***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ७)
मागील भागात आपण सत्यव तोरूत साधु सज्जनर । चित्तदि होळेयुव पुत्थळि गोंबे ॥ या पदाचा अर्थ पाहिला. साधू-सज्जनांना सत्य दाखवणारी अशी तू सोने जसे चकाकते त्या तेजाने दैदिप्यमान होऊन मोहक अशा बाहुलीच्या रूपामध्ये त्यांच्यात स्थित असतेस. यापुढे दास म्हणतात,
संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । कंकण कैय तिरूवुत बारे ॥
या पदामध्ये दोन पाठभेद आहेत. शंकेयिल्लद किंवा संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । दोन्हींचा अर्थ आपण येथे बघणार आहोत.
पहिल्याचा अर्थ असा की, दास म्हणतात, हे आई तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. निःशंक होऊन मी तुला बोलावत आहे. आणि तू येऊन भाग्य प्रदान करशील हे मला ठाऊक आहे. एकाप्रकारे दासांना ते भाग्य आईने आधीच प्रदान केलेले असल्यामुळे दास निःशंक आहेत. दासांना त्यांच्या जीवनाचे खरे कार्य कळले. दासांना
भगवंताचे स्मरण झाले. हे परम भाग्य दासांना या लक्ष्मीनेच प्रदान केले. म्हणूनच दास म्हणतात आई तू मला भाग्य प्रदान करशीलच. मला यात अजिबात शंका नाही.
पहिल्याचा अर्थ असा की, दास म्हणतात, हे आई तू मला भाग्य प्रदान करशील याबद्दल मला काही शंका नाही. निःशंक होऊन मी तुला बोलावत आहे. आणि तू येऊन भाग्य प्रदान करशील हे मला ठाऊक आहे. एकाप्रकारे दासांना ते भाग्य आईने आधीच प्रदान केलेले असल्यामुळे दास निःशंक आहेत. दासांना त्यांच्या जीवनाचे खरे कार्य कळले. दासांना
भगवंताचे स्मरण झाले. हे परम भाग्य दासांना या लक्ष्मीनेच प्रदान केले. म्हणूनच दास म्हणतात आई तू मला भाग्य प्रदान करशीलच. मला यात अजिबात शंका नाही.
दासांचा भाव स्वतःसाठी जसा असतो तसाच तो सर्व जीवांसाठी असतो. मागणं स्वतःसाठी जितकं आहे तितकच ते सर्वांसाठी आहे. कारण संतांची दृष्टी विशाल झालेली असते. माझं घर, मी अमुक अमुक हा भावच तेथून गेलेला असतो. आपण सर्वजण हे त्या भगवंताचेच आहोत. हे विश्व आपल्या सर्वांचेच घर आहे. असा विशाल आणि शुद्ध भाव दासांचा झालेला असल्यामुळे माझ्या घरी ये आणि काहीतरी प्रदान कर म्हणजे या विश्वात ये आणि यातील सर्वांना प्रदान कर असा वैश्विक भाव दासांचा आहे. आणि ते तू प्रदान करशील याबद्दल मी निःशंक आहे.
दुसऱ्याचा म्हणजे जे प्रचलित आहे त्याचा, संख्येयिल्लद भाग्यव कोट्टु । अर्थ असा की, तू अगणित असे भाग्य प्रदान करणारी आहेस. तुझे भाग्य हे असंख्य आहे. संख्येत मोजता न येण्यासारखे. असे अगणित, असंख्य, अमेय भाग्य प्रदान करणारी तू आहेस. वास्तविक पाहता, व्यवहारातील लक्ष्मी आणि मोजणे यांचा खूप जवळचा संबंध आहे. लक्ष्मीला मोजलेच जाते, तिला संख्येत तोललेच जाते. पण दास म्हणतात, तू खरी तशी नाहीस. व्यावहारीक लोक जरी तसे करत असले तरी तू त्या अनंताची पत्नी आहेस. तुलाही अंत नाही. तुला मोजता येत नाही.. मेय म्हणजे संस्कृतमध्ये मोजणे अमेय म्हणजे जे मोजता येत नाही असे. अशी तू आहेस. असे भाग्य प्रदान करणारी आहेस.
पुढे म्हणतात,
पुढे म्हणतात,
कंकण कैय तिरूवुत बारे ॥
म्हणजे हातातील बांगडीसारखा एक दागिना त्याचा आवाज करत ये. पहिल्या पदात दास म्हणतात पायातील पैंजणांचा आवज करत म्हणजे त्याने काय होईल तर, तुझंच रूप असलेल्या मायेत आम्ही गाढ निद्रेत आहोत, आम्हाला भगवंताचे स्मरण नाही, अशा निद्रेतून त्या तुझ्या पैंजणातील आवाजामुळे आम्हाला जाग येईल. म्हणजेच आमची मायेतून सुटका होईल आणि भगवंत सापडेल. तशाच काहीशा भावातून दास इथेही म्हणतात की, हातातील बांगड्यांचा, कंकणांचा आवाज करत ये. तीच तू आणि भगवंत आल्याची खूण आहे. म्हणजे आमच्यावर तुम्हा दोघांची पूर्ण कृपास राहील.
पुरंदरदासांच्या पदांचे महत्त्व आपण एका प्रसंगातून जाणून घेऊया.
एकदा पाठ चालू असताना व्यासतीर्थांनी पुरंदरदासांची पदे म्हणजे "पुरंदरोपनिषद" असा सन्मान करून ती मध्वाचार्यांच्या सर्वमूल ग्रंथाबरोबर व्यासपीठावर ठेवून त्यांची आरती केली. हे तथाकथित पंडितवर्गाला अजिबात सहन झाले नाही. ह्या सराफाने केलेली पदे भजने ही कितीही सुंदर असली तरी ती आचार्यांच्या सर्वमूलग्रंथांबरोबर ठेवणे म्हणजे खूपच झाले. स्वामी ती तुम्ही आचार्यांच्या ग्रंथांबरोबर ठेवू नका असा आग्रह त्या मंडळींनी धरला. व्यासतीर्थ स्वामी हसले आणि म्हणाले, "मी ती तिथे ठेवलेलीच नाही आहेत. ती आपोआपच मूलग्रंथांकडे खेचली जात आहेत. खोटे वाटत असेल तर तुम्हीच बघा." पंडितवर्गाने एक-एक करून पुरंदरदासांची पदे व्यासपीठावरून भिरकावून द्यायला सुरूवात केली पण काय आश्चर्य ती परत जशीच्या तशी व्यासपीठावर स्थापित होत होती. असा दासांच्या पदांचा महिमा आहे. अर्थात त्यावेळच्या पंडितवर्गाला तो कळलाच नाही. हा दासांच्या इंद्रजाल विद्येचा प्रकार असावा असे म्हणून ते विरोध करतच राहिले.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
No comments:
Post a Comment