Sunday, August 23, 2020

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह – दि.27.07.2020, सोमवार, श्री.मोरेश्वर रबडे,पुणे

     श्री.मोरेश्वर रबडे, पुणे प्रवचन सत्रात 7 वे पुष्प गुंफले.  निरुपणात त्यानी भगवत्गीतेतील 9 व्या अध्यायावर विचार मांडला.हा महत्वाचा , परमार्थाच्या अनेक कल्पना, हि-याप्रमाणे चमकणारा, विचाराची शृंखला तयार करुन अमृतपान करविले. राजविद्या राजगुह्य योग हा 9 वा अध्याय पु.गुरुदेवांना आवडता विषय.हे गुह्यतम ज्ञान गुप्त गुढ असे ज्ञान, ब्रह्मज्ञान (आत्मानुभूतिचे स्वरुप) आहे. हे श्रवण करुन त्याचा अनुभव घेतल्यास, या मायाचक्र –   जन्म मरण फे-यातून मुक्ति लाभते. ज्ञानेश्वर वचनामृतातून विचार मांडतात. 

(14) आत्मा द्रष्टा व प्रकृति कत्री (ज्ञा.9/110-129)

     साक्षात्कार हे तत्वज्ञानाचे व्याकरण आहे. गुरुदेव म्हणतात, ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान हे भ.गीतेच्या तत्वज्ञानावर आधारलेले आहे. त्यातील मुख्य प्रकृति पुरुष यांचा संबंध होय. पुरुष कांही करत नाही.प्रकृति सर्व करते. प्रकृति शरीरात जागृत असून जागत्या पुरुषापासून दूर राहते. पुरुष हा प्रकृतिमध्ये लोपून जातो. काकासाहेब म्हणतात,प्रकृति सर्व करते. प्रकृति उदयोस्तु असते. प्रकृति माया नावाने ओळखते. ही अस्थिर असते. नामानी प्रकृतिच्या पलिकडे जाऊ शकते. प्रकृति चंचल आहे.प्रकृति म्हणजे संसारातील सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ.नामानी प्रकृतिच्या पलिकडे जाता येते. माया हे दृष्य जग म्हणजे प्रकृति. अजातवाद/मायावादातून बाहेर पडले पाहिजे.ईश्वर नाही म्हणणारे बुध्दीवादी. रामदास म्हणतात, ‘’रिता ठाव या राघवेवीण नाही’’ म्हणून नामाची कास धरुन मायानदी (प्रकृति) ओलांडता येते. 

(36) देवाचा जगताशी संबंध (ज्ञानेश्वरी – 9/286-293)

नामरुपाच्या ओलाव्यात देव असतो. अनन्य शरण येणा-याला देव जवळ करतो.

 ब्रह्म रुपाने  हा सर्व भूतात आहे. सृष्टी क्षय मीच घडवून आणतो. ज्ञानदृष्टीने पाहिले असता देव/ब्रह्माचे स्वरुप जाणता येते. 

38. ईश्वराला स्थूल दृष्टीने पाहणे हे पहाणे नव्हे. (ज्ञानेश्वरी -9/140-152)

     ईश्वराचा प्रत्यय स्थूल दृष्टीने होऊ शकत नाही. ज्ञानदृष्टीने अवलोकावे लागते.

39.ईश्वरास मानुष्यधर्म लावणे हें चुकीचे (ज्ञा.9/156-171) 

    मला अनाम्याला अनंत नांवाने संबोधतात. मी विदेही असून मला देहधर्म लावतात. मी वर्णहीन/गुणातीत/अवयव विरहीत अस माझ स्वरुप आहे. पण जग मला मनुष्य रुपात पहातात. मला बाल, तरुण, वृध्दत्व नाही. पण त्याही स्वरुपात पहातात. पु.अंबुराव महाराजाना  प्रकाशाच्या स्वरुपात महाराजांच दर्शन झाल. 

45.ज्ञान हे ईश्वरापुढे अज्ञान होय. ( ज्ञा.9/367-381)

    गुरुदेव म्हणतात – आपला शरीरभाव सोडल्यावाचून, गुणातीत होऊन , सर्व संपत्तिची कुरवंडी केल्यावाचून देवाचे स्वरुप कळणे शक्य नाही. 

63. अखंड अगर्वता (ज्ञा.9/22-227)

     अमानित्व गुणच ‘’अखंड अगर्वता’’ या सदराखाली ज्ञानेश्वरानी अध्याय 9 मध्ये वर्णिला आहे. सर्व जगच देवाचे स्वरुप आहे. त्यात लहान,मोठा हा भेद उरत नाही. उंचीवरील पाणी जसे नम्रपणाने खाली येते, त्याप्रमाणे सर्वाशी नम्रतेने वागावे.

      राजविद्या व राजयोग या 9 व्या अध्यायातून ब्रह्मज्ञानाच्या स्वरुपाचे वर्णन –आणि त्यातून साक्षात्काराने योगी-ज्ञानी आत्मत्वाने जाणून ‘ब्रहमविद् ब्रह्मैव भवति’’या श्रुतीत सांगितल्याप्रमाणे  ब्रह्मरुपतेस  प्राप्त होतात  म्हणजे सत्-चित-घन् निरतिशयानंद ब्रह्मच होतात. निरतिशयानंद प्राप्ति आणि सकल संसार दुःख निवृत्ति हे मोक्षाचे स्वरुप होय.

।। राजाधिराज सद्गुरुमहाराज की जय ।।

सोलापूर, 27.07.2020,सोमवार.VINAYAK KULKARNI

No comments: