Sunday, August 23, 2020

 ।। श्री सद्गुरु समर्थ ।।

श्रावण मास साधना सप्ताह दि.30.07.2020 गुरुवार – डॉ.अनिलकुमार,मुंबई

डॉ.अनिलकुमार कुलकर्णी, मुंबई यांनी हरिपाठातील 27वी खालील दिलेल्या ओवीवर निरुपण केले.

सर्वसुखगोडी साही शास्त्रे निवडी ।

रिकामा अर्धघडी राहू नको ।।

 हरिपाठातील हरी ‘हरण करतो, तो हरी’ दूःख दारिद्र अज्ञान हरण  करतो. हा उपसंहारात्मक सहा चरणाचा अभंग आहे. सहा शास्त्र – न्याय, वैशेषिक, सांख्य, पुर्व-मीमांसा व उत्तर मीमांसा, ही सहाही हरिचेच गुण गातात. ‘’सुखाचे सुख हरिमुख’’ असे हरिचेच वर्णन आहे. साधना, साध्य आणि सुख हे हरिचेच सुत्र आहे. ज्ञानेश्वर माऊली ‘’सुलभ सोपा भक्तिमार्ग हरिपाठातून सर्वसामान्यासाठी सांगतात. ‘’देवाचिये व्दारी उभा क्षणभरी’’ याव्दारा भक्तिमार्ग दाखवितात. येथे क्षणभर म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. अश्या या देवव्दारी उभा राहून भक्ति रुजु करशील तर ती भक्ति तुला देवाच्या गाभा-यापर्यंत थेट हरिपाशी नेऊन सोडील. ती प्रेमाने,  आर्ततेने झाली पाहीजे. सर्व सुख्याच्या मुळाशी जी गोडी आहे त्या आत्मरुप हरिचा अनुभव घे. सर्व संसारी व्यवहार मिथ्या म्हणजे भ्रमरुप आहेत. मायिक दृष्य पसाराचा विचार, त्या बाधित करुन त्यातील चित्त काढून घे. त्याकडे दुर्लक्ष कर. मनात करुणेला जप. हरिपाठ हा चालता बोलत्या समाधिची संजीवनी आहे. सद्गुरु वचन हेच श्रेष्ठ. अन्य नाही. संकल्प काय तर ‘’प्रपंच ओसरो’’.प्रपंच हा होतच असतो. तो करावा लागत नाही. त्यातील तुझी सक्रियता कमी कर. आणि ती सक्रियता भक्तिमार्गाला लाव. परमार्थ/प्रपंचात कोणी नाही अशी वृत्ति असो. काळजी फक्त नामाची कर. काळजी घ्यायची ती सद्गुरुवरील विश्वासाची. निजवृत्ति ही माया. या निजवृत्तिला परमेश्वराकडे वळव. सर्वसुखगोडी – जीवाच मूळ स्वरुप सच्चिदानंद आहे. अंतःकरण परमेश्वर चिंतनानी भारली पाहिजे. जीवाला जीवत्व लाभल पाहिजे. ज्ञान, नीति, आनंद हे नामानी लाभो. सर्वसुख ईश्वर चिंतनात आहे. ध्यानमग्न स्थितीत मनाची स्थिती नामानी उंचावते.

     ज्ञाता आणि ज्ञेय हे एक होण्याची स्थिती म्हणजे अव्दैतावस्था. रिकामा अर्धघडी सर्वसुखाला (पारमार्थिक ) ओहोटी लावते. म्हणून नामाशिवाय राहू नकोस. सतत नामात लीन हो.’’तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तिचिये वाटे लाग । या पावसी अव्यंग । धाम  माझे ।‘’ ‘’ मन हे मिची करी । माझिया भजनी प्रेम धरी ।‘’

     मनाच्या एक कोप-यात नाम सतत हव. सद्गुरु कृपेनी नाम मिळाल आहे. एक क्षणही नामाशिवाय राहू नकोस. ‘’राम हमारा जप करे’’ ही अवस्था भक्तिप्रेमाने प्राप्त करून घे. सर्वक्षण सहस्त्रनाम होऊ दे. हेच सहस्त्रविष्णु नाम’’. गुरुदेव प्रत्येक क्षण सतत नामस्मरण,भजन,वाचन, पोथी, लेखनात मग्न असत.सतत अनुसंधान. आपल्या प्रत्येक कृतित गुरुदेवांच स्मरण असल पाहिजे. साधकाना विश्रांति नाही. सतत विविध प्रकारच्या स्मरण,वाचन, भजनात व्यस्त असल पाहिजे. त्यामुळे ‘सर्वसुखगोडी’ उंचावते.बाबा म्हणत नारायण, नारायण हेच सत्य आहे. ते घट्ट पकड. आनंदच – नामच सोबत येणार आहे. सदा सर्वदा ‘मोकळी वृत्ति’ असावी. ही मोकळी वृत्ति नामाने समृध्द कर. ‘’आप है तो हरि नही । हरि है तो आप नही।‘’ मनाच्या अरुंद जागेत एका वेळी एकच गोष्ट राहू  शकते. ते म्हणजे देव-नाम-सद्गुरु हेच मनात सतत असू दे. अथवा ती रिकामा अर्ध घडी होईल. ‘’इंद्रा सवडी लपू नको’’ प्रकृतिची सबब सांगून साधनेपासून लांब राहू नकोस. ‘’चिंटी चावल ले चली । बीच मे मिल गइ दाल । कह कबीर दो ना मिले । इक ले दुजा डाल।‘’ प्राक्तनानी जे मिळत त्याचा सद्गुरुप्रसाद म्हणून स्वीकार कर. जादा मिळण्यासाठी धडपड करो नकोस. सर्व संसारी प्रत्येक वस्तुसुध्दा देवापुढे ठेव आणि तुझ्याकृपेने हे मिळत, ही भावना असू दे. त्यामूळे सद्गुरु शरणगमनवृत्ति वाढते. परमार्थाचे शिखर म्हणजे सर्वस्व अर्पण. तेव्हा देवाच सानिध्य लाभत.त्याला करुणेने जवळ कर.

लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी । येत नाही खरे त्यातुनिया ।

त्यासारखे तुम्ही जाणा साधु वृत्ति । पुन्हा न मिळती मायाजाळ ।

मीठ जसे पाण्यात विरघळून जाते, त्याप्रमाणे तुम्ही या ‘सर्वसुखगोडीत’ एकरुप व्हा. ‘मी’चा नाश झाल्यावर अविनाशी आनंद हेच आत्मानंद. 

सदा विषय चिंतिता विषवल्ली वाढते. विषय चिंतनाच पाणी तोडा आणि ते परमेश्वर चिंतनाकडे लावा. म्हणजे भक्तिच रोपट जोमान फोफावत. आंधळ्याने दोरी ओढल्यासारखे नाम घ्या. सतत चिंतन भगवंताच होऊ दे. भगवंताला विसरण्यासारख पाप नाही. निजवृत्ति – या सर्व मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ईश्वर चिंतनाला/नामाला लावा. देव हा नामानी अंतःकरणात प्रतिष्ठित करायचा आहे. आणि ते सद्गुरुकृपेनी होतो. म्हणून सतत भजननामात रहा. महाराज बाबाना म्हणाले ‘’ निन् सेवा –काय वर्णू’’. अशी सद्गुरुकृपा पाहिजे. नाम हेच ‘’सर्वसुख गोडी’’ झाले पाहीजे. हीच सद्गुरुकृपा – हेच अव्दैतावस्था.

।। राजाधिराज सद्गुमहाराज की जय ।।


सोलापूर, दि.30.07.2020

9921659780.

No comments: