Thursday, September 26, 2019

कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥१॥
लसुण मिरची कोथिंबरी । अवघा झाला माझा हरि ॥२॥
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी ॥३॥
सांवतां म्हणे केला मळा । विठ्ठलपायीं गोविला गळा॥४॥
ऎसें कैसियानें भेटती ते साधू । ज्याचा अतर्क्य तर्कवेना बोध । ज्यांसी निजानंदी आनंदु । ज्याचा परमानंदी उद्वोधु ॥२॥
पवना घालवेल पालाण । पायीं चढवेल गगन । भुत भविष्य कळो येईल वर्तमान । परी त्या साधूचें न कळे महिमान ॥३॥
चंद्रामृत सुखें सेववेल । रवि अस्ता जाता धरवेल । बाह्या हेळा सागर तरवेल । परी त्या साधूची भेटी न होईल ॥४॥
जप तप करवेल अनुष्ठान । ध्येय ध्याता धरवेल निजध्यान । ज्ञेय ज्ञाता विवर्जित ज्ञान । ज्ञाना ध्यानाचे मूळ हे साधुजन ॥५॥
निजवृत्तीचा करवेल निरोधु । जीवाशिवाचा भोगवेल आनंदु । एका जनार्दनी निजसाधु । त्याच्या दर्शनें तुटे भवबंधु ॥६॥
🌸 संत श्री एकनाथ महाराज 
।। श्री सद्गुरू समर्थ ।।
क्षेत्र निंबाळ, श्रावण साधना सप्ताह 2019 दि.29-08-2019,डॉ. अनिल कुमार कुलकर्णी मुंबई, आजच्या प्रवचन' संतांचे संगती मनोमार्ग गति। आकळावा श्रीपती येणे पंथे । या संत वचनाचा धागा धरुन संत संगति हे किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करताना म्हणतात ईश्वराचे गुण दर्शन संतामध्ये दिसतात. 'तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण। तरीच महिमान येईल कळो। या उक्तीप्रमाणे पु. गुरुदेवांनी महाराजांच्या संगतीत राहून सूक्ष्म निरीक्षण केले, आणि महाराजांच्या अंगीभूत गुणाचे वर्णन करताना म्हणतात, महाराजांमध्ये निस्पृहता, दयाळूपणा, दृढतर मनोनिग्रह, आबालवृद्धांशी समता, शिष्यावर अलोट प्रेम, सद्गुरू वर निस्सीम भक्ती, अलौकीक शांति, उपाधिपासून अलिप्तता वगैरे गुण होते. अज्ञानाधंकाराचा नाश करण्याचे दिव्यकार्य हाती घेतले.ईश्वराचे सर्व गुण त्यानी महाराजात पहिले.हे महाराजानी निर्गुण भक्तिने प्राप्त
केलेले सगुणरुप.
मलाही नामाच्या द्वारे सद्गुरू कृपेने, शरणागतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल, अशी श्रध्देची पातळी पुर्ण झाली पाहिजे.
दत्त जयंतीच्या सप्ताहात निम्बर्गी महाराजांपुढे भक्तीची रुजवात होते. सद्गुरु बद्दल दृढ श्रद्धा होण्याइतपत भक्तिची वाटचाल विनाखंड/ शरणागत भावनाने झाली पाहिजे. तेव्हा जाणता भक्त सद्गुरूभक्तीत धन्य होतो. सहवासानी प्रेम येतं.
सद्गुरु सानिध्यात वारंवार गेलं पाहिजे.
उपराष्ट्रपती राधाकृष्ण यांनी गुरुदेवाना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत जाव ते तुम्हाला मानाने बोलवितात. पण गुरुदेवाची तयारी नव्हती. तेव्हां निदान माझ्या नावाची शिफारस करा म्हणून गुरुदेवांना विनविले. महाराजांच्या अनुमतिने श्री राधाकृष्णन त्यांच्या नावाची शिफारस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला केली. थोडक्यात पु. गुरुदेवांना मानाच्या पदाची अभिलाषा नव्हती.निंबाळला महाराजावरील दृढ श्रद्धेनी' रामप्रेमपुरनगर' निर्माण केले. या भक्तीनगरीत साधकानी वारंवार याव असे गुरुदेवांना वाटायच. सद्गुरूच चिंतन वारंवार झालं पाहिजे. म्हणजे श्रद्धा दृढतर होण्यास मदत होईल. जो भक्त भक्तीचं सतत गुणगान करतो, त्याची वाट भगवंत पाहत असतो. भक्तांच्या
अंतःकरणात ईश्वर वास नाम रूपाने करतो. श्रेष्ठ भक्ती सद्गुरू चरीत्राने अंतःकरणात ठसल्याने दृढ होते.साधकातून सिध्द कसे झाले
त्याप्रमाणे जीवन समृद्ध होणार आहे याच वारंवार निरिक्षण केलं पाहिजे.
श्री.काकासाहेब तुळपुळे, 1926 साल,नेम होईना म्हणून कल्पनेने अस्वस्थ होतात.कल्पना येणे वाईट नाही पण कृति वाईट. दुराचार वाईट. अंतरमनात कल्पना येतात पण त्याचा पिच्छा करु नये.मग तो हळूहळू विरु
लागतात. सद्गुणाचा विकास होत होत मनात सद्गुरू विषयी भाव निर्मिती होते. नैसर्गिक प्रवाह विषयाकडून देवाकडे नेतो.
दूरदर्शन हे आत्मदर्शनाकडे
वळते. तेव्हा मनाचे उन्मन होते.संकल्पाला उर्ध्वगती मिळते आणि ते ईश्वरवाटेवर नेते.विकल्प
अधोगतीला नेते आणि विषयात रमते.कठोपनिषदात.रथाची उपमा आहे.बुध्दि सारथी घोडे.मनच बंधमोक्षास कारणीभूत होते. म्हणूनच
"संतांचे संगती मनोमार्ग गति' ने "विषय तो झाला नारायण"भक्ताचा पुर्ण विकास होतो. मूळ उगमाकडे जाण ही भक्ति मनुष्याच्या अंतरंगात बदल घडवत. देहबुद्धी चे परिवर्तन आत्मबुध्दित होते.दृष्याच आकर्षक कमी होत ते आत्मदृष्याकडे वळते.
देवाच्या विचारात मन एकवटत.
मनावरच पटल क्षीण होत पुर्णत्वाच्या
स्वरुपाकड जात.दृष्टी उर्ध्व होत. नराचा नारायण स्वरुपाकडे धांव सुरु होते.God push to devotee .Devotee shd.push towards God. स्वये येतो नारायण तळमळत्या भक्त भेटीला. हेच पुर्णत्व.
हेच परमानंद.
।। राजाधिराज सद्गुरूनाथ महाराज की जय ।।
श्रीगुरुदेव रानडे
नामसाधनेचे स्वरुप
श्रीगुरुदेवांच्या एका आरतीत निंबाळ आश्रम म्हणजे नामाची नेमाची ही साधन पेठ असे म्हटले गेले आहे. नामस्मरणाने ईश्वरदर्शन घडून येऊ शकते, हा नाम विचार सांगताना श्रीगुरुदेवांनी साधनाचे चार प्रकार एका बैठकीत सांगितले आहेत.
१) नामजप माळेवर करणे. ही साधनेची सुरवात होय.
२) स्मरण म्हणजे सदैव आणि सर्वत्र नामाचे अनुसंधान ठेवणे होय.
३) नेम म्हणजे आसन सिध्द होऊन ठराविक वेळी आणि नित्याने नाम घेणे.
४) ध्यान म्हणजे नामस्मरण करीत असताना देवाचे अनुभव घेऊन त्याचेशी आनंदाने एकरुप होणे होय.
नाम जप हा श्वासोच्छ्वासात करावा. नामस्मरणाची सवय होई पर्यंत माळेवर जप करावा. पुढे माळ न घेता नामस्मरण हे सदैव आणि सर्वत्र करावे. गुरुकृपांकित नामाला सबीज नाम असे म्हटले जाते. त्यांत सद्गुरुंची कृपादृष्टी असल्याने अनुभव/प्रचिती लवकर येते. बिंदू, नाद, तेज, रंग, आकार इ. अनुभव हे निर्गुण देवाचे असल्याने अशा दर्शनाला वस्तू असे म्हटले गेले आहे. नामस्मरण किती आणि कसे करावे याविषयी दासबोधांत म्हटल्या प्रमाणे
नित्यनेमप्रातःकाळी
माध्यान्हकाळी सायंकाळी
नामस्मरण सर्वकाळी
करीत जावे !!
असा बोध निंबरगी संप्रदायाने प्रधान मानला आहे. गुरुसेवा करणे म्हणजे गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करणे होय.
प.पू.गोंदवलेकर महाराज यांनीही नामस्मरणास महत्व दिले असून त्यांचे भाष्यकार प्रा. के. वि. बेलसरे हे प्रत्येक प्रवचनातून गुरुदेवांच्या नामविचारांचा व निंबाळ येथील नामसाधनेचा उल्लेख करीत असत.
॥ श्रीसद्गुरु समर्थ ॥
।श्रीगुरुदेवांच्या आठवणी
प.पू.श्रीशिवलिंगव्वा अक्कांचे पत्र.
कै.म.न देशपांडे यांनी त्यांच्या आठवणीत श्रीगुरुदेवांनी बोलावलेल्या शेवटच्या सिटिंगचा भावपूर्वक उल्लेख केला आहे. त्या सिटिंगमध्ये श्रीगुरुदेवांनी प.पू.श्रीशिवलिंगव्वा अक्कांचे व श्रीसमर्थ भाऊसाहेब महाराजांचे अशी दोन पत्रे वाचून घेतली.
आजच्या आठवणीत आपण प.पू.शिवलिंगव्वा अक्कांचे ते पत्र पाहूया.
पत्र क्र १०२
श्रीगुरुसमर्थ
श्रीमंत सकलानंद सत्यस्वरुप आनंदभरित बुध्दिवान पुरुष आत्माराम अच्युत-गहन रामराव अण्णा दत्तात्रेय रानडे यांस जतेहून सिवक्का यांचा दोन्ही कर जोडून, समर्थचरणी मस्तक ठेवून त्रिकाळी अति
नम्रतेचा शिर साष्टांग दीर्घ दंडवत नमस्कार अशीर्वाद.
श्रीसमर्थकृपेकडून इकडील सर्व क्षेम असो.
समर्थांचा (१) चैत्र उत्सव आनंद आनंद थाट थाटाने जहाला. त्या समर्थांचा महिमा या चर्मतोंडाने सांगता येत नाही.
थोर भाग्याचे आम्ही तरी आहे
श्रीगुरु केला हो जाण बाप-माये ।
या वाक्याप्रमाणे माझे माय-बाप श्रीगुरुसमर्थच (२) झाल्याने मी किती ऐश्वर्यात होते हे माझे मलाच माहीत. त्या समर्थाचे व उपकाराचे वर्णन या चर्मतोंडाने किती केले तरी काय होणार आहे ?
आता या वचनाचा आविर्भाव असा आहे की बैरंग (बहिर्रंग) कामा नये. अंतरंग काही केल्या सोडू नये, असे समर्थांचे वाक्य असून मूळपर्यंत शोधूनही त्याकडे वरवरचे (वरवरची) भक्ती करेल तो एक मूर्ख. तर मूळ समर्थांकडे लक्ष देऊन भक्ती चालवेल तोच एक श्रेष्ठ गुरु. त्यांच्या आज्ञेवाचून काही केल्या हलणार नाही. अमचे कर्तृत्व……. श्रीगुरुसमर्थ.
(१) श्रीनिंबरगी महाराजांची पुण्यतिथी चैत्र शुध्द १३ ला असते.म्हणून हा उल्लेख श्रीसद्गुरु समर्थ निंबरगी महाराजांचा आहे.
(२) या ठिकाणी समर्थ म्हणजे प.पू.शिवलिंगव्वाचे सद्गुरु श्रीभाऊसाहेब महाराज
हे होत.
प.पू.शिवलिंगव्वा अक्कांचे वरील पत्र वाचल्यावर दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात .
१ ) त्यांची श्रीभाऊसाहेब महाराजांविषयी असलेली अनन्यसाधारण भक्ती. व
२) त्यांना जाणवलेली श्रीगुरुदेवांची पारमार्थिक योग्यता व श्रीगुरुदेवांसंबंधी असलेली आत्मियता .
आणि मग सहजच आपल्या मनात श्री.म.न.देशपांडे यांना सुचलेला “ अशा आत्यंतिक भक्तीला आपण केव्हातरी पोहचूं का ?” असा विचार आल्याशिवाय रहात नाही.
क्रमशः ………….
संदर्भ: पृ.क्र.१७६, “ श्रीगुरुदेव रा.द.रानडे यांची जावक पत्रे “ संग्राहक व प्रकाशक - दीपक आपटे
संपादन : डाॅ. अश्विनी अविनाश जोग.
संकलन :दिलीप र.नाईक.
॥ राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
०००००००©©©०००००००
जातां पंढरीस सुख वाटे जीवा ।
आनंदे केशवा भेटतांचि ॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं ।
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे ॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार ।
ऐसे वैष्णव दिगंबर दावा कोठें ॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक ।
ऐसा वेणूनादीं कान्हा दावा ॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ।
ऐसें पाहतां निर्धार नाही कोठें ॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संती ।
या परती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

।। श्री सद्गुरु समर्थ ।।
श्रीक्षेत्र निंबाळ श्रावण साधना सप्ताह 2019 - दि.30-08-2019, सप्ताह समाप्तिचे प्रवचन डॉ. अनिलकुमार कुलकर्णी, मुंबई, माऊलीचे अभंग " संताचे संगती मनोमार्ग गती" यावर चर्चा पुढे ठेवताना म्हणतात,' 'आकळावा श्रीपति येणे पंथे' आकळावा म्हणजे मायेच्या बंधनात विस्मरणाने दूर केलेला हरी आपलासा करावा. तो प्रेम आणि भक्तीने आपलासा होतो. देव हा भावाचा भुकेला आहे. त्याचे भाव भक्तिने सान्निध्य लाभते. "मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला । एक नाम हरी द्वैत नाम दूरी। विषयासक्तापासून देव लांब जातो. जेथे प्रेम आणि भक्ती आहे, जो प्रेमाने प्रार्थना करतो, त्याला देवाचे सानिध्य लाभते. जेथे मनात द्वैत आहे, संशय आहे,विश्वास नाही, त्याला देव गवसत नाही.
ईश्वराकडे जाण्याचा एकच मार्ग,साक्षात्कारी संतांच्या द्वारे लाभतो.भावेविण न कळे निसंदेह.जेथे भाव आहे, भक्ति आहे,तेथेच देवाचा वास आहे."रामकृष्ण वाचा हा भाव जीवाचा" जीवाचा भाव हा शिवाचा झाला पाहिजे. नामाचा भाव श्रेष्ठ आहे. त्या भावात गुंतलेले मन ईश्वराकडे ओढ घेते. म्हणून आत्मारामच श्रेष्ठ.
श्री बाळ शास्त्री आठवले 1920 साली पुण्याला अध्यात्मभुवनात आले. ते म्हणाले ,अरे रामराया तू रामाला श्रेष्ठ मानत नाहीस. श्री. गुरुदेव आदराने त्याना म्हणाले, 'राम राम सारेच म्हणती, न ओळखिती आत्माराम. गुरु मुखातून नाम मिळाल्यावर आत्मारामाकडे जाण्याची पायवाट सापडते.
श्री गुरुदेव बाळशास्त्रीना म्हणाले, पतंजली ऋषीनी ज्याला नमन केले आहे तो शेष आपण पाहिला आहात काय? अचानक या प्रश्नाने शास्त्रीजी गोंधळले. पु. गुरुदेव त्यांना आदराने म्हणाले, पतंजली ऋषीनी ज्या शेषाला नमन केले, तो पाच फण्यांचा शेष आता माझ्या दृष्टीसमोर आहे.
नाम कसे श्रेष्ठ आहे हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. रामनामाने लिहिलेले दगड तरतो, पण श्रीरामाने टाकलेला दगड बुडाला. त्यावर हनुमानाला प्रभूनी विचारलं त्यावर भक्त हनुमान विनयाने मार्मिकपणे उत्तर दिले, ज्या दगडाचा रामाचा आधार सुटला, तो तरलच कसा.
पंधरा वर्ष साधना करणारे साधक श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी, विमान वेगाने अनुभव येतात आणि दुसऱ्या दिवशी वेग कमी होतो. कारण 15 वर्षाचे साधन श्रावणाच्
या पहिल्या दिवशीच उफाळून येत. भक्त गुरुस्थानी आला की अंतकरण मृदु होतं. त्याचा भाव वृद्धीस लागतत्यांची्ा एकदा दौऱ्यावर गेले होते. ससर्दीने त्यांना फार बेजार केले. श्वास घेणे अवघड होऊ लागले. मनात रुकावट येऊ लागले. तेव्हा तेथल्या डॉक्टरनी त्यांच्या नाकात स्प्रे मारून नाक मोकळे केले. त्यांच्या श्वासोश्वातील नाम घेणे सुकर झाले. तेव्हा ते डॉ.ना म्हणाले, तुम्ही देवासारखे भेटलात. माझं नामस्मरणातील रुकावट दूर केलेत. केवढी ही त्यांची मृदुता.
तासा तासानी नामस्मरण होतं का? याची वरचेवर नोंद घ्यावी म्हणजे नामाचे अनुसंधान दीर्घकाळ होत राहिल.
असंच नामाच महात्म अधिक स्पष्ट करतानाडॉ.नी उदाहरण दिले. एकदा माऊली आणि नामदेव मारवाड प्रांतात दौऱ्यावर गेले होते. तेव्हा ते दोघे ताहनेने व्याकेळ झाले. पाणी कोठेच दृष्टीस पडेना. एका खोल विहीरीत तळाशी पाणी होते. माऊलीनी सूक्ष्म होऊन पाणी पिऊन आले. नामदेवाला विठ्ठलाचा विश्वास. नामदेवाच्या कळकळीची अंतकरण युक्त प्रार्थना ऐकून विठ्ठलाने पाण्याचा स्रोतच नामदेवाच्या ठाई निर्माण केला. नामदेव पाणी पिऊन तृप्त झाले. ही नामाची किमया. देव भक्तांच्या अंकित होतो. श्री गुरुदेव म्हणाले नामाचं विसर शक्यच नाही. It is better to die than to forget the name of God. I do wish to I've with Nam.
नाम हा विषय श्रवण, किर्तन, वाचन, मनन यानी अंतकरण मृदु होऊन नामा चा वास सदैव राहतो. इतर आवरणानी ते साकाळता कामा नये. याची दक्षता फक्त घेत असतो. भक्तीभावाने साधना केली असता देव नाम रूपाने भक्तांच्या अंतकरणात सतत वास करतो. सत्संगाने जे होईल ते इतर मार्गानी होणार नाही. सत्संगाने भक्त हा सतत भक्तीच्या वाटेवर असतो. म्हणून सतत गुरु सान्निध्यात येणेचे महत्व. अनुसंधानात बाधा येत नाही. भावभक्ती वाढते. सद्गुरू वर श्रद्धा दृढ होते. सद्गुरुच सर्व कर्ता आहे हे उमजत. मनातील सर्व द्वंद लयास जात. मनात प्रेम भक्तीचा ओलावा सतत टिकतो. One pointed devotion ने मन एकाग्र होऊन नामात स्थिर होतं. म्हणजे सतत विषयात रमणारे मन देव मार्गाकडे वळते." विषय तो त्याचा झाला नारायण" या शब्दात संत भक्ताची थोरवी वाढवितात. तेव्हाच 'एक तत्त्व दृढ धरी मना । हरीसी करुणा येईल तुझी।,' याचे मर्म भक्त जाणतो. नामच हे सार आहे. बाकीचे असार. द्वैताचे बंधन तुटते म्हणजे संशय/ विस्मरण लयास जातात. हृदयात आत्मारामाचा सदा वास राहतो.' ब्रह्म सत्य जगन्मिथ्या' याची जाण येते. सद्गुरु नाम देतात तेच ब्रह्म आहे.' नामामृत गोडी वैष्णवा लाधली' भक्ताला हे अमृतनाम लाभतं.. तहानभूक हरपते. भक्ताच्या प्रत्येक पेशीतून हे अमृत स्त्रवू लागते.
" विठ्ठल विठ्ठल गजरी" भक्तीपर
पद ऐकत असता, श्री गुरुदेव विठ्ठल नामात तल्लिन झाले. नामामृत आज घटाघटा प्यालो असे महाराज म्हणत असत. आनंदाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आनंद हेच ब्रह्म. नित्य नवा आनंदाचा अनुभव येतो. तो देवा जवळ घेऊन जातो . नव्हे नव्हे देवच भक्ताकडे धावत येतो. अशी भक्ती अंतःकरणात सदा वास करो. सद्गुरु तुमच्या अंतकरणात आला तर तुम्ही तरुन जाल. माझ्या सद्गुरुनी अध्यात्मिक क्षेत्रात साक्षात्कारी संता पर्यंत अनुभव दिला.
कदायुला नारदाकडे सुपूर्त केले. तिला नारायणाचा जप सांगितला. प्रल्हादानी तो गर्भात असताना ऐकला. प्रल्हादाची निष्ठा नामावर स्थिर झाली. उद्धवाला गुरुदेव सर्वोच्च भक्त मानत. उद्धवला कृष्णावर गाढ श्रध्दा होती.
असे नामाचे महत्त्व आहे. एक नाम मुखात सतत यायला, शत जन्म घ्यावे लागतात. संसारात राहून सर्व ऐश्वर्य भोगून हे नाम साध्य करता येते. त्यासाठी मायेची बेडी सोडावी लागते. अनंत जन्माचे पुण्य असेल तरच मुखी नाम येईल. या जन्मात प्राप्त झालेले नाम पुनर्जन्मात आपल्या बरोबर येते. अपयश हा दोष नाही. प्रयत्न महत्त्वाचे. भगवंत प्रत्यक्ष ब्रह्म आहे. त्यांनी आपल्याला हाताशी धरलेले आहे. ज्याला साधन मानवल, नराचा नारायण होतो. त्यासाठी ध्येय निश्चिती पाहिजे. बाबा म्हणतात नामाशिवाय जगणे व्यर्थ आहे.
म्हणून हे सर्व साध्य करण्यासाठी भक्तानी मन बुद्धी अहंकार सर्व सद्गुरुना अर्पण करावं, म्हणजे " याच वाटे पांडुरंग भेटे."
राजाधिराज सद्गुरू महाराज की जय।
----------------
पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या ॥१॥
नारा विठा महादा पाठविला गोंदा । झाडावया जागा समाधीच्या ॥२॥
परिसा भागवत चांगदेव हातें । आणिलें साहित्य समाधींचें ॥३॥
तुळसी बुका बेल दर्भ आणि फुलें । उदक चांगलें भोगावतीचें ॥४॥
भस्म पितांबर भगवीं तीं वस्त्रें । योगी दिगंबर समागमें ॥५॥
नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वर । होईल उशीर समाधीसी ॥६॥
विठ्ठल आमुचें सुखाचे जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥
विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥
विठ्ठलापरतें न दिसे सर्वथा । कल्प येतां जातां गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्तीं आहे सुखरूप । संकल्प विकल्प मावळती ॥४॥
विठ्ठल आमुचें सुखाचे जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥
विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥
विठ्ठलापरतें न दिसे सर्वथा । कल्प येतां जातां गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्तीं आहे सुखरूप । संकल्प विकल्प मावळती ॥४॥
काय विरक्ति कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥२॥
कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥३॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥४॥
तुका म्हणे आम्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥२॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥
तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥५॥
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥
पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा | लिंब लोन करा सावळ्याला ||धृ||
दूरच्या भेटीला बहु आवडीचा | जीवन सरिता नारायण ||१||
सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी | मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२||
तुका म्हणे माझा आला सखा हरी | संकट निवारी पांडुरंग ||३||

श्रीमुख चांगलें कांसे पीतांबर । वैजयंती हार रुळे कंठीं ॥१॥
तो माझ्या जीवींचा जिवलग सांवळा । भेटावा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धांवणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्‍त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हां रक्षी नानापरी ॥४॥
इहलोकींचा हा देह । देव इच्छिताती पाहे ॥१॥
धन्य आम्ही जन्मा आलों । दास विठोबाचें झालों ॥२॥
आयुष्याच्या या साधनें । सच्चिदानंद पदवी घेणें ॥३॥
तुका म्हणे पावटणी । करुं स्वर्गाची निशाणी ॥४॥
एकतत्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसि करूणा येईल तूझी ॥१॥
तें नाम सोपें रें राम कृष्ण गोविंद ।
वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा,
वायां आणिका पंथा जाशी झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं,
धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥





॥ श्रीसद्गुरु समर्थ ॥
।श्रीगुरुदेवांच्या आठवणी।
श्री.दत्तात्रय रामकृष्ण पाठक , कोल्हापूर यांनी सांगितलेली आठवण.
कै म.न.देशपांडे यांनी मागील आठवणीत श्रीगुरुदेवांसमवेत श्रीनिंबरगी महाराजांच्या समाधीजवळ दि.१३ जानेवारी १९५७ रोजी काढलेल्या फोटोची सांगितलेली माहिती आपण वाचली. आज श्री.दत्तात्रय पाठक, ज्यांना हा दुर्मिळ फोटो घेण्याचं भाग्य लाभलं , त्यांनी सांगितलेली या फोटोची आठवण पाहूया.
……….गुरुदेवांचा हा अखेरचा फोटो फार बोलका आहे. गुरुदेव समाधिमंदिराच्या कमानीत उभे आहेत. नजर अनंतावर खिळली आहे. गाभार्याकडे जाणार्या पायर्यांवर शिष्यवर्ग दाटीदाटीने बसला आहे.काहीजण उभे आहेत. गंमत म्हणजे गुरु उभे व शिष्य बसलेले अशी इथे देवाघरची उलटी खूण आहे.
या अर्थपूर्ण फोटोबद्दल पाठक म्हणतात,
“ गुरुदेव निंबरगीला जाणार अशी कुणकुण लागल्याबरोबर मी निंबाळला गेलो. एक दिवस गुरुदेव घराच्या पुढच्या दाराजवळ उभे होते. तेव्हा फोटो घेण्याची मला इच्छा झाली, पण त्यांची संमती मिळाली नाही. माझा एक फोटो मी काढू देईन असा त्यांनी मला दिलासा दिला.
ते निंबरगीला निघाले रे निघाले की एकजात सगळी मंडळी निघाली. बोलावण्याची कुणी वाट पाहिली नाही. जवळजवळ २०-२५ लोक होते. मोठ्या उल्हासाने ट्रकमधून सर्वजणं निंबरगीला पोचले.
मी भीमरायाच्या देवळात गेलो तेव्हा, ‘ हे देऊळ आपण पाहिले आहे व इथे नगारखान्यात आपल्याला नाम मिळाले, ‘ असे स्वप्नात पाहिल्याचे मला आठवले. हे मी गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, “ अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही. नामस्मरण करा.”
निंबरगी महाराजांच्या समाधीपुढे कापूर लावून झाला. गुरुदेव बाहेर येऊन उभे राहिले व फोटो घ्यावा असे मला त्यांनी सांगितले. मंडळी भराभर गोळा झाली आणि जिथे जागा मिळाली तिथे पटापटा बसली. बाकीची उभी राहिली. गुरुदेवांबरोबर फोटोत येण्याची पर्वणी कोण सोडेल ? फोटो निघाला. गुरुदेवांनी सहजच शिष्यांकडे हात केला आणि म्हणाले,” निंबरगी महाराज मेंढपाळ होते. त्यांनी आपल्या सगळ्या मेंढ्या सांभाळल्या.” हे बोल गुरुदेवांना स्वतःलाही सहीसही लागू पडत नाहीत का ?
आणखी एका प्रसंगी या फोटोची गोष्ट निघाली होती. १३ मार्च १९५७ ला मी कोल्हापूरहून मुंबईला डाॅ. रा.ह. करमरकरांकडे गेलो. गुरुदेव अलाहाबादला जाताना तिथे उतरले होते , तेव्हा त्यांचं दर्शन घ्यावं हा उद्देश होता.
मला पाहताक्षणी त्यांनी विचारले, “ तुम्ही इथे कसे ? “ “ काल मला एकदम वाटलं की आपण मुंबईला जावं. सकाळी ग्रॅंटरोडला बाळासाहेब ताम्हनकरांकडे गेलो. त्यांनी मला आपण इथे असल्याचं सांगितलं, म्हणून आलो.”
त्यांनी निंबरगीला काढलेल्या फोटोचा अर्थ मंडळींना विचारला. कुणाकडेही उत्तर नव्हतं. मग ते स्वतःच म्हणाले, “ या लोकांच्या सेवेसाठी मी येथे उभा आहे. फोटोबद्दल बोलणे झाल्यावर गुरुदेव माझ्याकडे वळून म्हणाले, “ तुम्ही नशिबवान आहांत.” ते ऐकून मला स्वर्ग दोन बोटं उरला. रात्री ९ वाजता गुरुदेवांना निरोप द्यायला मी स्टेशनवर गेलो.
१०.३० वाजता मला कोल्हापूरहून फोन आला की , ‘ मुलगा आजारी आहे, ताबडतोब या .’ मी निघालो हे खरं, पण माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. गुरुदेवांनी मला नशिबवान म्हटल्यावर भीती कुठली ? इकडे डाॅक्टरांनी मुलाची आशा सोडली होती. त्याला काही होणार नाही अशी माझी बालंबाल खात्री होती. मुलगा त्या दुखण्यातून सहीसलामत उठला.”
( पाठकांना लाभलेलं हे गुरुदेवांचं अखेरचं दर्शन.)
संदर्भ : पृ.क्र.९४ -९६, ‘ वैकुंठा श्रीरंग बोलावितो ‘ ,” गुरुदेव रा.द.रानडे अलाहाबाद विद्यापीठातील कारकीर्द व इतर लेख. अनुवादिका : पद्मा कुलकर्णी.
मूळ इंग्रजी लेख Pg.160-162, ‘Final Farewell ‘ by Prof. B.R.Kulkarni.
“ Gurudev R. D. Ranade A Glance At His Allahabad University Days And Other Essays.” Editor : B.R. Kulkarni.
Publishers : Mrs. Sunanda Shintre and Mrs. Ashwini Jog, Solapur.
( Publishers of both the books.)
संकलन : दिलीप र. नाईक.
॥राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
०००००००©©©०००००००