Thursday, October 6, 2016

**भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ४)
भगवंताने दासांचे विषयांमधील मन, विषयाभिमुख वृत्ती एकाप्रकारे व्यवहारातील लक्ष्मीचा आधार घेत स्वतःकडे वळवली होती. आणि त्यामुळे आई महालक्ष्मीचे खरे कार्य दासांनी जाणले होते. त्याच भावातून दासांची ही रचना प्रकट होते.
क्षणार्धात बरीच वर्षे जपत आलेल्या सावकारी, घरादारावर, पैशा-आडक्यावर दासांनी तुळशीपत्र ठेवले होते. आणि शेवटपर्यंत मुखी नाम, भिक्षा मिळाल्यास खायचे पण गावोगावी भगवद्भक्तीचा महिमा गात जायचे इतकेच दासांनी केले. भगवंताचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हे दोन्हीही तूच प्रदान करतेस आई. त्या सावकारी आणि पैशाच्या मायेत मी गुरफटलो की भगवंताला विसरलो, त्याने सोपवलेले कार्य विसरलो. पण तू कृपा केलीस आणि भगवंताचे स्मरण मला झाले. अशीच कृपा तू सर्वांवर कर. दास पुढील पदात म्हणतात,
कनक वृष्टिय करेयुत बारे । मन कामनेय सिद्धिय तोरे ॥
कनक वृष्टिय करेयुत बारे ।
म्हणजे सोन्याची वृष्टी करत ये. आता अर्थात येथे दासांसाठी कसले आले सोने अन् कसली सोन्याची वृष्टी? दासांची भावावस्था या सर्वापलिकडे गेलेली आहे, अजून एका रचनेत दास म्हणतात, "हे श्रीरंगा, हे श्रीहरी, मला काही नको, तुझे नाम एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे." ही रचना, हे पद पाहता सर्वसामान्यांना असं वाटू शकतं की, अमाप संपत्ती ज्यांच्याकडे होती, जसं लक्ष्मी पाणी भरत होती असे म्हणतात, अशी परिस्थिती ज्यांची होती त्या दासांनी, ते सर्व सोडले आणि तरीसुद्धा दास पुन्हा लक्ष्मीला बोलावत आहेत? आपल्याला अभिप्रेत लक्ष्मी, तिचे कार्य आणि दासांचा या रचने मागील संदेश यात फरक आहे. सर्वा संतांच्या रचना या आपल्या बुद्धीच्या पलिकडच्या असतात. वरवर पाहून अर्थ लावणे हे योग्य नाही किंबहुना साधकांसाठी ते हिताचे नाही. पण या रचनेचे अजून एका बाजूने चिंतन करायचे झाल्यास दास सर्वांसाठी आई लक्ष्मीकडे मागणं मागत आहेत. प्रपंचात ज्यांना लक्ष्मीची कृपा हवी आहे त्यांच्यासाठीही आणि परमार्थात तिची कृपा हवी आहे त्यांच्यासाठीही!
येथे दासांचा भाव, तू कृपेची वृष्टी करत ये, तुझी कृपा हे माझ्यासाठी सोनं आहे असा आहे. सोनं म्हणजे जे उच्च, उत्तम, श्रेष्ठ याअर्थी तशीच, तुझी कृपा आहे की याहून आता श्रेष्ठ काही नाही, अशा कृपेची वृष्टी करत तू ये. तुझ्या कृपेची वृष्टी तू सर्व जीवांवर करावीस म्हणून मी तुला बोलावत आहे. पुढे दास म्हणतात,
मन कामनेय सिद्धिय तोरे ॥
तू सर्वांच्या मनोकामना सिद्धीस ने. ज्यांना प्रपंचात तू हवी आहेस त्यांच्याही आणि परमार्थात तू हवी आहेस त्यांच्याही! पुढे म्हणतात,
दिनकर कोटि तेजदि होळेयुव । जनकरायन कुमारि बेगा ॥
दास आणि आई लक्ष्मीमधे चाललेला हा संवाद आहे. दासांनी तिला पाहिले आहे. तिचे वर्णन दास येथे करतात तू कशी आहेस? तर कोटी सूर्यांच्या प्रकाशाचे जसे तेज झळाळते, "होळेयुव" म्हणजे दैदीप्यमान. त्या तेजाने दैदीप्यमान असे तुझे रूप आहे. अशा जनक रायाच्या हे कुमारी म्हणजेच सीते तू ये. भगवान नारायण आणि महालक्ष्मी यांच्यात रामवतारामध्येच वियोग झाला. कृष्णावतारामध्ये तसे नाही. सीतामाई म्हणजे साक्षात लक्ष्मीच! त्यामुळेच दास अतिशय योग्यरितीने सीतामाईचा उल्लेख करतात आणि आई लक्ष्मीच्या त्या रूपाला बोलावण्याचे कारण हेच की, वियोग हा बाह्य स्वरूपाने झाला असला तरी अंतरंगातील अनुसंधानात खंड नाही! आणि तेच आमच्याकडूनही साधले जावो, बाह्यांगाने भगवंता तुझ्यापासून मी विलग झालो तरी अंतरंगात तुझे अनुसंधान सदैव आमच्याकडून राहो हे शिकवण्यासाठी, अशा कृपेची वृष्टी करण्यासाठी हे सीते तू ये!
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: