Saturday, October 1, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग २)
या अखिल विश्वाचे स्वामी, अधिपती, सत्य, ज्ञान आणि आनंद अशा सकल गुणांनी परिपूर्ण असणारे भगवान नारायण यांची नित्यावियोगिनी आदि शक्ती श्रीमहालक्ष्मी. भगवंत आणि तिच्यात वियोग कधीच नाही. ती नित्य त्याच्या अनुसंधानात असते. तीच त्याची प्रथम दासी आहे. जगदुत्पत्ति व स्थिति लयादि कार्यात भगवंताबरोबर तीसुद्धा विविध रूपे धारण करते. भगवंताचे खरे दास्य, परिपूर्ण अशी भक्ती कुणाकडून जाणून घ्यायाची असेल तर आई महालक्ष्मीला शरण जायला हवं... भगवंतापासून दूर नेते ती माया, त्या मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत नेण्यासाठीच श्रीपुरंदरदास आई महालक्ष्मीला बोलावत आहेत.
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा । नम्ममा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ॥
बारो म्हणजे ये ना, अम्मा म्हणजे आई. ये गं आई अशी विनवणी दास करत आहे. भाग्य प्रदान करणारी अशी लक्ष्मी ही अखिल विश्वाची आई आहे. आणि त्या विश्वातील मी एक जीव म्हणजे माझीही तू आई. या भावनेतून तिला दास बोलावत आहे. नम्म म्हणजे माझी. सौभाग्य प्रदान करणारी अशी तू ये आणि आमच्यावर कृपा कर.
येथे दास स्वतःसाठी बोलावत आहेत का? त्यांना वैयक्तिक काहीतरी हवे आहे का? अर्थातच नाही!! संत स्वतःकरीता काही मागतंच नाहीत. नामदेव महाराज म्हणतात तसे "नामा म्हणे मज तुमचे न लगे काही" लोकांचे कल्याण व्हावे इतकाच त्यांचा हेतू असतो. पुरंदरदाससुद्धा त्याच हेतूने आई महालक्ष्मीला बोलावत आहेत.
पुढे दास म्हणतात,
हेज्जेय मेलोंद्‍हेज्जेय निक्कुत । गेज्जेय कालिन नादव तोरूत ॥
पं. भीमसेन जोशींच्या स्वरात आपण ही रचना ऐकली तर त्यात "गेज्जे कालगळा ध्वनीय तोरूत" आधी म्हटले आहे आणि मग "हेज्जेय मेलोंद्‍हेज्जेय निक्कुत" म्हटले आहे. असे का केले आहे याचे कारण संगीतकारालाच माहित! "गेज्जेय कालिन नादव तोरूत" असे आहे. अर्थात त्या ध्वनीफितीत जे म्हटले आहे त्याचा अर्थही तोच होत असला तरी त्यात बदल करण्यासाठी ही कुठल्यातरी कवीची कविता नाही! हे काव्य नाही! हा साक्षात आई लक्ष्मी आणि दासांमधला संवाद आहे. सर्व संतांचे अनुभव हे त्यांच्या पदांमधून, रचनांमधून व्यक्त होत असतात. तेव्हा त्या शब्दांमध्ये संगीताच्या सोयीसाठी बदल करणे शक्यतो टाळावे या मताचा मी आहे! आणि या रचनेत बदल करावा अशी परिस्थिती नाही! अर्थात याची दुसरी बाजू अशीही आहे की, काळानुसार मूळ रचना सापडत नाहीत. बहुतांश वेळा त्या मौखिकरित्या पुढच्या पिढीकडे येत असतात. मग त्यात भाषेप्रमाणे खटकेल तसे बदल केले जाऊ शकतात. या रचनेत वेगवेगळे शब्द म्हणण्यामागे असेच काहीतरी असावे असे वाटते.
हेज्ज म्हणजे पाऊल. मेले किंवा मेलोंद्‍हेज्जेय म्हणजे पाऊलावर पाऊल टाकत. हे दासांचे अनुभव आहेत हा दासांचा देवीशी चाललेला संवाद आहे. यातला कुठलाही शब्द उगीच लिहिलेला नाही. हे त्याचा अर्थ समजून घेतल्यावर कळते. पाऊलावर पाऊल टाकत म्हणजे येथे दासांना नक्की काय म्हणायचे आहे? तुझ्याच पाऊलावर पाऊल टाकत ये असे का?
येथे पाऊलावर पाऊल प्रतिकात्मक दृष्टीने घेतलेले आहे. त्यामागील भाव असा आहे की, आई तुझा तर भगवंतापासून, त्या श्रीहरीपासून कधीही वियोग होत नाही. अवियोगी अशी तू आहेस. त्यामुळे जिथे जिथे श्रीहरीचे पाऊल तिथे तिथे तुझे पाऊल हे उघड आहे! नवाविधाभक्तीत पादसेवन भक्ती कोणाकडून शिकावी तर आई महालक्ष्मीकडून. त्यामुळे जिथे भगवंताची पाऊले तिथे लक्ष्मीची वस्ती असतेच. पण आम्हाला श्रीहरी कुठे हवा आहे? आम्हाला भगवंत नको! आम्हाला फक्त लक्ष्मी हवी आहे! पण ती भगवंताच्या आधीन आहे. म्हणून तू काय कर? तर दास म्हणतात गेज्जेय कालिन नादव तोरूत ॥ किंवा गेज्जेय कालिन/कालगळा ध्वनिय माडुत ॥ असा पाठभेद सुद्धा आहे. अजून अनेक वेगवगेळ्याप्रकारे ऐकायला मिळते पण अर्थ तोच आहे.
त्याचा अर्थ असा आहे, तू तुझ्या पावलातील पैंजणांचा आवाज करत ये! त्याने काय होईल? माया हे तुझेच एक रूप आहे. पण या तुझ्या मायारूपाचा म्हणजे मायेचा लवलेशही ज्याला लागत नाही, नव्हे त्याने तो ग्रासणे हे शक्यच नाही असा भगवंत तुझा पती आहे, मायापती आहे. तुझा प्रभाव काही जीवांवर इतका पडतो की तो भगवंतापासून दूर जातो. त्याला भगवंत नको असतो. आणि हे व्यवहारातंही आपल्याला दिसेल बघा, लक्ष्मीपूजन जितक्या शांततेत, मनापासून केले जाते, तितके सत्यनारायण पूजन होत नाही बघा! पण तू कशी आहेस हे संतांनी बरोबर ओळखले आहे. म्हणून तू काय कर, या मायारूपी निद्रेत असलेल्या जीवांना तुझ्या पैंजणांचा आवाज करून जागं कर. म्हणजे ज्ञान प्रदान कर! कारण मा म्हणजे ज्ञान आणि या म्हणजे प्रदान करणे त्यामुळे भगवंतापासून दूर नेणारीही तूच आणि त्याच्या जवळ नेणारीही तूच आहेस आई! तेव्हा तुझ्या पैंजणांच्या आवाजाने त्यांना जाग आली की त्यांना कळेल की तुझे पाऊल त्या श्रीहरीच्या पाऊलावर आहे तो आधी येतो मग तू येतेस. हे ज्ञान त्यांना होईल. त्यासाठी तू तुझ्या पायातील पैंजणांचा आवाज करत ये!
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: