञानी, पंडित अश्या विविध क्षेत्रातील विद्वानांचा सत्कार करण्यात येतो. तसेच इतर कारभार बघण्यासाठी मठातील लोकांची नेमणूक केली जाते. यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. जिथे अक्षय पात्र आहे तिथे कसली कमी असणार आहे? यामुळेच उडुपीस अन्नब्रह्म असेही म्हणतात. असा हा, दोन वर्षे पर्याय केल्यापासूनचा सोहळा, गेली ४८४ वर्षे अखंडितपणे चालू आहे. ही सगळी व्यवस्था प्रत्येक जिवाकरीता केलेली आहे. या क्षेत्री जावं आणि आपल्याला शक्य असेल तशी सेवा करावी आणि त्या श्रीकृष्ण परमात्म्याला विनवणी करावी की, त्याच्या चरणी कायम शरणागतीचा भाव राहावा आणि मध्वाचार्यांना अपेक्षित शुद्ध भक्ती आपल्या प्रत्येकाकडून घडावी एवढीच प्रार्थना करावी म्हणजे तो रवीधारी कृष्ण आपल्या संसारात अडकलेल्या मनाचं मंथन करून त्यातून भक्तीरूपी लोणी वर काढून आपला उद्धार करतो.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

No comments: