Sunday, October 9, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ८)
हे आई महालक्ष्मी, तू मला असंख्य भाग्य प्रदान करशील किंवा तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. असे भाग्य प्रदान करणारी तू आहेस हे सर्वांना कळू दे यासाठी तू तुझ्या हातातील कंकणांचा आवाज करत ये म्हणजे तुझ्या मायारूपी निद्रेतून आम्ही बाहेर येऊ आणि भगवंताचे ज्ञान आम्हाला होईल. यापुढे दास म्हणतात,
कुंकुमांकिते पंकज लोचने । वेंकटरमणन बिंकद राणि ॥
कुंकुम तुझ्यावर शोभून दिसत आहे. तुझ्या कपाळी कायम कुंकु लावलेले असते. दास येथे म्हणतात की, कुंकु, कुंकुम तुझ्या कपाळी लावलेले आहे आणि तुझे लोचन, डोळे कसे आहेत? तर तू पंकज लोचन आहेस. पंकज म्हणजे कमळ. मागील एक भागात सांगितल्याप्रमाणेच, भगवंताच्या हातातील पद्म, कमळाची उपमा ही मोक्षाशी केलेली आहे. आणि ही आई महालक्ष्मी जी नित्य त्या भगवान नारायणाच्या सान्निध्यात असते ती पंकज लोचन आहे म्हणजे केवळ तिच्या कृपादृष्टीने, कृपाकटाक्षाने आपल्याला तो मोक्षाचा मार्ग सापडतो, तो भगवंत सापडतो. हे आई अशी तू कुंकुमधारण केलेली आणि पंकज लोचन असलेली आहेस. पुढे म्हणतात,
वेंकटरमणन बिंकद राणि ॥
वेंकट रमणाची पत्नी. भगवान व्यकंटेशाची म्हणजेच भगवान नारायणांची राणी. पण तू कशी राणी आहेस तर. बिंकद म्हणजे यायला नाटकं, नखरे करणे. बोलावल्यार लगेच न येणे. पण येथे दास अगदी तशाच्या तशा अर्थी म्हणत नाहीत. म्हणजे बोलावल्यावर तू लगेच येत नाहीस. त्यामुळे तुला सारखे बोलावावे लागते. तुला सारखे आळवावे लागते. अशी तू आहेस आणि तेच मी करत आहे. कपाळी कुंकुम असलेली, कमलासम लोचन असलेली, तू वेंकटरमणाची म्हणजेच नारायणाची राणी आहेस.
पांडुरंगाची लीला -
पुरंदरदासांना प्रत्यक्ष पांडुरंगाने व्यासतीर्थांकडे जाण्यास सांगितले होते. त्यांची नाममुद्रा "पुरंदर विठ्ठल" अशी आहे. विठ्ठल, पांडुरंगच त्यांचे आराध्य होते. पंढरपूर क्षेत्री राहून त्यांनी खूप पदे रचली. आजही पंढरपुरात पुरंदर खांब म्हणून आहे. पंढरपूरला पुरंदरदास नेहमी येत असत. असेच एकदा दास पंढरपूर क्षेत्री असताना घडलेली घटना आपण पाहणार आहोत.
एका रात्री मृत्तिका शौचास जाताना शिष्य अप्पण्णा भागवतास पाणी बाहेर आणून देण्यास सांगितले अप्पण्णा झोपेतच "हो" म्हणाला आणि झोपी गेला. इकडे दास शिष्याची वाट पाहून कंटाळले. आणि अश्याच अवस्थेत घरी येणेही त्यांना योग्य वाटेना. त्याचवेळी पांडुरंगच अप्पण्णा भागवताचे रूप घेऊन आला आणि त्याने पाण्याचा तांब्या दासांसमोर ठेवला. अंधारात दासांना नीट दिसले नाही पण अंधुकसे दिसले की हा अप्पण्णा भागवतच आहे. दासांनी शुद्धी कार्य आटोपून, "काय रे अप्पण्णा, इतका का वेळ लावलास?" म्हणून तांब्या त्याच्या दिशेने भिरकावला तो त्याच्या डोक्याला लागला. अप्पण्णा, "चूक झाली, गुरूजी" म्हणत निघून गेला.
दास घरी आले. अप्पण्णालाही जाग आली. "झोप लागली गुरूजी, विसरलो! हे पहा आत्ता पाणी आणतो." असे म्हणत अप्पण्णा अंगणात आला.
"अप्पण्णा कुठे चाललास? अरे शुद्धीत आहेस ना? माझा तांब्या कुठे ठेवलास?" दास म्हणाले.
"कसला तांब्या गुरूजी?" अप्पण्णा.
"अरे आत्ता मगाशी नाही का मी तुला दिला." दास.
"नाही गुरूजी, मी तर इथेच झोपलो होतो." अप्पण्णा म्हणाला.
"अरे, शेतात तू पाणी आणून दिलेस. आणि मी तो तुझ्याकडे भिरकावला नाही का?" दास म्हणाले.
"गुरूजी अहो खरोखर मी आलो नव्हतो." अप्पण्णा.
"अस्स! मग शेतात कोण आले होते?" दास विचारत पडले. आणि दासांना कळले. पांडुरंगा! काय रे हे देवा माझ्या हातून नीच कर्म करून घेतलेस? असे म्हणत नामस्मरण करत बसले.
काकड आरतीची वेळ आली होती. नित्याप्रमाणे काकड आरती झाली. नंतर भगवंतास अभिषेक सुरू करण्याच्या वेळी पुजाऱ्यांनी मुकुट काढला तेव्हा पाहिले तर डोक्याला टेंगूळ आले आहे असे दिसले आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी येत आहे. पुजाऱ्यांना हे काहीच कळेना. पुरंदरदास देवळात भजन करत बसले होते. सर्वांनी त्यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. पुरंदरदासांनी तंबोरा खाली ठेवला. गाभाऱ्यात गेले. भगवंताच्या मूर्तीवरून हात फिरवला. आणि म्हणाले,
"देवा कसले रे हे तुझे विडंबन? महाभारत युद्धात भीष्म-द्रोणांच्या बाणापेक्षा माझा तांब्याने केलेला प्रहार इतका तीक्ष्ण झाला का? पाणी घेऊन तूच आलास ना? अप्पण्णा भागवतास झोप तूच आणलीस ना? पुरे झाले रे हे विडंबन आता." हात फिरवत असताना हळू हळू टेंगूळ नाहीसे झाले आणि अश्रूही थांबले. दास आनंदपूर्ण साश्रुनयनांनी पुजाऱ्यांना म्हणाले, "काही काळजी करू नका अभिषेक चालू करा. भगवंताला त्याच्या भक्ताबरोबर खेळताना लागले होते."
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: