Wednesday, April 13, 2016

पैल मेरुच्या शिखरी।एक योगी निराकारी।
मुद्रा लावोनी खेंचरी।प्राणायामीं बैसला।।
तेणें सांडियेली माया।त्यजियेलि कंथा काया।
मन गेलेंसे विलया।ब्रह्मानंदा माझारीं।।
अनुहत ध्वनिनाद।तो पावला परमपद।
उन्मनी तुर्या विनोद।छंदे छंदे डोलुतसे।।
ज्ञान गोदावरीच्या तींरीं।स्नान केले पांचाळेश्वरीं।
ज्ञानदेवाच्या अंतरीं।दत्तात्रय योगीया।।


चित्रवीणा
निळ्या जळावर कमान काळी
कुठे दुधावर आली शेते
थंडाव्याची कारंजीशी
कुठे गर्द बांबूची बेटे
जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर
तारांमधला पतंग कोठे
भुलूनी गेला गगनमंडला
फ़णा डोलवित झोंबू पाहॆ
अस्तरवीच्या कवचकुंडला
उंचवट्यावर म्हशी गोठल्या
तसेच कोठे कातळ काळे
वर्ख तृप्तिचा पानोपानी
बघून झाले ओलेओले
कुठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीनकांति गोरे गोरे
फूलपंखरी फूलथव्यांवर
कुठे सांडली कुंकुमटींबे
आरसपानी पाण्यावरती
तरत्या बगळ्यांची प्रतिबिंबे
कुठे आवळीवरी कावळा
मावळतीचा शकून सांगे
पूर्वेला राउळ इंद्राचे
कोरीव संगमरवरी रंगे
घाटामध्ये शिरली गाडी
अन रात्रीचा पडला पडदा
पण चित्रांची विचित्रवीण
अजूनी करते दिडदा दिडदा.
- बा. भ. बोरकर

पावसाळा…
नदी सागरा मिळता,
पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्यांची म्हण,
नाही नदीला माहेर…

काय सांगू रे बाप्पानो,
तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराशी जाते,
म्हणुनची जग चाले…
सारे जीवन नदीचे,
घेतो पोटात सागर
तरी तीला आठवतो,
जन्म दिलेला डोंगर…
डोंगराच्या मायेपायी,
रुप वाफ़ेचे घेउन
नदी तरंगत जाते,
पंख वाऱ्याचे लावून…
पुन्हा होउन लेकरु,
नदी वाजवते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा,
तेव्हा येतो पावसाळा… !!!
– ग. दि. माडगूळकर

No comments: