Thursday, September 26, 2019

॥ श्रीसद्गुरु समर्थ ॥
।श्रीगुरुदेवांच्या आठवणी
प.पू.श्रीशिवलिंगव्वा अक्कांचे पत्र.
कै.म.न देशपांडे यांनी त्यांच्या आठवणीत श्रीगुरुदेवांनी बोलावलेल्या शेवटच्या सिटिंगचा भावपूर्वक उल्लेख केला आहे. त्या सिटिंगमध्ये श्रीगुरुदेवांनी प.पू.श्रीशिवलिंगव्वा अक्कांचे व श्रीसमर्थ भाऊसाहेब महाराजांचे अशी दोन पत्रे वाचून घेतली.
आजच्या आठवणीत आपण प.पू.शिवलिंगव्वा अक्कांचे ते पत्र पाहूया.
पत्र क्र १०२
श्रीगुरुसमर्थ
श्रीमंत सकलानंद सत्यस्वरुप आनंदभरित बुध्दिवान पुरुष आत्माराम अच्युत-गहन रामराव अण्णा दत्तात्रेय रानडे यांस जतेहून सिवक्का यांचा दोन्ही कर जोडून, समर्थचरणी मस्तक ठेवून त्रिकाळी अति
नम्रतेचा शिर साष्टांग दीर्घ दंडवत नमस्कार अशीर्वाद.
श्रीसमर्थकृपेकडून इकडील सर्व क्षेम असो.
समर्थांचा (१) चैत्र उत्सव आनंद आनंद थाट थाटाने जहाला. त्या समर्थांचा महिमा या चर्मतोंडाने सांगता येत नाही.
थोर भाग्याचे आम्ही तरी आहे
श्रीगुरु केला हो जाण बाप-माये ।
या वाक्याप्रमाणे माझे माय-बाप श्रीगुरुसमर्थच (२) झाल्याने मी किती ऐश्वर्यात होते हे माझे मलाच माहीत. त्या समर्थाचे व उपकाराचे वर्णन या चर्मतोंडाने किती केले तरी काय होणार आहे ?
आता या वचनाचा आविर्भाव असा आहे की बैरंग (बहिर्रंग) कामा नये. अंतरंग काही केल्या सोडू नये, असे समर्थांचे वाक्य असून मूळपर्यंत शोधूनही त्याकडे वरवरचे (वरवरची) भक्ती करेल तो एक मूर्ख. तर मूळ समर्थांकडे लक्ष देऊन भक्ती चालवेल तोच एक श्रेष्ठ गुरु. त्यांच्या आज्ञेवाचून काही केल्या हलणार नाही. अमचे कर्तृत्व……. श्रीगुरुसमर्थ.
(१) श्रीनिंबरगी महाराजांची पुण्यतिथी चैत्र शुध्द १३ ला असते.म्हणून हा उल्लेख श्रीसद्गुरु समर्थ निंबरगी महाराजांचा आहे.
(२) या ठिकाणी समर्थ म्हणजे प.पू.शिवलिंगव्वाचे सद्गुरु श्रीभाऊसाहेब महाराज
हे होत.
प.पू.शिवलिंगव्वा अक्कांचे वरील पत्र वाचल्यावर दोन गोष्टी ठळकपणे जाणवतात .
१ ) त्यांची श्रीभाऊसाहेब महाराजांविषयी असलेली अनन्यसाधारण भक्ती. व
२) त्यांना जाणवलेली श्रीगुरुदेवांची पारमार्थिक योग्यता व श्रीगुरुदेवांसंबंधी असलेली आत्मियता .
आणि मग सहजच आपल्या मनात श्री.म.न.देशपांडे यांना सुचलेला “ अशा आत्यंतिक भक्तीला आपण केव्हातरी पोहचूं का ?” असा विचार आल्याशिवाय रहात नाही.
क्रमशः ………….
संदर्भ: पृ.क्र.१७६, “ श्रीगुरुदेव रा.द.रानडे यांची जावक पत्रे “ संग्राहक व प्रकाशक - दीपक आपटे
संपादन : डाॅ. अश्विनी अविनाश जोग.
संकलन :दिलीप र.नाईक.
॥ राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
०००००००©©©०००००००

No comments: