Tuesday, April 19, 2016

संसारसिंधु हा दुस्तर । नुल्लंघवे उल्लंघितां पार ।
बहुत वाहाविले दूर । न लगेचि तीर पैल थडी ॥१॥
किती जन्म झाला फेरा । गणित नाहीं जी दातारा ।
पडिलों आवर्ती भोंवरा । बहु थोरा वोळसिया ॥धृ॥
वाढलों परि नेणती बुद्धि । नाहीं परतली धरिली शुद्धि ।
मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधि सांडूनियां ॥३॥
अनेक खाणी आहार निद्रा । भयमैथुनाचाचि थारा ।
बालत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥४॥
ऐसी उल्लंघूनि आलों स्थळें । बहु या भोवंडिलों काळें ।
आतां हें उगवावें जाळें । उजेडावें बळें दिवसाच्या ॥५॥
सांडो या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट ।
दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट झालों देवद्रोही ॥६॥
भावार्थ -
ज्यांच्या अंतःकरणातील ज्ञान अज्ञानाने आवृत्त झालेले आहे, अशा सार्‍या जीवांसाठी (मनुष्यप्राण्यांसाठी) स्वोद्धाराचा मार्ग तुकोबाराय स्वानुभवातून या अभंगाद्वारे उपदेशित आहेत. स्वोद्धार म्हणजेच स्वस्वरूपाचे ज्ञान होणे आणि त्यासाठी आवश्यक असणार्‍या अंतर्बाह्य जागृतीची निकड ते प्रतिपादितात.
संसारसिंधु किंवा भवसागर हा दुस्तर म्हणजेच तरून जाण्यास अवघड असा आहे. या सागराचे परिमाण शब्दातीत आहे. या उलट जीव अल्पशा आंतरिक शक्तीने युक्त असल्यामुळे हा सागर तरून पैलतीर गाठण्याचा जीवाने कितीही प्रयत्न केला तरी त्याला तरून पैलतीर गाठणे शक्य होत नाही आणि त्याला हा सागर उल्लंघूनही जाणे सहज शक्य होत नाही. श्रीज्ञानेश्वरमाऊली सांगतात, ‘तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताती कोटिवरी । परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ॥’ (अंतःकरणातील आस्थेच्या महापुरात कोट्यवधी साधक स्वतःला झोकून देतात, परंतु एखादाच पैलतीराला पोहोचतो आणि माझे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो.) तुकोबारायांनीही अनुभवले आहे की, या संसारसिंधूत संभ्रमित होऊन खर्‍या ज्ञानापासून दूर वाहवले जाणेच नशिबी येते, पैलतीराला लागताच येत नाही.
अशा या संभ्रमित अवस्थेत अगणित वेळा जन्म-मरणाचे फेरे घेऊनदेखील जीव त्यातून सुटण्याचा विचारही मनात आणित नाही. अज्ञानाने आवृत्त राहिल्यामुळे जन्म-मरणाचे अनेक वळसे घेत या भोवर्‍यात सापडलेल्या जीवासाठी आवर्त अनुल्लंघनीय असल्याचे दिसून येते. तुकोबारायांचे हे निवेदन करतात की, ‘दातारा’ला संबोधून केलेले आहे. ‘दातार’ हे ब्रीद जसे भगवंताचे आहे, तसेच ते संतांचेही आहे. किंबहुना संत हे सहृदय असल्याने त्यांच्यापुढे अंतःकरणातील वेदना व्यक्त करणे, आर्ताला अवघड वाटत नाही. तथापि, संतांशी भेट घालून देण्याचे कार्य भगवंतच करीत असतो. त्यासाठी प्रथम भगवंताला करुणेचा पाझर फुटणे आवश्यक असते. त्याला तशी करुणा यावी, यासाठी भगवंतापुढे स्वाभाविकरित्या आपले आर्त प्रथम प्रगट केले जात असते.
तुकोबाराय पुढे परिहार देतात की, जन्माला आलेला देह नैसर्गिक रित्या वाढत राहिला खरा, पण बुद्धीचे स्वातंत्र्य असूनही ती मात्र खरे काय, खोटे काय याचा निर्णय घेण्यास समर्थ झाली नाही. तुकोबाराय ‘वाढलों’ असे म्हणतात. येथे जीवाचे उत्क्रांत होत जाणे दाखविले आहे. अनंत जीव-खाणींमध्ये अत्यंत कनिष्ठ जीवजंतूच्या योनीपासून ते परमोच्च मानवदेहापर्यंत प्राप्ती झाली खरी, तरी बुद्धीच्या ठायी विवेक-जागृती मात्र झाली नाही. उपरती झालेले तुकोबाराय म्हणून किंचित् प्रश्न पुढे मांडतात की, मानवदेह प्राप्त झाला ही फार मोठी संधी लाभली आहे. आताच मी सारासार विचार करायचा नाही, तर तो करायचा कधी?
संसारसिंधूतील आवर्तात सापडलेल्या जीवाला अमूल्य मानवदेह प्राप्त झाला असला तरी जीवनाचे सार्थक साधण्यासाठी सारासार विचार करण्याची बुद्धी व्हावयास हवी. मनुष्ययोनी प्राप्त होऊनही अनेक खाणीतील मूढ प्राण्यांप्रमाणे जीव आहार-निद्रा-भय-मैथुन यातच गुरफटलेला राहतो. शिवाय देहाला निसर्गतःच बाल्य-तारुण्य-जरा (म्हातारपण) या अवस्थांतून जावे लागत असते. या सार्‍या अवस्था केवळ भोगप्रधान असल्याचे दिसते, असे तुकोबाराय निक्षून सांगतात. जीवजंतूपासून पशुपक्षादी अनेक योनींमधून भ्रमण करीत असताना त्या ठिकाणी भोगवृत्तीमुळे आहार-निद्रा-भय-मैथुन यांचाच संग झालेला होता आणि आता मनुष्ययोनी प्राप्त होऊनही त्या अवस्थात्रयांमधे संपूर्णतः चित्तामध्ये भोगांचाच विचार केंद्रस्थानी राहिला. या दशेतून बाहेर पडण्याचा विचारदेखील मनात आला नाही. प्रत्येक योनीतील भोग भोगूनही भोगाचा वीट आला नाही आणि योग-बुद्धी प्राप्त झाली नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, प्रपंचाला विन्मुख आणि परमार्थाला सन्मुख होण्याची बुद्धी मिळावी. ते भगवंताला शरण्य समजून त्याच्या पायाशी तशी विनवणी करतात. त्यांची अशी भावना आहे की, मानवजन्माची अशी सुवर्णसंधी दवडून घालवणे, हे अविवेकाचे द्योतक ठरणारे आहे.
तुकोबाराय अत्यंत कळकळीने निवेदन करतात की, अशा अनेक योनी आणि अनेक जन्म भोगून आता अलौकिक असा मानवदेह प्राप्त झाला आहे. मानवयोनी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही योनीत भोगाशिवाय इतर गोष्टींमधला विवेक जागृत असण्याचा प्रश्नच नव्हता. भोगप्रधान अवस्थेत अनंत काळ निघून गेला. तुकोबारायांना आता या दुरिताच्या जाळ्यातून सोडवणूक हवी आहे. ते म्हणतात, ‘मी अज्ञानरूपी रात्रीच्या अंधारात कालक्रमणा करीत होतो. हे दातारा, आपल्या सामर्थ्याने विवेकयुक्त ज्ञानाचा प्रकाश (दिवस) मला प्राप्त करून द्यावा. तुकोबाराय ‘उजेडावें बळें दिवसाच्या’ असे म्हणतात. दिवसाचे बळ कला-कलाने वाढत जाऊन माध्यान्ही पूर्णावस्थेला पोहोचलेले असते. त्यावेळचा प्रकाश सर्वात जास्त लखलखीत असतो. भगवंताच्या प्राप्तीविषयीचे ज्ञान हे इतर सर्व प्रकारच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते, असा येथे लक्षार्थ दिसून येतो.
अभंगाचा समारोप करताना तुकोबाराय मनापासून ‘दाताराला’ विनवितात की, या संसाराची वाट म्हणजेच जन्म-मरणाचे करावे लागणारे फेरे त्यांच्या कृपेशिवाय संपणारे नाहीत. हे फेरे संपावेत (सांडो), इतकी कृपा करावी.’ ‘दातारा’च्या मनात करुणा जागी व्हावी व त्याने एव्हढे कृपादान द्यावे यासाठी तुकोबाराय कळवळून निवेदन करतात की, हा संसार अतिशय कष्ट भोगविणारा आहे. हा संसार असा काही आभास दाखवितो की, जे केवळ हानीकारक, भ्रामक आहे, त्यालाच जीव सत्य मानू लागतो आणि वृथा अहंपणाच्या तोर्‍यात राहून भगवंताशी द्रोह करतो. स्वतःला भगवंतापासून वंचित करून घेतो.

No comments: