Wednesday, October 5, 2016

***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ३)
पाऊलावर पाऊल टाकत, पायातील पैंजणांचा आवाज करत ये, असे दासांनी बोलवल्यावर लक्ष्मी येते आणि त्याचा परिणाम काय होतो हे दास पुढील ओळीत सांगत आहेत.
तुझ्या येण्याने जीवांना शुद्ध भक्ती प्राप्त होते, जी यथार्थ ज्ञानाला कारणीभूत आहे. भगवंताला जाणायचे झाल्यास ज्यांनी त्याला जाणले आहे, ज्या मार्गाने जाणले आहे त्यामार्गाने आणि त्यांचा हात धरून जाणे हिताचे आणि तू तर अशा भगवंताबरोबर नित्य असतेस. तुझी कृपा झाली तर त्या सत्य,ज्ञानानंदादि गुणपरिपूर्ण भगवंताला जाणता येईल. आणि तुझ्या आगमनाने तेच साध्य होते.
तू आल्याची खूण काय आहे आई आणि ती कशी ओळखावी, यासाठी दास म्हणतात, सज्जन साधु पूजेय वेळगे । मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते ॥ तू आल्याची खूण सज्जनांमध्ये, साधूंमध्ये दिसते. जे खरोखर सज्जन, साधू या पदास बाह्य स्थितीने नाही तर अंतरंग स्थितीने पोहोचले आहेत, ते त्या स्थितीला कशामुळे पोहोचले? तर ते जेव्हा तुझी पूजा करतात, तुझी आराधना करतात तेव्हा "मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते" म्हणजे ताक घुसळल्यावर जसे त्यातून लोणी वर येते तसेच तुझ्या येण्याने साधू सज्जनांच्या अंतरंगात मंथन चालते आणि त्यातून भक्तीरूपी लोणी बाहेर येते आणि त्या शुद्धभक्तीमुळेच ते भगवंताला जाणतात. अशी कृपा तू करावीस म्हणून हे भाग्यप्रदान करणाऱ्या आई तू ये.
रचनेतील पुढील पद उद्याच्या भागात जाणून घेऊया. त्याआधी पुरंदरदासांची स्वतः भगवंताने येऊन घेतलेली परीक्षा, तो प्रसंग आपण पाहणार आहोत. भगवंतानेही व्यवहारातल्या लक्ष्मीचा म्हणजे एका दागिन्याचा आधार घेत दासांमधून भक्तीरूपी, ज्ञानरूपी लोणी बाहेर काढले जे आज शेकडो वर्षे त्यांच्या साहित्यातून, रचनांमधून आपणास चाखयला मिळते.
पुरंदरदासांचा जन्म महाराष्ट्रातील पुरंदर गडावर १४८० साली झाला. त्यानंतर ते हंपि येथे स्थायिक झाले. ते नवकोट नारायण होते. त्यांचे आधीचे नाव श्रीनिवास नायक होते. सावकारी होती. कशालाही कमी नव्हती. पैसा म्हणजेच सर्वकाही आणि त्यासाठीच जगायचे एवढा एकच विचार श्रीनिवास नायक करायचे. त्यामुळे सहाजिकच वृत्ती कंजूष आणि क्रूर अशी होती. त्यांची पत्नी सरस्वतीबाई या मात्र अतिशय शांत आणि प्रेमळ स्वाभावाच्या होत्या. या त्यांच्या दास होण्यास कारणीभूत ठरल्या आणि त्याबद्दल नंतर त्यांनी एका पदात तिचे आभार मानले.
आता या श्रीनिवास नायकाला दणका देण्यासाठी आणि त्याचे जीवनातील खरे कार्य त्याला समजण्यासाठी भगवंताने एके दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि श्रीनिवास नायकाकडे आला. "मला माझ्या मुलाचे उपनयन करायचे आहे, तेव्हा आपण मला थोड्या पैशाची मदत करा" असे त्याने नायकाला सांगितले. नायक म्हणाला, "तारण आणले आहे का तरच पैसे मिळतील." त्या ब्राह्मणाची दया येऊन पैसे देण्याची वृत्ती श्रीनिवास नायकाची नव्हती. पण तीच वृत्ती पालटवण्यासाठी या विश्वाचा नायक साक्षात श्रीनिवास त्याच्यापुढे आला होता. त्या ब्राह्मणाने रोज येऊन पैसे मागावेत आणि श्रीनिवास नायकाने त्यास नकार द्यावा असे सहा महिने चालले. शेवटी त्या ब्राह्मणापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीनिवास नायकाने त्याला एक फुटका रूपया दिला ज्याला काहीही किंमत नव्हती. तो ब्राह्मण निघून गेला.
दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणाने श्रीनिवास नायकाची पत्नी सरस्वतीबाई हिला गाठले. त्या अतिशय दयाळू होत्या. त्याने त्या बाईंना आपल्याला मदत करायला सांगितली. पण त्यांना आपल्या पतीचा स्वभाव माहिती होता. त्यामुळे त्यांच्या परवानगी शिवाय मी तुम्हाला कुठलीच वस्तू देऊ शकत नाही. पण ही माझ्या आईवडीलांनी दिलेली नथ आहे, ती घ्या. असे म्हणून सरस्वतीबाईंनी त्या ब्राह्मणाला नथ दिली.
तो ब्राह्मण लगेचच श्रीनिवास नायकांकडे आला. त्याला पाहूनच नायक खवळले. पण तो ब्राह्मण म्हणाला, "मी इथे भीक मागायला आलेलो नाही तारण ठेवायला आणले आहे, मला पैसे द्या." नायक शांत झाला म्हणाला, "दाखवा काय आणले आहे तारण म्हणून?" त्याने ती नथ काढून नायकाला दाखवली. ती पाहिल्या बरोबरच नायकाने ती ही आपल्या बायकोची आहे हे ओळखले आणि त्या ब्राह्मणाला ही तुला कुठे मिळाली असे विचारले. त्यावर त्याने मला ही बक्षीस म्हणून मिळाली आहे असे सांगितले. श्रीनिवास नायकाने त्याला उद्या येण्यास सांगितले. ब्राह्मण गेल्यावर ती नथ त्याने एका पेटीत कड्या कुलपांनी बंद करून ठेवली आणि घरी गेला.
घरी आल्यावर आपल्या पत्नीच्या नाकात नथ न पाहिल्याने नायकाने विचारले की नथ कुठे आहे? त्यांनी कशीतरी वेळ मारून नेली, पण नायक आपल्या पत्नीच्या उत्तराने समाधानी नव्हता आणि तो चिडला होता. त्याने नथ आणून दे असे सांगितले आणि निघून गेला. सरस्वतीबाईंना खूप अपराधी वाटू लागले. आपला पती आता आपल्याला शिक्षा करणार या भितीने त्यांनी आता विष घेऊन मरावे हा पर्याय निवडला. सरस्वतीबाईंनी एका भाड्यांत विष घेतले आणि भगवंताचे नामस्मरण केले आणि ते पीणार इतक्यात त्या भांड्यात नथ येऊन पडली.
सरस्वतीबाईंनी मनोमन भगवंताचे आभार मानले आणि ती नथ धुवून नायकाला आणून दिली. ती नथ पाहून नायक चक्रावला आणि लागलीच सावकारीच्या दफ्तरावर आला. त्याने ती कड्या कुलपांमध्ये बंद केलेली पेटी उघडली आणि बघतो तर त्यातील नथ गायब! हा एक दणका नायकासाठी पुरेसा होता. तो घरी आला त्याने पत्नीला सर्व प्रकार सांगितला. नथ नाही हे कळल्यावर मला तो ब्राह्मण पुन्हा दिसला आणि क्षणार्धात अंतर्धान पावला. तो ब्राह्मण म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून साक्षात श्रीहरीच होता असे सांगितले.
घरावर, सावकरीवर तुळशीपत्र ठेवले आणि चार मुले, पत्नी यांच्यासह हरिकिर्तन करत करत चालू लागला. त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या दागिन्यांची जागा आता तुळशीच्या माळेने घेतली होती. सोन्या, हिऱ्यांमध्ये असणाऱ्या हातात तंबोरा आणि चिपळ्या आल्या होत्या, मुखी हिशेबाच्या आकड्यांऐवजी भगवंताचे नाम आले होते आणि असे श्रीनिवास नायकाचे हरिदास, श्रीपुरंदरदास झाले होते.
(क्रमशः)
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७

No comments: