***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग १०)
आई महालक्ष्मीच्या नवरात्र उत्सवानिमित्त गेले नऊ दिवस आपण संत श्री पुरंदरदासांच्या रचनेचे निरूपण बघत आहोत. त्या निरूपणाचा, चिंतनाचा आज अंतिम भाग आपण बघणार आहोत.
खरे म्हणजे संतांनी रचलेल्या अभंगांचे,ग्रंथांचे,स्तोत्रांचे निरूपण हे संतांनीच करावे. त्यांना त्यातून नक्की काय मार्गदर्शन करायचे आहे, त्यामागील त्यांचा काय भाव आहे हे आपल्या बुद्धीच्या पलिकडचेच आहे. ते शक्य होत नसल्यामुळे आपण त्यातल्या त्यात शब्दांप्रमाणे अर्थ घेतो. पण संतांनी ते शब्दांपलिकडच्या भावातून रचलेले असते.
श्रीमध्वाचार्य एके ठिकाणी सांगतात, शास्त्र, ग्रंथांचा अभ्यास करताना भगवंताचे अधिष्ठान, त्याची कृपा का हवी, तर एका शब्दाचे किमान ४ आणि कमाल १०० अर्थ निघतात. आणि आचार्यांनी हे ऋग्वेदावरील भाष्यात आणि इतर ग्रंथामध्ये करूनही दाखवले आहे. तर अशा वेळी कोणत्या ठिकाणी नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे समजण्यासाठी भगवंताची कृपा हवी. आपल्या सर्वांमध्ये साक्षी नावाची एक शक्ती आहे. त्यानेच हे जाणता येते आणि त्या साक्षीला जागृत करण्यासाठी भगवंताची कृपा हवी. त्यानंतर जे चिंतन, निरूपण घडते ते ग्रंथ, अभंगांना सर्वार्थाने न्याय देणारे असते.
प्रस्तुत निरूपण हे शब्दांप्रमाणे जाणारेच आहे. त्याला दासांच्या भावावस्थेची जोड दिली आहे. काही गोष्टी या अंतःप्रेरणेतून घडत असतात. त्या प्रेरणेला लेखणीची जोड देणाराही भगवंतच आहे. त्याच्या प्रसादामुळेच हे निरूपण देणे शक्य झाले आणि पुढेही देता येईल. यात रचनेचा विपर्यास करण्याचा, मनाचे घालण्याचा हेतू नव्हताच आणि कदापि असणारही नाही. ज्याअर्थी दहा दिवस खंड न पडता निरूपण पूर्ण झाले त्याअर्थी ते त्यानेच करून घेतले. तथापि विद्वान,पंडित,अभ्यासक,संशोधक यांना काही गोष्टी खटकल्या असल्यास त्यांनी त्या दुरूस्त कराव्यात. बाकी सर्व जगन्मातेचरणी अर्पण!
आई, शुक्रवारी तुझ्या पुजेच्यावेळी साखर आणि तूप यांनी युक्त पंचामृताची नदी वाहत असते. यानंतर दास म्हणतात,
अक्करेयुळ्ळ अळगिरिरंगन । चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि ॥
अक्करेयुळ्ळ म्हणजे प्रेमाने ओतप्रोत भरलेले, अळगिरीरंगन म्हणजे श्रीरंगमचे रंगनाथस्वामी! अळगिरीरंगा हे विशेषणात्मक वापरले आहे. चोक्क पुरंदर विठ्ठलन राणि! "चोक्क" म्हणजे शुद्ध, निष्कलंक! रंगनाथ म्हणजे नारायणच!! त्याचं वर्णन दास इथे करतात, तो प्रेमाने भरलेला आहे. ज्याच्याकडून आपल्याला प्रेम, प्रेम आणि प्रेम इतकंच मिळेल असा प्रेमानेयुक्त अळगिरीचा रंगनाथ आहे.
आणि पुढे रचनेचा शेवट करताना म्हणतात की, या पुरंदराला, या भगवंताच्या एका दासाला, शुद्ध निष्कलंक कोणी केलं? ज्याला भगवंताचा विसर पडला, त्याला त्यातून कोणी बाहेर काढलं? तर त्याच्या राणीने म्हणजेच आई लक्ष्मीने! जिने तो मायेचा डाग पुसून मला निष्कलंक, शुद्ध केले आणि भगवंताच्या प्रेमाचा अनुभव दिला. अशी त्याची राणी महालक्ष्मी मी तुला बोलवत आहे!
दास रचनेच्या शेवटी रंगनाथस्वामींचा विशेषकरून उल्लेख करतात, त्यावरून दास श्रीरंगनाथाच्या इथे असतानाच त्यांनी रचना केली असावी असे वाटते. त्या परब्रह्म नारायणाचे प्रेम आम्हाला लाभावे म्हणूनच आम्ही तुझ्याचरणी राहावं म्हणजे तेथून वाहणाऱ्या भक्ती, विवेकाचा स्पर्श आम्हाला होईल.
आज विजया दशमीच्या दिवशी हेच मागणं आईकडे मागूया. ती भगवंताचे जे दास्य करते, ती जशी त्याची शुद्ध भक्ती करते त्यातली थोडीतरी आपल्याला जमावी, जेणेकरून त्या भगवंताचे प्रेम आपल्याला मिळेल, आपल्या योग्यतेनुसार त्याचे ज्ञानानंदादि गुणांनी युक्त असे स्वरूप जाणता येईल आणि तेव्हाच आपले या जन्म मरणातून, बंधनातून सीमोल्लंघन होईल. संपूर्ण रचनेतील प्रत्येक पदाचा शब्दांप्रमाणे अर्थ देत आहे.
सौभाग्य प्रदान करणाऱ्या माझे आई तू ये ॥
पायावर पाय ठेवून ये, त्या पायातील पैंजणांचा आवाज करत ये ।
तुझ्या येण्याने साधू सज्जनांच्या अंतरंगात मंथन चालते आणि ताकातून लोणी वर यावे, तशी त्यांच्या अंतरंगातून भक्ती वर येते ॥१ ॥
कनक म्हणजे सोन्याची वृष्टी करत तू ये, आमच्या मनोकामना पूर्ण कर ।
कोटी सूर्यांचे तेज जसे असते, तसे तुझे दैदीप्यमान रूप आहे. हे जनक राजाच्या कुमारी सीते तू ये ॥ २ ॥
सैरावरा न पळता भक्तांच्या घरामध्ये राहा, म्हणजे तेथे नित्य महोत्सव आणि नित्य सुमंगल घडेल ।
साधू सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू आहेस, त्यांच्यामध्ये तेजाने दैदीप्यमान होऊन तूच राहतेस ॥ ३ ॥
तू असंख्य भाग्य प्रदान करणारी आहेस आणि याबद्दल मला काहीच शंका नाही. तू तुझ्या हातातील कंकणांचा आवाज करत ये ।
तुझ्या कपाळी कुंकुम लावलेले आहे. तुझी लोचने कमलासम आहेत. तू वेंकटरमणाची म्हणजेच भगवान व्यंकटेश नारायणांची राणी आहेस ॥ ४ ॥
साखर आणि तूप हे, शुक्रवारी तुझ्या पूजेच्या वेळी, तुझ्याचरणी वाहत असते ।
पुरंदराला, शुद्ध निष्कलंक करणाऱ्या, प्रेमानेयुक्त अशा रंगनाथाच्या राणी तू ये ॥ ५ ॥
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७