पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या ॥१॥
नारा विठा महादा पाठविला गोंदा । झाडावया जागा समाधीच्या ॥२॥
परिसा भागवत चांगदेव हातें । आणिलें साहित्य समाधींचें ॥३॥
तुळसी बुका बेल दर्भ आणि फुलें । उदक चांगलें भोगावतीचें ॥४॥
भस्म पितांबर भगवीं तीं वस्त्रें । योगी दिगंबर समागमें ॥५॥
नामा म्हणे देवा उठवा ऋषीश्वर । होईल उशीर समाधीसी ॥६॥
विठ्ठल आमुचें सुखाचे जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥
विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥
विठ्ठलापरतें न दिसे सर्वथा । कल्प येतां जातां गर्भवास ॥३॥
नामा म्हणे चित्तीं आहे सुखरूप । संकल्प विकल्प मावळती ॥४॥
No comments:
Post a Comment