श्रीगुरुदेव रानडे
नामसाधनेचे स्वरुप
श्रीगुरुदेवांच्या एका आरतीत निंबाळ आश्रम म्हणजे नामाची नेमाची ही साधन पेठ असे म्हटले गेले आहे. नामस्मरणाने ईश्वरदर्शन घडून येऊ शकते, हा नाम विचार सांगताना श्रीगुरुदेवांनी साधनाचे चार प्रकार एका बैठकीत सांगितले आहेत.
१) नामजप माळेवर करणे. ही साधनेची सुरवात होय.
२) स्मरण म्हणजे सदैव आणि सर्वत्र नामाचे अनुसंधान ठेवणे होय.
३) नेम म्हणजे आसन सिध्द होऊन ठराविक वेळी आणि नित्याने नाम घेणे.
४) ध्यान म्हणजे नामस्मरण करीत असताना देवाचे अनुभव घेऊन त्याचेशी आनंदाने एकरुप होणे होय.
नाम जप हा श्वासोच्छ्वासात करावा. नामस्मरणाची सवय होई पर्यंत माळेवर जप करावा. पुढे माळ न घेता नामस्मरण हे सदैव आणि सर्वत्र करावे. गुरुकृपांकित नामाला सबीज नाम असे म्हटले जाते. त्यांत सद्गुरुंची कृपादृष्टी असल्याने अनुभव/प्रचिती लवकर येते. बिंदू, नाद, तेज, रंग, आकार इ. अनुभव हे निर्गुण देवाचे असल्याने अशा दर्शनाला वस्तू असे म्हटले गेले आहे. नामस्मरण किती आणि कसे करावे याविषयी दासबोधांत म्हटल्या प्रमाणे
नित्यनेमप्रातःकाळी
माध्यान्हकाळी सायंकाळी
नामस्मरण सर्वकाळी
करीत जावे !!
असा बोध निंबरगी संप्रदायाने प्रधान मानला आहे. गुरुसेवा करणे म्हणजे गुरुंनी दिलेल्या नामाचे स्मरण करणे होय.
प.पू.गोंदवलेकर महाराज यांनीही नामस्मरणास महत्व दिले असून त्यांचे भाष्यकार प्रा. के. वि. बेलसरे हे प्रत्येक प्रवचनातून गुरुदेवांच्या नामविचारांचा व निंबाळ येथील नामसाधनेचा उल्लेख करीत असत.
No comments:
Post a Comment