॥ श्रीसद्गुरु समर्थ ॥
।श्रीगुरुदेवांच्या आठवणी।
श्री.दत्तात्रय रामकृष्ण पाठक , कोल्हापूर यांनी सांगितलेली आठवण.
कै म.न.देशपांडे यांनी मागील आठवणीत श्रीगुरुदेवांसमवेत श्रीनिंबरगी महाराजांच्या समाधीजवळ दि.१३ जानेवारी १९५७ रोजी काढलेल्या फोटोची सांगितलेली माहिती आपण वाचली. आज श्री.दत्तात्रय पाठक, ज्यांना हा दुर्मिळ फोटो घेण्याचं भाग्य लाभलं , त्यांनी सांगितलेली या फोटोची आठवण पाहूया.
……….गुरुदेवांचा हा अखेरचा फोटो फार बोलका आहे. गुरुदेव समाधिमंदिराच्या कमानीत उभे आहेत. नजर अनंतावर खिळली आहे. गाभार्याकडे जाणार्या पायर्यांवर शिष्यवर्ग दाटीदाटीने बसला आहे.काहीजण उभे आहेत. गंमत म्हणजे गुरु उभे व शिष्य बसलेले अशी इथे देवाघरची उलटी खूण आहे.
या अर्थपूर्ण फोटोबद्दल पाठक म्हणतात,
“ गुरुदेव निंबरगीला जाणार अशी कुणकुण लागल्याबरोबर मी निंबाळला गेलो. एक दिवस गुरुदेव घराच्या पुढच्या दाराजवळ उभे होते. तेव्हा फोटो घेण्याची मला इच्छा झाली, पण त्यांची संमती मिळाली नाही. माझा एक फोटो मी काढू देईन असा त्यांनी मला दिलासा दिला.
ते निंबरगीला निघाले रे निघाले की एकजात सगळी मंडळी निघाली. बोलावण्याची कुणी वाट पाहिली नाही. जवळजवळ २०-२५ लोक होते. मोठ्या उल्हासाने ट्रकमधून सर्वजणं निंबरगीला पोचले.
मी भीमरायाच्या देवळात गेलो तेव्हा, ‘ हे देऊळ आपण पाहिले आहे व इथे नगारखान्यात आपल्याला नाम मिळाले, ‘ असे स्वप्नात पाहिल्याचे मला आठवले. हे मी गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, “ अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही. नामस्मरण करा.”
निंबरगी महाराजांच्या समाधीपुढे कापूर लावून झाला. गुरुदेव बाहेर येऊन उभे राहिले व फोटो घ्यावा असे मला त्यांनी सांगितले. मंडळी भराभर गोळा झाली आणि जिथे जागा मिळाली तिथे पटापटा बसली. बाकीची उभी राहिली. गुरुदेवांबरोबर फोटोत येण्याची पर्वणी कोण सोडेल ? फोटो निघाला. गुरुदेवांनी सहजच शिष्यांकडे हात केला आणि म्हणाले,” निंबरगी महाराज मेंढपाळ होते. त्यांनी आपल्या सगळ्या मेंढ्या सांभाळल्या.” हे बोल गुरुदेवांना स्वतःलाही सहीसही लागू पडत नाहीत का ?
आणखी एका प्रसंगी या फोटोची गोष्ट निघाली होती. १३ मार्च १९५७ ला मी कोल्हापूरहून मुंबईला डाॅ. रा.ह. करमरकरांकडे गेलो. गुरुदेव अलाहाबादला जाताना तिथे उतरले होते , तेव्हा त्यांचं दर्शन घ्यावं हा उद्देश होता.
मला पाहताक्षणी त्यांनी विचारले, “ तुम्ही इथे कसे ? “ “ काल मला एकदम वाटलं की आपण मुंबईला जावं. सकाळी ग्रॅंटरोडला बाळासाहेब ताम्हनकरांकडे गेलो. त्यांनी मला आपण इथे असल्याचं सांगितलं, म्हणून आलो.”
त्यांनी निंबरगीला काढलेल्या फोटोचा अर्थ मंडळींना विचारला. कुणाकडेही उत्तर नव्हतं. मग ते स्वतःच म्हणाले, “ या लोकांच्या सेवेसाठी मी येथे उभा आहे. फोटोबद्दल बोलणे झाल्यावर गुरुदेव माझ्याकडे वळून म्हणाले, “ तुम्ही नशिबवान आहांत.” ते ऐकून मला स्वर्ग दोन बोटं उरला. रात्री ९ वाजता गुरुदेवांना निरोप द्यायला मी स्टेशनवर गेलो.
१०.३० वाजता मला कोल्हापूरहून फोन आला की , ‘ मुलगा आजारी आहे, ताबडतोब या .’ मी निघालो हे खरं, पण माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. गुरुदेवांनी मला नशिबवान म्हटल्यावर भीती कुठली ? इकडे डाॅक्टरांनी मुलाची आशा सोडली होती. त्याला काही होणार नाही अशी माझी बालंबाल खात्री होती. मुलगा त्या दुखण्यातून सहीसलामत उठला.”
( पाठकांना लाभलेलं हे गुरुदेवांचं अखेरचं दर्शन.)
संदर्भ : पृ.क्र.९४ -९६, ‘ वैकुंठा श्रीरंग बोलावितो ‘ ,” गुरुदेव रा.द.रानडे अलाहाबाद विद्यापीठातील कारकीर्द व इतर लेख. अनुवादिका : पद्मा कुलकर्णी.
मूळ इंग्रजी लेख Pg.160-162, ‘Final Farewell ‘ by Prof. B.R.Kulkarni.
“ Gurudev R. D. Ranade A Glance At His Allahabad University Days And Other Essays.” Editor : B.R. Kulkarni.
Publishers : Mrs. Sunanda Shintre and Mrs. Ashwini Jog, Solapur.
( Publishers of both the books.)
संकलन : दिलीप र. नाईक.
॥राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
No comments:
Post a Comment