विठ्ठल आमुचें सुखाचे जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥
विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥
विठ्ठलापरतें न दिसे सर्वथा । कल्प येतां जातां गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्तीं आहे सुखरूप । संकल्प विकल्प मावळती ॥४॥
काय विरक्ति कळे आम्हां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥१॥
नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥
शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥२॥
कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥३॥
कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥४॥
तुका म्हणे आम्हां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥५॥
जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥१॥
दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥
गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥२॥
सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥३॥
तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥४॥
तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥५॥
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥१॥
पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥
मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥२॥
योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥३॥
तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥४॥
विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरा | लिंब लोन करा सावळ्याला ||धृ||
दूरच्या भेटीला बहु आवडीचा | जीवन सरिता नारायण ||१||
सर्व माझे गोत्र, मिळाले पंढरी | मी माझ्या माहेरी धन्य झालो ||२||
तुका म्हणे माझा आला सखा हरी | संकट निवारी पांडुरंग ||३||
श्रीमुख चांगलें कांसे पीतांबर । वैजयंती हार रुळे कंठीं ॥१॥
तो माझ्या जीवींचा जिवलग सांवळा । भेटावा हो डोळां संतजन ॥२॥
बहुतांचें धांवणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥
चोखा म्हणे वेदशास्त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हां रक्षी नानापरी ॥४॥
No comments:
Post a Comment