Friday, November 25, 2016




Tuesday, October 11, 2016

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये..
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये..
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये
उधं उधं उधं उधं उधं
अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला
आज अम्हांवरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये
गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये
अंबाबाईचा.. उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं
सप्‍तशृंगी मातेचा.. उधं उधं उधं उधं उधं
अंबाबाईचा उदो उदो !
करुया उदो उदो उदो अंबाबाईचा
मायेचा वाहे झरा, शहरी कोल्हापूरा
घेऊया लाभ दर्शनाचा, उदो उदो !
सार्‍या जनतेची आई, माता अंबाबाई
हाकेला उभी राही, सारं काही तीच्या ठायी
सत्य डोळ्यांनी पाही, दंड दुष्टांना देई
अनेक रूपे तीही घेई भक्तांच्या पायी
आश्विनी प्रथम दिनी, बसते सिंहासनी
होतो जयघोष माऊलीचा, उदो उदो !
तेथुनी जरा दुरी स्वामीची गगनगिरी
अंश तो परमेश्वरी, भक्ती दत्ताची खरी
गुहेत स्थान जरी, बाजुला खोल दरी
रूप ते त्यांचे जणू शिवशंकरापरी
भेटुया त्यांना चला पाहुया ईश्वरी लीला
भरे दरबार भाविकांचा, उदो उदो !
डोंगरी माथ्यावर जोतिबांचे मंदिर
जुळती दोन्ही कर पहाल मूर्ती जर
असे हे कोल्हापूर नवरात्रीला फार
करिती देवींचा तो उत्सव घरोघर
सोहळा मनोहर, रम्य तो खरोखर
सुटे मधुगंध चंदनाचा, उदो उदो !
|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||
सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ||१||
त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ||२||
एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी |
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ||३||
कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे |
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ||४||
कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती |
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ||५||
पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी |
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ||६||
कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या |
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ||७||
इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ||८||
निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी |
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ||९||
कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी |
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ||१०||
नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते |
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ||११||
संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ||१२||
|| जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)
आई महालक्ष्मीच्या नवरात्र उत्सवानिमित्त गेले नऊ दिवस आपण संत श्री पुरंदरदासांच्या रचनेचे निरूपण बघत आहोत. त्या निरूपणाचा, चिंतनाचा आज अंतिम भाग आपण बघणार आहोत.
खरे म्हणजे संतांनी रचलेल्या अभंगांचे,ग्रंथांचे,स्तोत्रांचे निरूपण हे संतांनीच करावे. त्यांना त्यातून नक्की काय मार्गदर्शन करायचे आहे, त्यामागील त्यांचा काय भाव आहे हे आपल्या बुद्धीच्या पलिकडचेच आहे. ते शक्य होत नसल्यामुळे आपण त्यातल्या त्यात शब्दांप्रमाणे अर्थ घेतो. पण संतांनी ते शब्दांपलिकडच्या भावातून रचलेले असते.
श्रीमध्वाचार्य एके ठिकाणी सांगतात, शास्त्र, ग्रंथांचा अभ्यास करताना भगवंताचे अधिष्ठान, त्याची कृपा का हवी, तर एका शब्दाचे किमान ४ आणि कमाल १०० अर्थ निघतात. आणि आचार्यांनी हे ऋग्वेदावरील भाष्यात आणि इतर ग्रंथामध्ये करूनही दाखवले आहे. तर अशा वेळी कोणत्या ठिकाणी नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे समजण्यासाठी भगवंताची कृपा हवी. आपल्या सर्वांमध्ये साक्षी नावाची एक शक्ती आहे. त्यानेच हे जाणता येते आणि त्या साक्षीला जागृत करण्यासाठी भगवंताची कृपा हवी. त्यानंतर जे चिंतन, निरूपण घडते ते ग्रंथ, अभंगांना सर्वार्थाने न्याय देणारे असते.
प्रस्तुत निरूपण हे शब्दांप्रमाणे जाणारेच आहे. त्याला दासांच्या भावावस्थेची जोड दिली आहे. काही गोष्टी या अंतःप्रेरणेतून घडत असतात. त्या प्रेरणेला लेखणीची जोड देणाराही भगवंतच आहे. त्याच्या प्रसादामुळेच हे निरूपण देणे शक्य झाले आणि पुढेही देता येईल. यात रचनेचा विपर्यास करण्याचा, मनाचे घालण्याचा हेतू नव्हताच आणि कदापि असणारही नाही. ज्याअर्थी दहा दिवस खंड न पडता निरूपण पूर्ण झाले त्याअर्थी ते त्यानेच करून घेतले. तथापि विद्वान,पंडित,अभ्यासक,संशोधक यांना काही गोष्टी खटकल्या असल्यास त्यांनी त्या दुरूस्त कराव्यात. बाकी सर्व जगन्मातेचरणी अर्पण!
आई, शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर आणि तूप यांनी युक्त पंचामृताची नदी वाहत असते. यानंतर दास म्हणतात,
अक्करेयुळ्ळ अळगिरिरंगन । चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि ॥
अक्करेयुळ्ळ म्हणजे प्रेमाने ओतप्रोत भरलेले, अळगिरीरंगन म्हणजे श्रीरंगमचे रंगनाथस्वामी! अळगिरीरंगा हे विशेषणात्मक वापरले आहे. चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि! "चोक्क" म्हणजे शुद्ध, निष्कलंक! रंगनाथ म्हणजे नारायणच!! त्याचं वर्णन दास इथे करतात, तो प्रेमाने भरलेला आहे. ज्याच्याकडून आपल्याला प्रेम, प्रेम आणि प्रेम इतकंच मिळेल असा प्रेमानेयुक्त अळगिरीचा रंगनाथ आहे.
आणि पुढे रचनेचा शेवट करताना म्हणतात की, या पुरंदराला, या भगवंताच्या एका दासाला, शुद्ध निष्कलंक कोणी केलं? ज्याला भगवंताचा विसर पडला, त्याला त्यातून कोणी बाहेर काढलं? तर त्याच्या राणीने म्हणजेच आई लक्ष्मीने! जिने तो मायेचा डाग पुसून मला निष्कलंक, शुद्ध केले आणि भगवंताच्या प्रेमाचा अनुभव दिला. अशी त्याची राणी महालक्ष्मी मी तुला बोलवत आहे!
दास रचनेच्या शेवटी रंगनाथस्वामींचा विशेषकरून उल्लेख करतात, त्यावरून दास श्रीरंगनाथाच्या इथे असतानाच त्यांनी रचना केली असावी असे वाटते. त्या परब्रह्म नारायणाचे प्रेम आम्हाला लाभावे म्हणूनच आम्ही तुझ्याचरणी राहावं म्हणजे तेथून वाहणाऱ्या भक्ती, विवेकाचा स्पर्श आम्हाला होईल.
आज विजया दशमीच्या दिवशी हेच मागणं आईकडे मागूया. ती भगवंताचे जे दास्य करते, ती जशी त्याची शुद्ध भक्ती करते त्यातली थोडीतरी आपल्याला जमावी, जेणेकरून त्या भगवंताचे प्रेम आपल्याला मिळेल, आपल्या योग्यतेनुसार त्याचे ज्ञानानंदादि गुणांनी युक्त असे स्वरूप जाणता येईल आणि तेव्हाच आपले या जन्म मरणातून, बंधनातून सीमोल्लंघन होईल. संपूर्ण रचनेतील प्रत्येक पदाचा शब्दांप्रमाणे अर्थ देत आहे.
सौभाग्य प्रदान करणाऱ्या माझे आई तू ये ॥
पायावर पाय ठेवून ये, त्या पायातील पैंजणांचा आवाज करत ये ।
तुझ्या येण्याने साधू सज्जनांच्या अंतरंगात मंथन चालते आणि ताकातून लोणी वर यावे, तशी त्यांच्या अंतरंगातून भक्ती वर येते ॥१ ॥
कनक म्हणजे सोन्याची वृष्टी करत तू ये, आमच्या मनोकामना पूर्ण कर ।
कोटी सूर्यांचे तेज जसे असते, तसे तुझे दैदीप्यमान रूप आहे. हे जनक राजाच्या कुमारी सीते तू ये ॥ २ ॥
सैरावरा न पळता भक्तांच्या घरामध्ये राहा, म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल ।
साधू सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू आहेस, त्यांच्यामध्ये तेजाने दैदीप्यमान होऊन तूच राहतेस ॥ ३ ॥
तू असंख्य भाग्य प्रदान करणारी आहेस आणि याबद्दल मला काहीच शंका नाही. तू तुझ्या हातातील कंकणांचा आवाज करत ये ।
तुझ्या कपाळी कुंकुम लावलेले आहे. तुझी लोचने कमलासम आहेत. तू वेंकटरमणाची म्हणजेच भगवान व्यंकटेश नारायणांची राणी आहेस ॥ ४ ॥
साखर आणि तूप हे, शुक्रवारी तुझ्या पूजेच्या वेळी, तुझ्याचरणी वाहत असते ।
पुरंदराला, शुद्ध निष्कलंक करणाऱ्या, प्रेमानेयुक्त अशा रंगनाथाच्या राणी तू ये ॥ ५ ॥
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)
दासपरंपरेतील दासश्रेष्ठ संत श्रीपुरंदरदास यांच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या रचानेचे निरूपण, दासांच्या भावावस्थेचे चिंतन आपण गेले काही भाग बघत आहोत. या भावावस्थेला दास पोहोचले ते आई लक्ष्मीची कृपा झाली म्हणूनच. त्यानंतर स्वतःचे असे काहीच राहिले नाही. हे विश्व म्हणजेच घर, या विश्वाचे म्हणजेच एका अर्थाने आमचेही माता-पिता म्हणजे ती महालक्ष्मी आणि भगवान नारायण.
आपण लहान असताना आपल्याला काही हवे असले तर आपण आधी आईकडेच जातो.. हे स्वाभाविक आपल्याकडून घडते. आपल्याला कुणी तसे शिकवलेले नसते की, आई जवळची वडील लांबचे.. आईकडे आपला स्वाभाविक ओढा असतो. मग आईकडून आपला जो काही प्रस्ताव असतो तो वडिलांकडे जातो. आई महालक्ष्मी आणि भगवंताच्या बाबतीत अगदी असाच प्रकार असतो... आईच आपल्याला भगवंतापर्यंत नेते.
सद्गुरूपद याहून निराळे. ते या लक्ष्मी नारायण माता-पित्यांपर्यंत आपल्याला नेतेही आणि आपल्यासाठी माता-पिता होते देखील. तो आत्ताचा प्रतिपाद्य मुद्दा नाही. पण या तत्त्वांकडे आपल्या पालकांप्रमाणे बघता आले तर त्यांच्याशी संवाद सुरू होतो. क्षणभर आपलं या जगात कुणी नाही असं धरून चाला. आपण अनाथ आहोत. मग आयुष्यातील काही कटु, दुःखद प्रसंगांमधे आपल्याला सहाजिकपणे भरून येतं.. मला कुणीच नाही हे दुःख सांगावं कुणाला? ही भावनिकता भगवंताकडे वळवता आली पाहिजे. काकुळतीला येऊन महालक्ष्मी म्हणजेच आपली आई आहे, सांगावं तिला आपलं सगळं.. काहीही होवो पण या आईच्या मांडीवर अगदी हक्काने डोकं ठेवता येतं हा भाव मनात दाटला पाहिजे. या भावातून कधीतरी भगवंताकडे, या जगन्मातेकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. यासाठी संतांचे अभंग अभ्यासायचे. त्यांनी जसे त्वमेव माता च पिता त्वमेव हे अनुभवले, तसा अनुभव आपल्याला येण्याकरीता संतांच्या रचनांचे चिंतन गरजेचे आहे.
या रचनेचे शेवटचे पद आपण आज आणि उद्या पाहणार आहोत. आई लक्ष्मीला बोलवून तिच्या रूपाचे, कार्याचे वर्णन करून दास शेवटी त्यांनी हे पद कुठे रचले असावे याची एकप्रकारे साक्ष आपल्याला देतात. म्हणजे त्यावरून तसा निष्कर्ष निघू शकतो. दास म्हणतात,
सक्करे तुप्पद कालुवे हारिसि । शुक्रवारद पूजेय वेळेगे ॥
सक्करे म्हणजे साखर, तुप्प म्हणजे तूप. कालुवे म्हणजे पन्हाळ कशी असते त्यासारखे. हारिसि म्हणजे वाहते. शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर तुप यांनी युक्त पंचामृताची एकप्रकारे नदी वाहत असते. पण दासांनी येथे तुप आणि साखर याचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. पंचामृत हा एक अर्थ आहेच पण दुसरा अजून एक अर्थ असाही होतो की,
येथे तुप आणि साखर प्रतिकात्मक आहे. तुप हे बुद्धीवर्धक आहे म्हणजेच विवेक. आणि साखर मधुर, शुद्ध, सत्त्व असणारे म्हणजेच भक्ती. ही विवेक आणि भक्तीची नदी एकप्रकारे तुझ्या आश्रयी वाहत असते. आणि त्याने काय होतं? आम्ही काय करावं? हे पुढच्या पदात सांगतात ते उद्याच्या अखेरच्या भागात जाणून घेऊ.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

Sunday, October 9, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)
हे आई महालक्ष्मी, तू मला असंख्य भाग्य प्रदान करशील किंवा तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. असे भाग्य प्रदान करणारी तू आहेस हे सर्वांना कळू दे यासाठी तू तुझ्या हातातील कंकणांचा आवाज करत ये म्हणजे तुझ्या मायारूपी निद्रेतून आम्ही बाहेर येऊ आणि भगवंताचे ज्ञान आम्हाला होईल. यापुढे दास म्हणतात,
कुंकुमांकिते पंकज लोचने । वेंकटरमणन बिंकद राणि ॥
कुंकुम तुझ्यावर शोभून दिसत आहे. तुझ्या कपाळी कायम कुंकु लावलेले असते. दास येथे म्हणतात की, कुंकु, कुंकुम तुझ्या कपाळी लावलेले आहे आणि तुझे लोचन, डोळे कसे आहेत? तर तू पंकज लोचन आहेस. पंकज म्हणजे कमळ. मागील एक भागात सांगितल्याप्रमाणेच, भगवंताच्या हातातील पद्म, कमळाची उपमा ही मोक्षाशी केलेली आहे. आणि ही आई महालक्ष्मी जी नित्य त्या भगवान नारायणाच्या सान्निध्यात असते ती पंकज लोचन आहे म्हणजे केवळ तिच्या कृपादृष्टीने, कृपाकटाक्षाने आपल्याला तो मोक्षाचा मार्ग सापडतो, तो भगवंत सापडतो. हे आई अशी तू कुंकुमधारण केलेली आणि पंकज लोचन असलेली आहेस. पुढे म्हणतात,
वेंकटरमणन बिंकद राणि ॥
वेंकट रमणाची पत्नी. भगवान व्यकंटेशाची म्हणजेच भगवान नारायणांची राणी. पण तू कशी राणी आहेस तर. बिंकद म्हणजे यायला नाटकं, नखरे करणे. बोलावल्यार लगेच न येणे. पण येथे दास अगदी तशाच्या तशा अर्थी म्हणत नाहीत. म्हणजे बोलावल्यावर तू लगेच येत नाहीस. त्यामुळे तुला सारखे बोलावावे लागते. तुला सारखे आळवावे लागते. अशी तू आहेस आणि तेच मी करत आहे. कपाळी कुंकुम असलेली, कमलासम लोचन असलेली, तू वेंकटरमणाची म्हणजेच नारायणाची राणी आहेस.
पांडुरंगाची लीला -
पुरंदरदासांना प्रत्यक्ष पांडुरंगाने व्यासतीर्थांकडे जाण्यास सांगितले होते. त्यांची नाममुद्रा "पुरंदर विठ्ठल" अशी आहे. विठ्ठल, पांडुरंगच त्यांचे आराध्य होते. पंढरपूर क्षेत्री राहून त्यांनी खूप पदे रचली. आजही पंढरपुरात पुरंदर खांब म्हणून आहे. पंढरपूरला पुरंदरदास नेहमी येत असत. असेच एकदा दास पंढरपूर क्षेत्री असताना घडलेली घटना आपण पाहणार आहोत.
एका रात्री मृत्तिका शौचास जाताना शिष्य अप्पण्णा भागवतास पाणी बाहेर आणून देण्यास सांगितले अप्पण्णा झोपेतच "हो" म्हणाला आणि झोपी गेला. इकडे दास शिष्याची वाट पाहून कंटाळले. आणि अश्याच अवस्थेत घरी येणेही त्यांना योग्य वाटेना. त्याचवेळी पांडुरंगच अप्पण्णा भागवताचे रूप घेऊन आला आणि त्याने पाण्याचा तांब्या दासांसमोर ठेवला. अंधारात दासांना नीट दिसले नाही पण अंधुकसे दिसले की हा अप्पण्णा भागवतच आहे. दासांनी शुद्धी कार्य आटोपून, "काय रे अप्पण्णा, इतका का वेळ लावलास?" म्हणून तांब्या त्याच्या दिशेने भिरकावला तो त्याच्या डोक्याला लागला. अप्पण्णा, "चूक झाली, गुरूजी" म्हणत निघून गेला.
दास घरी आले. अप्पण्णालाही जाग आली. "झोप लागली गुरूजी, विसरलो! हे पहा आत्ता पाणी आणतो." असे म्हणत अप्पण्णा अंगणात आला.
"अप्पण्णा कुठे चाललास? अरे शुद्धीत आहेस ना? माझा तांब्या कुठे ठेवलास?" दास म्हणाले.
"कसला तांब्या गुरूजी?" अप्पण्णा.
"अरे आत्ता मगाशी नाही का मी तुला दिला." दास.
"नाही गुरूजी, मी तर इथेच झोपलो होतो." अप्पण्णा म्हणाला.
"अरे, शेतात तू पाणी आणून दिलेस. आणि मी तो तुझ्याकडे भिरकावला नाही का?" दास म्हणाले.
"गुरूजी अहो खरोखर मी आलो नव्हतो." अप्पण्णा.
"अस्स! मग शेतात कोण आले होते?" दास विचारत पडले. आणि दासांना कळले. पांडुरंगा! काय रे हे देवा माझ्या हातून नीच कर्म करून घेतलेस? असे म्हणत नामस्मरण करत बसले.
काकड आरतीची वेळ आली होती. नित्याप्रमाणे काकड आरती झाली. नंतर भगवंतास अभिषेक सुरू करण्याच्या वेळी पुजाऱ्यांनी मुकुट काढला तेव्हा पाहिले तर डोक्याला टेंगूळ आले आहे असे दिसले आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत आहे. पुजाऱ्यांना हे काहीच कळेना. पुरंदरदास देवळात भजन करत बसले होते. सर्वांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. पुरंदरदासांनी तंबोरा खाली ठेवला. गाभाऱ्यात गेले. भगवंताच्या मूर्तीवरून हात फिरवला. आणि म्हणाले,
"देवा कसले रे हे तुझे विडंबन? महाभारत युद्धात भीष्म-द्रोणांच्या बाणापेक्षा माझा तांब्याने केलेला प्रहार इतका तीक्ष्ण झाला का? पाणी घेऊन तूच आलास ना? अप्पण्णा भागवतास झोप तूच आणलीस ना? पुरे झाले रे हे विडंबन आता." हात फिरवत असताना हळू हळू टेंगूळ नाहीसे झाले आणि अश्रूही थांबले. दास आनंदपूर्ण साश्रुनयनांनी पुजाऱ्यांना म्हणाले, "काही काळजी करू नका अभिषेक चालू करा. भगवंताला त्याच्या भक्ताबरोबर खेळताना लागले होते."
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७