***भाग्यदा लक्ष्मी बारम्मा*** (भाग ५)
मागील भागात सांगितल्याप्रमाणे या रचनेचा अभ्यास, या रचनेचे चिंतन लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्हीही अंगांनी करता येते. पण चिंतनाचा गाभा हा दासांची भावावस्था हा आहे. त्याला केंद्रस्थानी धरून आपण या रचनेचे निरूपण बघत आहोत. कनक म्हणजे सोन्याची वृष्टि करत ये, प्रपंचात जी लक्ष्मीची कृपा लागते ती असावीच इत्यादि सर्व हे दासांना मान्य आहेच आणि या रचनेतून दास ते प्रकटसुद्धा करतात. प्रापंचिकांना जे हवे आणि पारमार्थिकांना जे हवे ते दे हा भाव दासांचा आहेच. दासांचं मागणं माझ्या स्वतःसाठी तू सोन्याची वृष्टी करत ये हे नाही, हे लक्षात घ्यावे. इथे वैयक्तिक दास आणि त्यांचा भाव लक्षात घेऊन थोडया वेगळ्या अनुषंगाने या रचनेचा आपण अर्थ बघत आहोत. या निरूपणा व्यतिरिक्त संपूर्ण रचेनचा शब्दांप्रमाणे जसाच्या तसा अर्थ शेवटच्या भागात देत आहे. पुढील पदात दास म्हणतात,
अत्तितगलदे भक्तर मनेयोळु । नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥
"अत्तितगलदे" म्हणजे सैरावरा न पळता. इकडे-तिकडे न जाता. चंचलता हा लक्ष्मीचा गुण आहे. एका जागी ती स्थिर नसते. म्हणून दास तिला विनवणी करतात की, इकडे तिकडे जाऊ नकोस, एका जागी स्थिर राहा. "भक्तर" म्हणजे भक्तांच्या, "मनेयोळु" म्हणजे घरामध्ये. भक्तांच्या घरांमध्ये तू स्थिर राहा. कारण तू जेव्हा स्थिर राहतेस तेव्हा त्या घरांमध्ये नित्य महोत्सव नित्य सुमंगल ॥ सदैव महोत्सव चालतात, तेथे नित्य,सदैव सुमंगलच घडते.
दासांनी भगवंतालाच घट्ट धरून ठेवले आहे. वैयक्तिक दासांसाठी भगवंत त्यांच्याबरोबर असल्याने लक्ष्मीसुद्धा त्यांच्याकडे नित्य आहेच. या पदातून ते सर्वांसाठी मागणं मागत आहेत की तू भक्तांच्या घरांमध्ये स्थिर राहा जेणेकरून तेथे नित्य सुमंगलच घडेल. घरादारावर तुळशीपत्र ठेवल्यानंतर व्यासतीर्थांकडे जाऊन दासांनी हरिदास दीक्षा घेतली तो कथाभाग आपण पाहूया. त्यातून दासांची वृत्ती कशी पालटली हे कळते आणि रचनेत ते स्वतःसाठी नक्कीच काही मागणं मागत नाहीत हे कळते.
हंपीला व्यासतीर्थ गुरूंकडे जात असताना वाटेत अरण्यात सरस्वतीबाईंना भिती वाटू लागली आणि त्यांनी तसे नायकांना सांगितले. "सर्वस्व त्याग करून निघालो असताना भिती कशाची?" असे नायक म्हणाले. नायकांनी "बरोबरचे गाठोडे पाहू", म्हणून सरस्वतीबाईंना ते सोडायला लावले. "त्यात काही नाही. पाणी पिण्याकरीता फक्त एक सोन्याचे फुलपात्र आहे." असे सरस्वतीबाई म्हणाल्या. "हे पहा, या सोन्याच्या पात्रामुळेच तुला भय वाटत आहे." असे म्हणून नायकांनी ते पात्र अरण्यात भिरकावून दिले. आता "भिण्याचे कारण नाही, भगवंत आपल्याबरोबर आहे, आपण गुरूंकडे जात आहोत, काळजी नसावी" असा धीर दिला आणि पुढची वाट चालू लागले.
चक्रतीर्थ हंपी येथे येताच तेथील सर्व परिसराचे दर्शन घेत घेत व्यासतीर्थांपर्यंत येऊन नायक थांबले. व्यासतीर्थ तेव्हा शिष्यांना पाठ सांगत बसले होते. नायकाने त्यांना नमस्कार केला. हात जोडून गुरूंसमोर नायक उभे राहिले. त्यांना बघताच स्वामी म्हणाले, "यावे नायक. मी तुमचीच वाट पाहात होतो. चालत आलात का? काही अडचण तर आली नाही ना? श्री नारायणानेच तुमची परीक्षा घेतलेली आहे. पाठ संपतच आहे. एवढ्यात पुजा नैवेद्य होईल. तीर्थ प्रसादानंतर आपण बोलूया."
नायकांनी स्वामींचे हे सर्व बोलणे ऐकून त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तीर्थ प्रसादानंतर स्वामींनी नायकाला गुरूपदेश केला. मंत्रोपदेश दिला. भागवत धर्माची दीक्षा दिली. त्या दिवसापासून नायक हरिदास झाले. "पुरंदर विठ्ठल" या नाममुद्रेने भगवंताची पदे रचून सेवा करावी आणि भगवंताचे माहात्म्य जनास सांगावे अशी आज्ञा व्यासतीर्थांनी केली. गुरूंच्या पूर्णकृपेनंतर पहिलेच पद त्यांनी रचले ते म्हणजे "कृष्णमूर्ती कण्ण मुंदे निंतिद्दतिदे." म्हणजे श्रीकृष्णच माझ्या डोळ्यांपुढे उभा आहे.
असे हे पुरंदरदास रोज स्नान आन्हिक आटोपून, तंबोरा वाजवत भगवंताचे भजन करीत करीत ग्रामप्रदक्षिणा करत. त्यांची चारही मुले त्यांच्या समवेत मृदुंग टाळ वाजवीत असत. त्यांनी पदे गायला सुरूवात केली प्रत्यक्ष परमात्मा त्यांच्यापुढे नाचत असे. नगरातील लोकांच्या घरातून जे काही झोळीत मिळेल त्यावरच संतुष्ट होऊन आपली दिनचर्या ते चालवत असत. उद्याकरीता म्हणून काही संग्रह करायची त्यांची वृत्ती राहिली नव्हती. आपल्याला अन्न मिळाले तर त्यातील राहिलेले अन्न भुकेलेल्यांना, जनावरांना देणे किंवा चक्रतीर्थातील जलचरांना ते देत, पण संग्रह काहीच करून ठेवत नसत. या त्यांच्या वृत्तीप्रमाणे वागणाऱ्या घरांना कर्नाटकात "अरे, याच्याकडे नसेल काही संग्रही, हे तर पुरंदरदासाचे घर" अशी म्हण आहे.
क्रमशः
लेखक - वादिराज विनायक लिमये
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
भ्रमणध्वनी - ९७६२७४४४०७
No comments:
Post a Comment