Sunday, July 17, 2016

श्रीमद्‍आनंदतीर्थांनी मांडलेला "तत्त्ववाद" - भाग २
श्री व्यासतीर्थांनी लिहिलेला तत्त्वावादाचा श्लोक आपण विस्तृतपणे बघणार अहोत.
श्रीमन्मध्वमते हरिः परतरः सत्यं जगत तत्त्वतो ।
भेदो जीवगणाः हरेरनुचराः नीचोच्चभावङ्गताः ॥
मुक्तीर्नैजसुखानुभूतिरमलाभक्तीश्च तत्साधनं ।
ह्यक्षादित्रितयं प्रमाणमखिलाम्नायैकवेद्यो हरिः ॥

श्री व्यासतीर्थांनी अतिशय उत्तमरीत्या पूर्ण तत्त्ववाद या एका श्लोकात बसविला आहे. या श्लोकातून तत्त्ववादाची ९ प्रमेय आपल्या पुढे येतात. ती आपण एक-एक करून पाहू.
१. हरिः परतरः - हरि म्हणजे भगवान विष्णु, श्रीमन्नारायण हेच सर्वोच्च आहेत. तेच सर्वश्रेष्ठ आहेत. परब्रह्म तत्त्व म्हणजेच नारायण आहेत. नारायण सूक्तामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहेच. नारायण परब्रह्म तत्त्वं नारायण परः । स्वतः नारायणांनीच हंसरूपाने येऊन चतुर्मुख ब्रह्मदेवांना उपदेश केला. चतुर्मुख ब्रह्मदेवांचे गुरू म्हणजेच नारायण आहेत.
नारायण असे उच्चरले की, शंख, चक्र, गदा,पद्म धारण केलेले, शेषशयनी असलेले असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण मध्वाचार्यांनी नारायणाला या पलिकडे जाणले आहे. तैत्तिर्य उपनिषदामधील परब्रह्माची व्याख्या सत्य, ज्ञान, अनंत यांनी युक्त असलेले तत्त्व अशी आहे. आणि हेच खऱ्या नारायणाचे स्वरूप आहे. ते निराकार आहे. अनंत आणि परिपूर्ण अश्या गुणांचे ते तत्त्व आहे. बृह् धातूपासून ब्रह्म शब्द तयार होतो. बृह् म्हणजे वाढणे किंवा वृद्धि पावणे. जे अतिशय मोठे आहे ते म्हणजे ब्रह्म. याचाच अर्थ त्याच्यापासून दुसरे कुणी मोठे नाही. त्यामुळे असे परब्रह्म तत्त्व नारायण सर्वोच्च आहेत. परिपूर्ण गुणांनी युक्तं असलेल्या, सृष्टीच्या निर्मिती, पालन आणि विनाश इत्यादी कार्ये करणाऱ्या परब्रह्म नारायाणाचे वर्णन मध्वाचार्य पुढील प्रमाणे करतात,
नारायणाय परिपूर्ण गुणार्णवाय ।
विश्वोदयस्थितिलयोन्नियति प्रदाय ॥
ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्य दुःख ।
सत्कारणाय वितताय नमो नमस्ते ॥
आणि म्हणूनच मध्वाचार्य स्पष्टपणे सांगतात की परब्रह्म तत्त्व हे "सगुण" आहे. सामान्यतः सगुणाची व्याख्या सत्व,रज,तम गुण असलेले सगुण अशी आहे. ही सगुणाची व्याख्या मध्वाचार्यांना येथे अपेक्षित नाही. परब्रह्म तत्त्व अनंत आणि परिपूर्ण गुणांनी युक्त असल्यामुळे त्याला सगुण असे म्हटले आहे. पण ते जाणण्यासाठी, त्याच्या अनुभूतीसाठी सत्व,रज,तम या गुणांनी युक्तं असलेल्या तत्त्वाची गरज आहे. या त्रिगुणातूनच सगुणाकडे प्रवास करायचा आहे. खऱ्या परब्रह्म तत्त्वाची अनुभूती ही साक्षात्कारी पुरूषांनी घेतलेली असते. आपल्यासाठी ते शक्य तितके त्याचे रूप, वर्णन करत असतात पण ते वर्णना पलिकडचे तत्त्व असल्यामुळे त्यात त्यानांही मर्यादा येतात. मध्वाचार्य सांगतात की, देहबुद्धीने जाणण्याचा हा विषय नाही. त्यामुळे देहबुद्धीने याचा अनुभव घेता येत नाही. हे तत्त्व केवळ आणि केवळ ‘साक्षी’ ही आत्म्याची शक्ती जाणू शकते.
असे परब्रह्म तत्त्व गुणांनी युक्त आहे. तेथे कुठलाच दोष नाही. दोषविरहित असे ते आहे. नारायण या शब्दाचा अर्थही तोच आहे. अर म्हणजे दोष. न हा विरूद्धार्थी अर्थ दर्शवतो. त्यामुळे त्याचे नार असे होते. जो दोष विरहित आहे आणि गुणांनी युक्त आहे असा नारायण. असा हा नारायण सर्व जीवांमध्ये प्रतिबिंब रूपाने निवास करत आहे. त्याचे स्मरण, त्याची अनन्य भक्ती हीच त्या बिंबरूपी सगुणब्रह्मापर्यंत आपल्याला नेईल असे मध्वाचार्य सर्वांना सांगत आहेत.
क्रमश:

No comments: