Tuesday, October 11, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ९)
दासपरंपरेतील दासश्रेष्ठ संत श्रीपुरंदरदास यांच्या भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या रचानेचे निरूपण, दासांच्या भावावस्थेचे चिंतन आपण गेले काही भाग बघत आहोत. या भावावस्थेला दास पोहोचले ते आई लक्ष्मीची कृपा झाली म्हणूनच. त्यानंतर स्वतःचे असे काहीच राहिले नाही. हे विश्व म्हणजेच घर, या विश्वाचे म्हणजेच एका अर्थाने आमचेही माता-पिता म्हणजे ती महालक्ष्मी आणि भगवान नारायण.
आपण लहान असताना आपल्याला काही हवे असले तर आपण आधी आईकडेच जातो.. हे स्वाभाविक आपल्याकडून घडते. आपल्याला कुणी तसे शिकवलेले नसते की, आई जवळची वडील लांबचे.. आईकडे आपला स्वाभाविक ओढा असतो. मग आईकडून आपला जो काही प्रस्ताव असतो तो वडिलांकडे जातो. आई महालक्ष्मी आणि भगवंताच्या बाबतीत अगदी असाच प्रकार असतो... आईच आपल्याला भगवंतापर्यंत नेते.
सद्गुरूपद याहून निराळे. ते या लक्ष्मी नारायण माता-पित्यांपर्यंत आपल्याला नेतेही आणि आपल्यासाठी माता-पिता होते देखील. तो आत्ताचा प्रतिपाद्य मुद्दा नाही. पण या तत्त्वांकडे आपल्या पालकांप्रमाणे बघता आले तर त्यांच्याशी संवाद सुरू होतो. क्षणभर आपलं या जगात कुणी नाही असं धरून चाला. आपण अनाथ आहोत. मग आयुष्यातील काही कटु, दुःखद प्रसंगांमधे आपल्याला सहाजिकपणे भरून येतं.. मला कुणीच नाही हे दुःख सांगावं कुणाला? ही भावनिकता भगवंताकडे वळवता आली पाहिजे. काकुळतीला येऊन महालक्ष्मी म्हणजेच आपली आई आहे, सांगावं तिला आपलं सगळं.. काहीही होवो पण या आईच्या मांडीवर अगदी हक्काने डोकं ठेवता येतं हा भाव मनात दाटला पाहिजे. या भावातून कधीतरी भगवंताकडे, या जगन्मातेकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. यासाठी संतांचे अभंग अभ्यासायचे. त्यांनी जसे त्वमेव माता च पिता त्वमेव हे अनुभवले, तसा अनुभव आपल्याला येण्याकरीता संतांच्या रचनांचे चिंतन गरजेचे आहे.
या रचनेचे शेवटचे पद आपण आज आणि उद्या पाहणार आहोत. आई लक्ष्मीला बोलवून तिच्या रूपाचे, कार्याचे वर्णन करून दास शेवटी त्यांनी हे पद कुठे रचले असावे याची एकप्रकारे साक्ष आपल्याला देतात. म्हणजे त्यावरून तसा निष्कर्ष निघू शकतो. दास म्हणतात,
सक्करे तुप्पद कालुवे हारिसि । शुक्रवारद पूजेय वेळेगे ॥
सक्करे म्हणजे साखर, तुप्प म्हणजे तूप. कालुवे म्हणजे पन्हाळ कशी असते त्यासारखे. हारिसि म्हणजे वाहते. शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर तुप यांनी युक्त पंचामृताची एकप्रकारे नदी वाहत असते. पण दासांनी येथे तुप आणि साखर याचाच प्रामुख्याने उल्लेख केला आहे. पंचामृत हा एक अर्थ आहेच पण दुसरा अजून एक अर्थ असाही होतो की,
येथे तुप आणि साखर प्रतिकात्मक आहे. तुप हे बुद्धीवर्धक आहे म्हणजेच विवेक. आणि साखर मधुर, शुद्ध, सत्त्व असणारे म्हणजेच भक्ती. ही विवेक आणि भक्तीची नदी एकप्रकारे तुझ्या आश्रयी वाहत असते. आणि त्याने काय होतं? आम्ही काय करावं? हे पुढच्या पदात सांगतात ते उद्याच्या अखेरच्या भागात जाणून घेऊ.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: